व्हायरल ; रानू मंडल यांच्या डोक्यात भरली प्रसिद्धीची हवा


मागील काही काळापासून सोशल मीडियावर रानू मंडल हे नाव प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्या रातोरात स्टार झाल्या. त्याचबरोबर बॉलिवूडचा स्टार संगीतकार हिमेश रेशमियानेही त्यांना त्याच्या चित्रपटात गाण्याची संधी देऊ केली. त्यांच्या आवाजातील ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरले. ज्यावेळी रानू मंडल प्रसिद्ध माध्यमांसमोर आल्या त्यावेळी त्या सर्वांशीच नम्रपणे बोलताना दिसल्या. पण सोशल मीडियावर नुकताच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रानू त्यात एका चाहतीवर भडकलेल्या दिसत असल्यामुळे रानू मंडल यांचा नूर स्टार झाल्यावर बदलल्याचे म्हटले जात आहे.

रानू मंडल यांचा एक व्हिडीओ सध्या फेसबुकवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ त्यांच्या गाण्याचा नाही तर त्याच्या एका चाहतीचा आहे. त्या एका सुपर मार्केटमध्ये काहीतरी खरेदी करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. एवढ्यात एक महिला त्यांना हात लावून हाक मारते आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याविषयी विचारते. पण यावर रानू तिच्यावर रागावतात. त्या आधी त्या महिलेला दूर राहायला सांगतात आणि नंतर हात लावून हे असे करण्याचा अर्थ काय असे विचारताना दिसत आहेत. रानू मंडल चाहतीने हात लावल्याने भडकल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

सोशल मीडियावर रानू मंडल यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून रानू यांचे वागणे स्टार झाल्यानंतर बदलल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. त्याचबरोबर अनेक युजर्सनी यश मिळाले म्हणून त्याचा कधी गर्व करू नये असा सल्लाही दिला आहे. कारण यशाच्या शिखरावरून खाली यायला वेळ लागत नाही. तर काहींनी मात्र रानूला हात लावणाऱ्या महिलेला चुकीचे म्हटले आहे. पण बहुतांश लोकांना रानू मंडल यांचे वागणे खटकलेले आहे.

Leave a Comment