जमिनीतून वाचा फुटतेय क्रूर अत्याचारांना


सत्य कितीही दाबून ठेवले तरी कधी न कधी ते वर येतेच म्हणतात. जगात आतापर्यंत अनेक हुकूमशहा आणि अत्याचारी शासक होऊन गेले. त्यांच्या अत्याचारांच्या कहाण्या काही प्रमाणात त्यांच्या हयातीतच बाहेर आल्या. परंतु अनेक घटना गोपनीय राहिल्या. आज हे अत्याचारी शासक मरून सहा-सात दशके होत असताना त्यांच्या जुलूमशाहीचे पुरावे जमिनीतून वर येत आहेत. याचे ठळक उदाहरण म्हणजे रशियातील सोव्हिएत राजवट. एकेकाळी पोलादी पडदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियात साम्यवादी राजवटीत लोकांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले, अनेक नरसंहार करण्यात आले. त्यांना त्यावेळी तर वाचा फुटली नाही मात्र आज त्यांचे पुरावे समोर येत आहेत. आपल्या या रक्तरंजित इतिहासाचा सामना करणे हे आज रशियासमोरचे आव्हान ठरले आहे.

काही महिन्यांपूर्वी रशियातील सायबेरिया भागात विताली क्वाशा नावाच्या व्यक्तीला आपल्या घराचा विस्तार करायचा होता. त्यावेळी पाया खणण्यासाठी त्यांना खोदकाम सुरू केले आणि त्यांना जे दिसले त्यामुळे त्यांची गाळणच उडाली. त्यांना एका खड्ड्यात पुरलेल्या कवट्या, हात-पाय आणि अस्थिपंजराच्या हाडांचे अवशेष मिळाले. त्यांनी आणखी खोदायला सुरूवात केली तेव्हा आणखी अवशेष मिळत गेले. आज त्यांच्या बागेत 10 पोती भरून असे हाडांचे अवशेष ठेवले असून ते 60 पेक्षा जास्त लोकांचे आहेत.

क्वाशा यांनी लगेचच सरकारी तपासणी समितीच्या तज्ञांना बोलावले. त्यांच्या मते क्वाशा यांच्या बागेखाली कदाचित 1930च्या दशकातील एखादी सामूहिक कबर आहे. म्हणजेच कम्युनिस्ट हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन याच्या काळात मारल्या गेलेल्या लोकांची ही कबर होती. क्वाशा हे सध्या 30 वर्षे वयाचे असून स्वतःच्या कुटुंबासोबत ब्लागोवेशचेंस्क येथे राहतात. ही जागा चीनच्या सीमेला लागून असलेल्या रशियाच्या अतिपूर्वेच्या भागात आहे. रशियाच्या अन्य भागांप्रमाणेच येथेही जोसेफ स्टॅलिनच्या राजवटीत सरकारच्या विरोधकांना येथे मोठ्या संख्येने गोळ्या घालण्यात आल्या होत्या.

रशियाची राजधानी मॉस्को दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात एक “नावांचे पुनरागमन” नावाचा कार्यक्रम होतो. याची सुरूवात 12 वर्षांपूर्वी झाली. यात 1936 ते 1938 या काळात स्टॅलिनच्या दडपशाहीला बळी पडलेल्यांचे स्मरण केले जाते. ‘मेमोरियल’ नावाच्या मानवाधिकार संस्थेसाठी काम करणाऱ्या नतालिया पेत्रोवा नावाच्या कार्यकर्तीच्या मते, “हा आमचा भयानक इतिहास आहे आणि हा विसरता कामा नये.” खुद्द पेत्रोवाच्या आजोबांनाही त्या काळात मारून टाकण्यात आले होते.

साम्यवादी क्रांतीचा नेता व्लादिमीर लेनिन याच्यानंतर स्टॅलिनने सत्ता सांभाळली. मात्र लेनिनच्या काळात सुरू झालेली दडपशाहीची पद्धत त्याच्या काळात आणखी तीव्र झाली. स्टॅलिनकडे सोव्हिएत संघाचे नेतृत्व 1928 ते 1953 असे तब्बल 25 वर्षे होते. त्याच्या काळात रशियात साधे मत व्यक्त करण्याचेही स्वातंत्र्य लोकांना नाकारले गेले. स्टॅलिनच्याच पुढाकाराने सोव्हिएत संघाची घटना तयार करण्यात आली. सोव्हिएत संघात समाविष्ट असलेल्या प्रत्येक वांशिक अन् राष्ट्रीय गटाचे वैविध्य टिकवण्याचे उत्तरदायित्व स्टॅलिन यांनी स्वीकारले. त्या घटनेप्रमाणे संपूर्ण देशावर बोल्शेविक पक्ष आणि केंद्र सरकार यांचे थेट नियंत्रण ठेवण्यात स्टॅलिन यशस्वी झाले. पक्षशुद्धी मोहिमेत हजारो सहस्रो विरोधकांना त्याने यमसदनी पाठवले. अशा प्रकारे किमान 3० लाख विरोधकांची कत्तल केल्याचा दोष त्याला दिला जातो. म्हणूनच सहस्रो विरोधकांचे निर्दालन करणारा ‘नरराक्षस’ असे त्याला म्हटले जाते. तसेच दुसर्‍या महायुद्धात सोव्हिएत संघाची जी अपार हानी झाली त्याचे कारणही स्टॅलिनचे नेतृत्व असल्याचे मानले जाते.

त्याचा एवढा कळस झाला, की खुद्द त्याच्या कन्येने म्हणजे स्वेतलानाने आपल्या रशियन पासपोर्टची जाहीर होळी करीत आपल्या पित्याच्या उल्लेख ‘नैतिक, आध्यात्मिक दानव’ असा केला होता. त्यावेळी तिने तिच्या या कृतीमुळे संतापलेल्या रशियाने तेव्हा तिचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा आरोप केला होता. अखेर स्वेतलानाने आधी भारतात व मग अमेरिकेत आश्रय घेतला होता.

अशा या निर्दयी सत्ताधाऱ्याच्या काळात रशिया महासत्ता म्हणून पुढे आला, मात्र तेथील जनता नरकवासात जीवन कंठत होती. त्याच्या अनेक जुलुमांची कहाण्या त्यावेळीही समोर आल्या होत्या. आता त्यांना परत तोंड फुटत आहे.

Leave a Comment