सरदारही गांधीजींच्या मार्गावर? - Majha Paper

सरदारही गांधीजींच्या मार्गावर?


सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती पुन्हा आली आणि पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने वाहिली. प्रथेप्रमाणे मोदी यांना त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीही मनःपूर्वक साथ दिली. सरदार पटेल महानच होते आणि देशाला एका धाग्यात बांधण्यात त्यांनी कोणतीही कसूर ठेवली नाही, हे खरे आहे. त्यामुळे आदर आणि प्रेमाने त्यांची आठवण काढण्यात काहीही चूक नाही. मात्र त्यात एक गोम आहे. सरदार पटेलांचा उपयोग सत्तेचे सोपान म्हणून होत आहे आणि त्या अर्थाने सरदार पटेलांची वाटचाल गांधीजींच्या मार्गाने होत आहे.

सरदार पटेल यांच्या दृष्टीने सत्ता नगण्य होती. त्यांच्या मनात आले असते, तर स्वातंत्र्यानंतर ते देशाचे पंतप्रधानही होऊ शकले असते. मात्र तसे करण्याऐवजी त्यांनी या देशाच्या निर्माणात योगदान देणे पसंत केले. विविध संस्थांनांचे एकीकरण करून एका देशाची निर्मिती केली. या देशात कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्याचे श्रेयही सरदारांनाच जाते. हा देश आज ज्या व्यवस्थेवर चालतो ती व्यवस्था सरदार पटेलांनी दिलेली आहे. सरदारांकडे या देशाच्या जडणघडणीच दृष्टी होती आणि ती प्रत्यक्षात करण्यासाठी त्यांनी सत्तेची पर्वा न करता कार्य केले.

पटेल यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर अवघ्या 40 दिवसांत 560 संस्थाने भारतात विलीन करून घेताना पटेल यांनी दाखवलेली धडाडी प्रशंसनीय होती. सन 1947 मध्ये खरा प्रश्न भारताची फाळणी कशी रोखावी हा नव्हता, तर 565 संस्थाने कशी विलीन करून घ्यावीत हा होता. भारतात आल्यावर व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी म्हटले होते की, लंडनमध्ये असताना मला संस्थानांची समस्या किती अवाढव्य व गंभीर आहे, याची पुसटशीही कल्पना देण्यात आली नव्हती. असे असतानाही पटेलांनी हे आव्हान लीलया पेलले आणि संस्थांनांचे एकीकरण करून दाखवले. मात्र सरदार पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने पटेलांच्या कर्तबगारीची चर्चा कमी होते, काँग्रेसला शिव्या जास्त दिल्या जातात. पटेलांच्या जयंतीच्या निमित्ताने राजकीय गोष्टीच जास्त होतात.

याचे कारण म्हणजे काँग्रेसजनांनी गांधीजींचा उपयोग सत्तेची शिडी म्हणूनच केला. काँग्रेसने त्यांचे नाव राजकीय लाभासाठी वापरले आणि प्रत्यक्षात महात्मा गांधींची धोरणे धाब्यावर बसवली. महात्मा गांधींनी मँचेस्टरच्या कपड्यांवर बहिष्कार घातला कारण महिलांचे सशक्तीकरण आणि स्वातंत्र्यलढ्याचे साधन म्हणून त्यांनी खादीचा वापर केला. खादीमार्फत प्रत्येक घरात रोजगार उपलब्ध करुन देण्याचा गांधीजींचा हेतू होता. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसने त्या धोरणाला मूठमाती दिली. काँग्रेसची सत्ता आल्यानंतर खादी ही हळूहळू भ्रष्ट राजकीय नेत्यांचा पोशाख मानली जाऊ लागली. साधी राहणी व उच्च विचारसरणी ही गांधीजींची तत्त्वे कधीच मागे पडली.

आज तेच सरदार पटेलांच्या बाबत होत आहे. भाजप आज काँग्रेसच्या मार्गानेच जात आहे. सरदार पटेल हे कोणत्याही ओळखीचे मोताज नाहीत. त्यांनी देशासाठी जे केले ते अन्य कोणीही करू शकले नसते. मात्र काँग्रेसजनांनी सरदार पटेलांकडे साफ दुर्लक्ष केले. काँग्रेसची वर्तणूक अशी होती, की जणू वल्लभभाई पटेल नावाची कोणी व्यक्ती अस्तित्वातच नव्हती. आता भूमिकांची अदलाबदल झाली असून भाजपने हेच काम पटेलांच्या नावाने सुरू केले आहे. नेहरू गांधी घराण्याला एका कोपऱ्यात सारून पटेलांच्या त्यांचा पर्याय म्हणून उभे करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.

पटेलांच्या जयंतीच्या दिवशीच दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी होती. म्हणजे 31 ऑक्टोबर हा वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांचे स्मरण करण्याचा दिवस. पण सर्व वर्तमानपत्रांत फक्त सरदारांचीच जाहिरात आहे. इंदिराजींचा कुठेच उल्लेख नव्हता. पंतप्रधान मोदींनी केवळ एका ओळीचे ट्वीट करून इंदिराजींना श्रद्धांजली वाहिली. ” देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र श्रद्धांजली!” बस! जी कंजूसी काँग्रेसने आजवर महात्मा गांधी वगळता अन्य नेत्यांबाबत दाखवली तीच आज भाजप दाखवत आहे. हे सगळे सत्तेसाठी!

Leave a Comment