येडियुरप्पा मागतात एक, कुमारस्वामी देतात दोन…!


महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना चांगले यश मिळाले. मात्र या पक्षांनी गेली पाच वर्षे विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम केले नाही, अन्यथा ते सत्तेवरही आले असते असा एक सर्वसाधारण सूर आहे. निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन कर्नाटक पॅटर्ननुसार सरकार स्थापन करावे, असाही एक सूर उमटला. मात्र याच वेळेस खुद्द कर्नाटकात वेगळेच नाट्य रंगले आहे. गेली दीड-एक वर्षे या राज्यात राजकीय प्रसंगाचे अनेक वळणे लोकांनी पाहिली, परंतु त्यावरही कडी करणारे वळण आता आले आहे.

कर्नाटकात विरोधी पक्षाने सरकारशी जुळवून घेण्याचे ठरवले आहे. ज्यांचे सरकार घालवून भारतीय जनता पक्षाने सत्ता हस्तगत केली त्याच पक्षाने आपण सरकारला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील लोक भीषण पूरात अडचणीत सापडले आहेत त्यामुळे राज्यातले भाजपा सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न आपण करणार नाही, असा निर्वाळा माजी मुख्यमंत्री आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे ( जेडीएस) नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.

राज्यात सध्या पूर आला असून पूरग्रस्त बेळगाव जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर सोमवारी माध्यमांना संबोधित करताना कुमारस्वामी म्हणाले, की कर्नाटकात सध्याच्या परिस्थितीत मुदतपूर्व निवडणुका घेणे योग्य होणार नाही. डिसेंबरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीनंतर जेडीएस भाजप सरकारला पाठिंबा देईल की नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले, की अशी परिस्थिती उद्भवल्यास व राज्य सरकार कोसळल्यास आपण योग्य भूमिका घेऊ मात्र सरकारवर टीका करणार नाही कारण पूरग्रस्तांसाठी उपाययोजना करण्यासाठी सरकारला थोडा वेळ दिला जावा, असे ते म्हणाले.

अर्थातत भाजपसाठी आपल्या मनात कोणताही कोपरा नाही, हेही कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले. ‘मी लोकांच्या बाजूने लढा देत आहे आणि जे लोकांचे काम करतात त्यांना मी पाठिंबा देईन. माझ्या मनात भाजप सरकारसाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी मऊ कोपरा आहे. भाजपशी हातमिळवणी करू असे मी कधीही म्हटले नाही, ‘असेही ते पुढे म्हणाले.

कुमारस्वामी असे म्हणत असले तरी त्यांची पावले भाजपकडे सरकत आहेत, हे उघड गुपित आहे. कारण भाजप सरकारला थोडा वेळ द्यावा असे म्हणत असतानाच त्यांनी माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना लक्ष्य केले. ‘परिपूर्ण धर्मनिरपेक्ष माणूस’ असा त्यांचा उपरोधिक उल्लेख करून त्यांनी सिद्धरामय्यांची खिल्ली उडवली. सिद्धरामय्या यांच्यासारखे नेते बिनशर्त पाठिंब्याचे आश्वासन देत सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या उंबरठ्यावर आले होते, मात्र त्यांनीच आपल्या नेतृत्वाखालील सरकारवर बंधने लादली होती, अशी सल त्यांनी बोलून दाखवली.

कुमारस्वामी यांचे हे आघाडी सरकार या वर्षाच्या जुलैमध्ये कोसळले होते. कर्नाटकातील सर्व लिंगायत बी. एस. येडियुरप्पा यांना अनुकूल नाहीत आणि सर्व वोक्कलिगा कुमारस्वामींच्या बाजूने नाहीत, असे वक्तव्य सिद्धरामय्या यांनी केले होते. त्याला उत्तर म्हणून कुमारस्वामींनी हा निशाणा साधला. “मला वाटतं सिद्धरामय्या धर्मनिरपेक्ष नेते आहेत आणि आम्ही जातीयवादी आहोत,” असे ते म्हणाले.

राज्यातील गोरगरीबांना मोफत तांदूळ वाटल्याचा दावा सिद्धरामय्या यांनी केला होता. त्यालाही कुमारस्वामी यांनी आक्षेप घेतला. जेडीएस -कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळात आपल्याला या योजनेसाठी 800 कोटी रुपये जमा करण्यासाठी संघर्ष करावा लागला, असे त्यांनी स्पष्ट केले.

या सर्वातून एक स्पष्ट होते, की कर्नाटकातील राजकारणाला वेगळे वळण मिळत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हातमिळवणी केलेल्या काँग्रेस-जेडीएसमध्ये दुरावाच नव्हे तर वितुष्ट आले आहे. म्हणूनच येत्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा कुमारस्वामींनी केली आहे. विरोधी पक्ष म्हणून जेडीएस व काँग्रेस कमजोर ठरावेत ही इच्छा येडियुरप्पांच्या मनात असेल. ती तर पूर्ण झालीच वर जेडीएस पक्षच भाजपच्या दिशेने येत आहे. हे म्हणजे भाजप व येडियुरप्पा यांच्या दृष्टीने ‘आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन,’ असे झाले आहे.

Leave a Comment