कार्यालयात कसे बसावे


धूमपान करण्याने कर्करोग होण्याची शक्यता असते. म्हणून धूम्रपानाची सवय ही सर्वात धोकादायक मानली जाते. परंतु आपण कार्यालयात काम करताना कसे बसतो ही गोष्टीही निर्व्यसनीपणाइतकीच संवेदनशील आणि महत्त्वाची आहे. कार्यालयात काम करताना चुकीच्या पध्दतीने बसणे हे धूम्रपान करण्याइतकेच धोकादायक समजले जाते. परंतु आपण त्याच्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही. कार्यालयात बसताना आपण करत असलेली सर्वात मोठी चूक म्हणजे सलग एकाच जागेवर बसून राहणे. तज्ञ मंडळींचे असे मत आहे की, चार ते पाच तास एकाच जागेवर बसून राहणे किंवा कसलीही शारीरिक हालचाल न करता एकाच जागेवर स्थिर बसणे हे अनेक रोगांस निमंत्रण देणारे असते.

तेव्हा कार्यालयीन कामे करत असताना दर अर्ध्या तासाला उठावे, चार पावले चालावे, अंगाला आळोखेपिळोखे द्यावेत किंवा आपल्या खुर्चीवरून उठून कसली तरी हालचाल करावी. त्यामुळे शरीरात चरबी साठवणे, हृदयविकार, लठ्ठपणा आणि हाडांचा ठिसूळपणा इत्यादीपासून आपला बचाव होऊ शकतो. आपण संगणकावर काम करत असू तर संगणकाचा मॉनिटर आणि आपले डोळे एकाच रेषेत असले पाहिजेत. मॉनिटरवरील मजकूर दिसण्यासाठी मान वर करावी लागत असेल किंवा खाली झुकवावी लागत असेल तर मानेचे दुखणे आणि सर्व्हिकल डिस्क इंजुरी हहे आजार होण्याची शक्यता असते. आपल्या खांद्यांनासुध्दा व्यायाम हवा असतो. तेव्हा अधूनमधून काम थांबवून दोन्ही हात वर करावेत, बसूनच खांद्याची स्थिती बदलावी, त्यामुळे खांद्याला दिलासा मिळतो.

आपली बसण्याची खुर्ची पाठीला सपोर्ट मिळेल अशा पध्दतीने ठेवलेली असावी. सहज बसताना पाठ खुर्चीला टेकली पाहिजे. त्यामुळे खांदा, पाठ, मान आणि डोळे चारींच्याही आरोग्याचे रक्षण होते. खुर्ची आणि आपली पाठ यांच्यामध्ये अंतर पडत असेल तर त्या अंतरात एक उशी टाकावी. मात्र कोणत्याही परिस्थितीत पाठ अधांतरी असता कामा नये. पायाची अवस्था कशी असावी? पाय दुमडून बसू नयेत. पाय दुमडल्यास घोट्याच्या सांध्यावर ताण येतो आणि घोट्याकडे येणार्‍या रक्ताच्या प्रवाहात बाधा निर्माण होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या खुर्चीवर बसलो असताना दर अर्ध्यातासाला मान फिरवावी आणि मानेतला रक्त प्रवाह सुरळीत होईल याची दक्षता घ्यावी.

Leave a Comment