काजूमध्ये वाईट काय?


मोठ्या सेलिब्रिटिजच्या आहारतज्ञ म्हणून ख्यातनाम असलेल्या ऋजुता दिवेकर या नेहमीच खाण्यापिण्यााच्या संबंधातील लोकांच्या रूढ गैरसमजांना धक्के देत असतात. असा एक धक्का त्यांनी नुकताच दिला आहे. धक्का दिलेला गैरसमज असा की, जाडी कमी करायची असेल तर शेंगदाणे, काजू आणि खोबरे यांना फाटा दिला पाहिजे. कारण त्या तिन्हीमध्येही तेल आणि चरबीचे प्रमाण जास्त आहे. तेव्हा त्यातल्या त्यात काजूच्या बाबतीत तर आहारतज्ञ नेहमीच इशारे देत असतात. हृदयविकाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी शरीरात चरबी साचेल असे खाद्य पदार्थ खाऊ नये असे बोलले जात असते. काजू तर हृदयविकार असणार्‍यांचा शत्रूच समजावा, असा सल्ला दिला जात असतो. ऋजुता दिवेकर यांनी मात्र या समजाला धक्का दिला आहे.

खोबरे, काजू आणि शेंगदाणे शरीराला अपायकारक नाहीत. विशेषतः ज्याच्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉल मोठ्या प्रमाणावर असते त्यांना तर काजू आवश्यकच असतो. कारण त्यामध्ये कोलेस्टेरॉल नसते. आता हा नवा शोध लोकांसाठी धक्कादायक असणारच. परंतु ऋजुता दिवेकर त्याचे स्पष्टीकरण देतात. कोलेस्टेरॉल हे आपल्या शरीरात तयार होत असते आणि ते तयार करण्याचे काम आपल्या शरीरातला यकृत हा अवयव करत असतो. जिथे यकृत आहे तिथेच कोलेस्टेरॉल तयार होत असते. झाडांमध्ये किंवा वनस्पतींमध्ये लिव्हर नावाचा अवयवच नसल्यामुळे झाडात कोलेस्टेरॉल तयारच होऊ शकत नाही. म्हणजेच शेंगदाणा आणि काजूमध्ये कोलेस्टेरॉल नसते. असे असले तरी झाडांमध्ये कोलेस्टेरॉल हे फायटोस्टेरॉलच्या स्वरूपात उपलब्ध असते. म्हणजे फायटोस्टेरॉल हा वनस्पतींच्या अवयवात असलेला कोलेस्टेरॉलच असतो.

काजू, शेंगदाणे आणि खोबर्‍याच्या रूपाने आपण फायटेस्टेरॉल सेवन करत असतो आणि हे फायटेस्टेरॉल आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित करत असते. तेव्हा कोलेस्टेरॉलची समस्या असेल त्याने खोबरे, काजू आणि शेंगदाणे या तीन बदनाम वस्तूंचे सेवन केले पाहिजे. या तीन वस्तू आपण समजतो तशा आपल्या शरीराला किंवा कोलेस्टेरॉलला कसल्याची प्रकारची हानी पोहोचवत नाहीत. सध्या फॅटस् कमी असलेले बदाम खाण्याची फार फॅशन आहे. कारण बदाम अमेरिकेतून येतात. परंतु आपल्या देशात पिकलेले शेंगादाणे कोणत्याही बाबतीत बदामापेक्षा कमी उपयुक्त नाहीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment