राऊतांचा भाजपला टोला; ‘लक्ष्य तक पहुंचने से पहले सफर में मजा आता है’


मुंबई – दहा दिवसांहून अधिकचा कालावधी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून लोटला असला तरी राज्यात अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला जनमत दिले आहे. पण असे असले तरी भाजप आणि शिवसेनेमध्ये ५०-५० सुत्रामुळे सत्ता स्थापनेचे तिढा सुटलेला नाही. शिवसेनेचे नेते संजय राऊत दररोज आक्रामक भूमिका मांडताना दिसत आहे. राऊत प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलण्याबरोबरच ट्विटवरुनही रोज एखादे ट्विट करुन भाजपला टोला लगावता दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले असतानाच प्रवास करण्यावरुन राऊतांनी ट्विट करत एक टोला लगावला आहे.


त्यांचा आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्र चालतानाचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. त्यांनी या फोटोला “जय हिंद” असे कॅप्शन दिले आहे. ‘लक्ष्य तक पहुंचने से पहले सफर में मजा आता है’ असे वाक्य या फोटोवर लिहिलेले आहे. राज्यामध्ये सध्या सत्ता स्थापन करणे हे भाजप आणि शिवसेनेचे लक्ष्य असून वेगवेगळ्या मार्गांचा विचार त्यासाठी दोन्ही पक्षांकडून सुरु असतानाच हे ट्विट राऊत यांनी केले आहे.


राऊत यांनी रविवारीही शायर वसीम बरेलवी यांचा शेर ट्विट करत भाजपला टोला लगावला होता. ‘उसूलों पर जहाँ आँच आये, टकराना ज़रूरी है जो ज़िन्दा हो, तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है…’ असं ट्विट राऊतांनी केले होते. दरम्यान, संजय राऊत हे आज राज्यपालांची भेट घेणार आहे. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये फडणवीस हे अमित शहा यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कसा सोडवता येईल यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करणार आहेत.

Leave a Comment