स्वबळावर सत्ता स्थापन करणार भाजप ?


मंबई – शिवसेनेने राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा हट्ट कायम ठेवल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप स्वबळावर सरकार स्थापन करेल, अशी धक्कादायक माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत्या 30 तारखेला मुंबईच्या दौऱ्यावर येत असून ते यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची औपचारिकताही पूर्ण करण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप एकटे सरकार कसे स्थापन करते ते पाहू, असा इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

भाजप-शिवसेना संघर्ष विधानसभेचा निकाल लागल्यापासून विकोपाला गेल्याचे दिसत आहे. भाजपला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 105 जागा मिळाल्या तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या. परंतु, दोन्ही पक्षांमध्ये समसमान अधिकारांचे सूत्र युती करण्याआधी ठरल्यामुळे शिवसेनेला पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. ही अट भाजपला मान्य नाही. शिवसेनेने अन्यथा इतर पर्यायांचा विचार करण्याचा इशारा दिला असला तरी काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षातच बसण्याचे जाहीर केल्यामुळे शिवसेनेची पंचाईत झाली आहे.

अपक्ष तसेच इतर लहान पक्षांच्या 20 सदस्यांचा अशा परिस्थितीत पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. शिवसेनेशिवाय सत्तास्थापनेच्या रणनितीवर आपल्या सहकाऱ्यांशी गेल्या चार दिवसांपासून चर्चा सुरू केली आहे. मागच्या निवडणुकीत 122 संख्याबळ असलेल्या भाजपने आधी सरकार स्थापन केले. त्यानंतर आपल्या शर्तींवर शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले. त्याचप्रमाणे आताही तसे प्रयत्न चालु आहेत.

भाजप अध्यक्ष अमित शहा येत्या 30 ऑक्टोबरला मुंबईत येत आहेत. दुपारी एक वाजता विधानभवनात भाजपच्या आमदारांची बैठक होत आहे. त्यात भाजपचा विधिमंडळ नेत्याची औपचारीक निवड केली जाईल. यावेळी शाह उपस्थित राहतील. त्यानंतर भाजपचे नेते सर्वात मोठा पक्ष या नात्याने राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा सादर करतील, असे कळते.

30 आक्टोबरला अमित शहा मातोश्रीवरही जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतील अशी माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी त्यांच्यासोबत असतील. त्यामध्ये वाटाघाटी यशस्वी झाल्या तर शिवसेनेला सोबत घेत सरकार स्थापन करतील. अथवा ती एक औपचारिकता ठरेल, असे सूत्रांनी सांगितले आहे.

Leave a Comment