‘हा’ आहे देशाचा ‘रबर बॉय’


सुरत – तुम्हाला या पठ्ठ्याची लवचिकता बोटे तोंडात घालायला लावणारी आहे. यश शहा असे या पठ्ठ्याचे नाव असून तुम्ही त्याला कोणताही नंबर सांगा, लागलीच यश त्याची मान आणि सांधे त्या आकारात वाकवून दाखवेल. येथील १८ वर्षीय यश, ज्याने आताच त्याची १२वीची परिक्षा दिली आहे, या अचंबित करणाऱ्या करामती तो केवळ व्हिडिओ आणि टीव्हीत बघून शिकला आहे. तोंडाचा आ वासून लावणाऱ्या त्याच्या सांध्यांच्या लवचिकतेमुळेच सुरतमध्ये तो रबर बॉय म्हणून प्रसिद्ध झाला आहे.

यशचा सुरतच्या नागरिकांना जरी हेवा वाटत असला तरी, यश हा जनुकीय विस्कळीतपणाच्या त्रासातून जात आहे, ज्यामध्ये सांधे अधिकच लवचिक बनतात असा दावा यशची तपासणी करणाऱ्या डॉ. राजीव चौधरी यांनी केला आहे.असे असले तरीही, यशला मात्र आता त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्याचे वेध लागले आहेत. यशने दोन-अडीच वर्षांपूर्वी हिस्ट्री चॅनलवर सुपर ह्युमन शोमध्ये हायपर फ्लेक्झिबल डॅनिएल ब्राउनी स्मिथला पाहिले होते. तो त्याची ही अद्भुत कला पाहून भारावून गेला. आपल्यालाही असेच काहीतरी थक्क करणारी गोष्ट करायची आहे, या ध्येयाने त्याला झपाटले. यानंतर अथक परिश्रम. जिद्द, चिकाटी आणि घरच्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर यशने आजपर्यंतचे जबरदस्त यश मिळवले.

यशने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणारच नव्हते. पण अभ्यास आणि व्यायाम यांचा योग्य मेळ साधत त्याने ही कला आत्मसात केली. दोन वर्षांत त्याने केलेली प्रगती तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. सध्या जसप्रित सिंग यांच्या नावावर हायपर फ्लेक्झिबिलिटीचा राष्ट्रीय विक्रम आहे. यशचा हा विक्रम मोडायचा मानस आहेच, पण ज्याच्याकडे पाहून तो ही कला शिकला, त्या डॅनिएलचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडायचेही त्याचे स्वप्न आहे.

Leave a Comment