शिवसेनेसोबत न जाता काँग्रेसने जनमत मान्य करुन विरोधात बसावे


मुंबई – काँग्रेस पक्ष हा सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष असल्यामुळे शिवसेनेसोबत काँग्रेसने मुळीच जाऊ नये अशी भूमिका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली आहे. काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याच्या भूमिकेला त्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. काँग्रेसने जनमत मान्य करुन विरोधात बसावे असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस हा सर्वधर्मसमभाव मानणारा असल्यामुळे काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा या दोहोंमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत काँग्रेसने जाऊ नये असे माझे स्पष्ट मत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष निवडणुकीच्या धामधुमीत थकले असल्याचे वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते. त्यांच्यावर त्यावरुन टीकाही करण्यात आली. सुशीलकुमार शिंदे यांना शरद पवार यांनीही खडे बोल सुनावले होते. विरोधकांना चेहरा देऊन शरद पवार यांनी झंझावाती प्रचार केला. निवडणूक निकालात त्याचा परिणाम दिसून आला. राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या आणि काँग्रेसच्याही जागा वाढल्या. भाजपचा अब की बार २२० पार हा नारा हवेत विरला. १०५ जागांवर भाजपला तर ५६ जागांवर शिवसेनेला समाधान मानावे लागले. दोन्ही पक्षांच्या जागा २०१४ च्या तुलनेत घटल्या. आता महायुतीला जनतेने कौल दिला आहे. पण शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे.

अशात शिवसेनेला आता काँग्रेसने पाठिंबा देऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची तयारी सुरु केल्याचे सूत्रांकडून समजते आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा देऊ नये असे म्हटले आहे. त्याचबरोबर आपल्या विचारधारा वेगळ्या असल्याचे लक्षात ठेवावे आणि जनमताचा आदर करावा असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment