हरियाणात शहानीती यशस्वी…


एखाद्या विद्यार्थ्याला गुणवत्ता यादीत (मेरिट लिस्ट) येण्याची आशा असावी आणि त्याला साधे उत्तीर्ण होणेही अवघड व्हावे, अशी स्थिती हरियाणात भारतीय जनता पक्षाची झाली. विधानसभेत एक तृतीयांश जागा मिळविण्याचे मनसुबे रचणाऱ्या भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी अन्य पक्षांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ आली. अखेर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या शिष्टाईनंतर भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे.

हरियाणातील जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) नेते दुष्यंत चौटाला यांनी अखेर भाजपशी हातमिळवणी केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री असतील. स्वतः शहा यांनी ही माहिती दिली. हरियाणाच्या लोकांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी भाजप-जेजेपी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे शहा म्हणाले. मुख्यमंत्री भाजपचे असतील आणि उपमुख्यमंत्री जेजेपीचे असतील. याचाच अर्थ दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री असतील. राज्यातील नवे सरकार येत्या काही दिवसांत शपथ घेण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 10 पैकी 10 जागा जिंकत भाजपने एकहाती राजकीय वर्चस्व मिळवले होते. त्यामुळे तीच कामगिरी भाजप पुन्हा करेल, अशी पक्षनेत्यांची आणि राजकीय निरीक्षकांचे मत होते. परंतु महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणातही मतदारांनी भाजपला चकवा दिला आणि बहुमतापासून वंचित ठेवले.

हरियाणाच्या विधानसभेत 90 सदस्य असून भाजपला 40 जागा मिळाल्या आहेत, पण सत्ता स्थापनेसाठी भाजपला आणखी पाच जागा हव्या आहेत. जेजेपीला 10 जागा मिळाल्या आहेत तर अपक्ष 8 आमदार आहेत. त्यामुळे अपक्षांची मदत घ्यायची किंवा जेजेपीची, हा एकमेव पर्याय भाजपपुढे आहे. काँग्रेसने जेजेपीच्या साथीने सरकार स्थापन करू नये, यासाठी भाजपने म्हणूनच त्वरेने हालचाल केली.

दुष्यंत चौटाला शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री असलेल्या शहा यांच्या घरी पोचले. केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकुर हे दुष्यंत यांच्या सोबत होते. हरियाणा भाजप अध्यक्ष सुभाष बराला यांनाही शहा यांनी निवासस्थानी बोलावले होते. तेव्हा दुष्यंत आणि भाजप नेत्यांमध्ये एक तोडगा निघाला. त्यानुसार या नव्या सरकारचे नेतृत्व मनोहरलाल खट्टर करतील. शहा यांच्या घरी भाजप नेत्यांच्या बैठकीत जेजेपीचे प्रमुख असलेले चौटाला यांच्या मागणीवर विचार करण्यात आला, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

शहा यांच्या निवासस्थानी बरीच भवति न भवति झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा झाली.

हरियाणाच्या लोकांच्या हितासाठी मजबूत व स्थिर सरकार स्थापन करू शकेल, अशाच पक्षाशी आपण युती करणार असल्याचे चौटाला यांनी शुक्रवारी म्हटले होते. हरियाणातील सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक युवकांना 75 टक्के आरक्षण, वृद्धांसाठी निवृत्तीवेतनात वाढ करणे इत्यादी प्रमुख मागण्या केल्या होत्या. तसेच युती करणार असलेल्या पक्षासोबत सामाईक किमान कार्यक्रम (सीएमपी) करण्याचा उल्लेख केला होता.

दुष्यंत चौटाला हे महत्त्वाकांक्षी आणि तरुण नेते म्हणून ओळखले जातात. हरियाणाचे दिग्गज नेते चौधरी देवीलाल यांचे ते पणतू. हिसार लोकसभा मतदार संघातून त्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून सगळ्यात तरुण खासदार होण्याचा मान मिळवला होता. गेल्या वर्षी वडिलांबरोबर भांडण झाल्यामुळे भारतीय लोकदलातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर दुष्यंत यांनी जेजेपीची स्थापना केली. अशा या नेत्याला आपल्या बाजूने वळवण्यात शहा यांनी सर्व कौशल पणाला लावले असेल, यात शंका नाही.

गंमत म्हणजे दुष्यंत यांच्या या मागण्या मान्य असल्याचे हरियाणा काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांनी जाहीर केले होते. दुष्यंत यांच्याकडे आणखी काही सूचना असतील तर त्याही त्यांनी जाहीर कराव्यात, असेही त्यांनी म्हटले होते.

काँग्रेसचे 31 आमदार निवडून आले आहेत आणि राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला जेपीच्या 10 आमदारांशिवाय किमान 5 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. हे काम अवघड नाही तरी अशक्यही नाही. म्हणूनच भाजपने वेगाने हालचाली करून सत्तेसाठी दावा केला आहे. आपला पाठिंबा भाजपने घेतला नाही तर तो अपक्षांसोबत जाऊ शकतो, हे ताडून दुष्यंत यांनीही युती करण्याचा निर्णय घेतला आहे.आता हे युतीचे सरकार दीर्घकाळ चालावे आणि हरियाणात सुशासन यावे, हीच अपेक्षा!

Leave a Comment