पाकिस्तानी सैनिक की पाकिस्तानचे दहशतवादी?


पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी दिले जात आहे, ही गोष्ट आता जगजाहीर झाली आहे. पाकिस्तानची ही दहशतवादी नीती ही-वळ भारताची नव्हे तर जगाचीही डोकेदुखी बनली आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांकडून त्यासाठी पाकिस्तानवर दबावही आहे आणि त्याला सुधरण्याची तंबीही देण्यात आली आहे. परंतु कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे या न्यायाने पाकिस्तान काही सुधरायला तयार नाही. आता जगाच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी त्याने एक नवाच मार्ग अवलंबला आहे.

पाकिस्तानवर लक्ष ठेवून असलेल्या परदेशी पर्यवेक्षकांना फसवण्यासाठी तेथील सैन्याने दहशतवाद्यांना सैन्याचा गणवेश घालण्याची सूचना केली आहे, असे भारतीय गुप्तचर संस्थांचे म्हणणे आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर नियंत्रण रेषेवरील दहशतवादी लॉन्च पॅड्स लपवून ठेवण्यासाठी पाकिस्तान सैन्याने खेळी खेळली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष जाऊ नये आणि हे दहशतवादी ओळखू येऊ नयेत, यासाठी त्यांना पाकिस्तानच्या सैनिकांचे गणवेश घालण्यास सांगण्यात आले आहे, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे.

“नियंत्रण रेषेवरील दहशतवादी लाँच पॅड लपवण्याची पाक सैन्याची योजना आहे. दहशतवादी चटकन ओळखू येऊ नयेत यासाठी पाकिस्तानच्या सैनिकी गणवेशात वावरण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. विशेषतः युरोपीय महासंघाच्या संसद सदस्यांच्या शिष्टमंडळाने नुकताच जम्मू-काश्मिरचा दौरा केला. त्यादृष्टीने ही उपाययोजना करण्यात आली आहे. पाकिस्तानी सैन्याने दहशतवादी गटांना पाकिस्तानी सैन्याच्या तळांच्या आसपासच्या लाँच पॅडवर सैन्य गणवेश घालावे, अशा सूचना दिल्या आहेत,” असे सरकारी सूत्रांनी वृत्तसंस्थांना सांगितले.

पाकिस्तानी सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या सूचनांचे पालन करावे आणि जमिनीवर दहशतवादी संघटनांकडून त्याची अंमलबजावणी करून घ्यावी, अशाही सूचना उच्च पातळीवरून देण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानला लागून भारताची 1098 किलोमीटर सीमा आहे. या सीमेवर असलेल्या, विशेषतः नियंत्रण रेषेवर (एलओसी) असलेल्या, पाकिस्तानी चौक्या दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र आणि लाँच पॅड म्हणून काम करतात. पाकव्याप्त काश्मिरमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर भारतीय भागात त्यांना पाठवण्यापूर्वी काही काळ सीमा चौक्या आणि बंकरमध्ये ठेवले जाते. यांनाच लाँचिंग पॅड म्हटले जाते. या आघाडीवरील चौक्यांमध्ये दहशतवाद्यांना प्रगत प्रशिक्षण दिले जाते व नंतर गाईडच्या मदतीने त्यांना भारतात पाठवले जाते, असे सांगितले जाते. या लाँच पॅडमध्येही दहशतवाद्यांना भारतीय लष्करावर गोळीबार करणे शिकवले जाते. काही कारणाने हे दहशतवादी भारतात शिरू शकले नाहीत तरी उत्तर आश्रयस्थळ म्हणून ते कार्य करतात. अर्थात ही माहिती तशी जुनीच आणि दीर्घकाळापासून याबाबत बोलले जाते. मात्र भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताकडून कारवाईला वेग आला आहे.

एलओसीवर पाकिस्तानकडून गोळीबाराला उत्तर देण्यासाठी आता तोफखान्याचाही मुक्तहस्ते वापर करण्यात येत आहे. जेव्हा जेव्हा पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा भारतीय लष्कर आपल्या मर्जीप्रमाणे आणि वेळी त्यांना प्रत्युत्तर देण्याचा अधिकार राखून ठेवत आहे, असे लष्कराने आधीच स्पष्ट केले आहे. म्हणूनच पूंछ आणि राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीला मदत करत असलेल्या पाकिस्तानी तळांना लक्ष्य करण्यासाठी भारताने तोफांचा मारा केला होता. अलीकडेच अटक करण्यात आलेल्या आणि मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या ताब्यातून जी कागदपत्रे हस्तगत झाली त्यानंतर अशा चौक्यांवरील मारा अधिक तीव्र झाला आहे.

त्यामुळेच दहशतवाद्यांना थेट आपल्या सैनिकंचे स्वरूप देण्याचा डाव पाकिस्तानने खेळळा आहे. भारताने त्यांच्यावर कारवाई केली तर त्याला भारताकडून झालेला हल्ला असे रूप देणे त्यामुळे पाकिस्तानला सोपे होईल. यापूर्वीही पाकिस्तानने हा डाव खेळला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केवळ दोन महिन्यांनी, ऑक्टोबर 1947 मध्ये, पाकिस्तानने काश्मीर बळकावण्यासाठी टोळीवाल्यांच्या वेशात आपले सैनिक काश्मीरमध्ये घुसवले होते. पाकिस्तानी लष्करशहांनी काश्मीरमध्ये धार्मिक आतंकवादाला सतत प्रोत्साहन देऊन तो प्रदेश अशांत ठेवला आणि दहशतवादाला खतपाणी घातले. आता जगाने दहशतवादाविरुद्ध पावले उचलण्यास सुरूवात केल्यामुळे त्याला ते उघडपणे करता येत नाही. म्हणूनच त्याने दहशतवाद्यांना थेट आपले गणवेश घालण्याची मुभा दिली आहे, किंबहुना तशी सक्ती केली आहे. अर्थात ज्या देशाचे धोरणच दहशतवादाचे आहे त्याचे सैनिकही दहशतवादीच असणार!

Leave a Comment