पुन्हा टिपू सुलतान – ज्याचे राज्य त्याचा इतिहास


गेली काही वर्षे वादग्रस्त ठरलेला म्हैसूरचा सुलतान टीपू याचा इतिहास पाठ्यपुस्तकातून हटवण्याचा निर्णय राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण आणि खरा इतिहास हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्याच सोबत सत्ताधाऱ्यांना अनुकूल इतिहास लिहून तो विद्यार्थ्यांना शिकविण्याचा मुद्दाही त्यामुळे समोर आला आहे.

सुमारे पाच वर्षांपूर्वी राजस्थानातील काँग्रेस सरकारने शालेय अभ्यासक्रमातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतचा मजकूर बदलला होता. हा मजकूर मागील भाजप सरकारच्या काळात घालण्यात आला होता आणि त्यात सावरकर यांचे वर्णन स्वातंत्र्यवीर, महान देशभक्त व महान क्रांतिकारक असे करण्यात आले होते. मात्र काँग्रेस सरकारने त्याला काट देत त्यांना स्वातंत्र्यवीर न म्हणता तुरुंगातील छळाला घाबरून ब्रिटिश सरकारकडे दयेची याचना करणारा म्हटले. हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान असल्याचे भाजपने तेव्हा म्हटले होते.

आता हाच कित्ता कर्नाटकात गिरवण्यात आला आहे. फक्त यात भूमिकांची आलटापालट झाली आहे आणि मजकुरातील पात्रांचीही! येथे स्वा. सावरकरांऐवजी टिपू सुलतान आला आहे. सरकारने शालेय अभ्यासक्रमात पालट करण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील पाठ्यपुस्तकांमध्ये टिपू सुलतानशी संबंधित जे काही लिहिले आहे ते सर्व हटवण्याचा विचार केला जाणार आहे, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी जाहीर केले आहे. भाजपचे आमदार अप्पाचु रंजन यांनी पाठ्यपुस्तकांमधून टिपू सुलतानशी संबंधित असलेले धडे काढण्याची मागणी केली होती. त्यावर शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी संबंधित अधिकार्‍यांना टिपू सुलतानशी निगडित असलेले धडे पाठ्यपुस्तकातून हटवण्यासाठी अहवाल सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे.

कर्नाटकात दर वर्षी 10 नोव्हेंबरला टिपू सुलतानची जयंती साजरी केली जाते. धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेस सरकारच्या काळात त्याला विशेष जोर आला होता. मात्र त्यावरून वादही होतात. टिपू हा देशद्रोही आणि धर्मांध होता, अशी हिंदुत्ववादी पक्षांचा प्रमुख आक्षेप होता. भाजप व अन्य संघटना हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळत होतात. टिपू सुलतान याने कोडगु येथे हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर घडवून आणले होते, तर दक्षिण कन्नडमध्ये ख्रिस्त्यांचे धर्मांतर केले होते, असा आरोप या संघटनांनी केला होता.

त्यावरून भाजप व अन्य संघटनांनी खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावरही निशाणा साधला होता. “टिपू सुलतान इंग्रजांच्या विरोधात युद्ध करता करता हुतात्मा होणारा योद्धा होता. त्याने रॉकेटच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि युद्धात त्याचा उत्तमप्रकारे उपयोग केला,” असे गौरवोद्गार राष्ट्रपती कोविंद यांनी 60 व्या वर्धापनदिनानिमित्त विधीमंडळाच्या संयुक्त अधिवेशनात काढले होते. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारमधील तत्कालीन मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी टिपूला क्रूर आणि बलात्कारी संबोधून त्याच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी ‘मला आमंत्रित करू नये’, असे म्हटले होते. तसेच खासदार सुब्रह्मण्यम् स्वामी यांनीही टिपूला ‘खुनी’ म्हटले होते. त्यामुळे राज्य सरकारने कोविंद यांना चुकीची माहिती दिल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला होता.

त्यामुळेच मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मे महिन्यात सत्ता हाती येताच कन्नड आणि सांस्कृतिक विभागास टिपू सुलतान जयंती साजरी न करण्याचे आदेश दिले होते. जुलै महिन्यात त्या आदेशाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमती देण्यात आली होती.तरीही टीपू सुलतानचे कौतुक करणारा “तो” मजकूर शालेय पुस्तकात तसाच राहिला होता. आता हे लिखाण काढायचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. “काँग्रेस सरकारच्या काळात मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी अत्यंत क्रूर, धर्मांध आणि असहिष्णू असलेल्या टिपू सुलतानला ‘म्हैसूरचा सिंह’, ‘चांगला शासक’ आणि ‘स्वातंत्र्यसेनानी’ अशी बिरुदे चिटकावण्यात आली. विद्यार्थ्यांना त्याचा खोटा इतिहास शिकवण्यात येत होता. अशा टिपू सुलतानचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकातून वगळण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या निमित्ताने ‘टिपू सुलतान एक्सप्रेस’चे नाव पालटून महान ‘राजा कृष्णराज वडियार’ यांचे नाव द्यावे,” अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी म्हटले आहे. राज्यातील भाजप सरकारचा कल पाहता ही मागणी पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता आहे.

परंतु या सर्वातून जे तात्पर्य निघते ते वेगळेच आहे. स्वा. सावरकर किंवा टीपू सुलतान कसे होते याचे मूल्यमापन इतिहास करेल. मात्र सत्ताधाऱ्यांना ते अडचणीचे वाटतात म्हणून त्यांना रजा देण्यात येते, ही वस्तुस्थिती आहे. सत्ताधारी पक्षाच्या हिशेबानेच आता विद्यार्थ्यांना इतिहास शिकावा लागणार, हेच तात्पर्य यातून निघते.

Leave a Comment