ट्विटरवर ट्रेण्ड होत आहे #RejectFadnavisForCM हॅशटॅग


मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून बराच कालावधी उलटला असूनही अद्याप महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना झालेली नाही. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. परंतु फडणवीस महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये मंत्रीपदांचे वाटप करण्यात अपयशी ठरल्यामुळे आता पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री होण्याच्या शक्यता काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. तसेच ट्विटरवरुनदेखील कालपासून अशाच प्रकारची मागणी होत आहे.

सध्या #RejectFadnavisForCM आणि #RejectFadnavisAsCM हे दोन हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड होत आहेत. नेटिझन्स हा हॅशटॅग वापरुन देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू नका अशी मागणी महायुतीकडे करत आहेत. तर अनेकजण असे सुचवत आहेत की भाजपसोबत युती तोडून शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करायला हवे. जेणेकरून मुख्यमंत्रीपदापासून देवेंद्र फडणवीस आणि सत्तेपासून भारतीय जनता पक्ष दूर राहील.

देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या पाच वर्षांमधील कामगिरीवर ट्विटरकर नाखूश आहेत. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या गेल्या पाच वर्षांत या महाराष्ट्रात झाल्या आहेत, राज्यातील शेतकरी फडणवीस यांच्या कार्यकाळात संपावर गेला. अद्याप सांगली, सातारा कोल्हापुरातील सर्व पूरग्रस्तांना मदत मिळालेली नाही. फडणवीस अशा अनेक गोष्टींना जबाबदार आहेत, असा ट्विटरकरांचा सूर असल्यामुळेच फडणवीस ट्विटरकरांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी नको आहेत.

ट्रेण्ड करणारे ट्वीट्स पाहिल्यानंतर महत्त्वाची बाब समोर आली आहे की, फडणवीस यांच्याऐवजी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांच्यापैकी कोणताही नेता ट्विटरकरांना चालेल. तर भाजपचाच मुख्यमंत्री होणार असेल, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे राज्याची धुरा सोपवावी, अशी मागणी काहींनी केली आहे.

Leave a Comment