‘इंडियन आयडॉल’मधून पुन्हा एकदा होणार अनु मलिकची हकालपट्टी?


पुन्हा एकदा ‘इंडियन आयडॉल’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधून प्रसिद्ध संगीतकार व गायक अनु मलिक यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. सोनी वाहिनीकडून हा निर्णय अनु मलिकवर झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘इंडियन आयडॉल’चे अकरावे पर्व सध्या सुरु असून त्यांना यापूर्वी दहाव्या पर्वातूनही परीक्षकपदावरून हटवण्यात आले होते. त्यांच्यावर #MeToo ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत आरोप झाल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा परीक्षक म्हणून शोमध्ये पाहिल्यावर सोशल मीडियावर अनेक महिलांनी रोष व्यक्त केला आहे.

सोनी वाहिनीच्या निर्णयाचा गायिका नेहा भसीन हिने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. एका शोमध्ये लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेला व्यक्ती परीक्षक म्हणून कसा येऊ शकतो, असा सवाल तिने केला. दरम्यान सोनी वाहिनी सोशल मीडियावर होत असलेला विरोध पाहून अनु मलिक यांना पुन्हा एकदा परीक्षकपदावरून हटवण्याचा विचार करत आहे.

संगीतकार- गायक अनू मलिक यांच्यावर सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहापात्रा आणि श्वेता पंडित यांच्यानंतर आणखी दोन महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. अनु मलिक यांना भेटायला १९९०साली मेहबूब स्टुडिओमध्ये गेले असता चुकीच्या पद्धतीने त्यांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. श्वेता पंडितने अनु मलिक यांच्यावर याआधीही मोठ्या गायकांसोबत गाण्याची संधी देण्यासाठी किस मागितल्याचा आरोप केला होता. तर सोना मोहापात्रा आणि श्वेता पंडितचे आरोप अनु मलिकने फेटाळून लावले होते.

Leave a Comment