…पण हरले ते एक्झिट पोलच!


महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि लोक आपापल्या कामाला लागण्यास मोकळे झाले. निवडणुकीत हार-जीत चाखलेले राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्तेही मनसोक्तपणे फटाके फोडू शकतील, फराळाचा आस्वाद घेऊ शकतील इत्यादी. यंदाच्या निवडणुकीच्या निकालाची गंमत अशी, की कार्यकर्ता वा नेता कोणत्याही पक्षाचा असो त्याला दिवाळीचा आस्वाद घेण्यात आडकाठी येणार नाही. कारण सत्ताधाऱ्यांची सत्ता राहिली, विरोधकांची ताकद वाढली आणि मतदान यंत्रांबाबत संशय घेणारेही तोंडघशी पडले.

मात्र तोंडघशी पडणाऱ्यांमध्ये केवळ मतदान यंत्रांचे टीकाकारच नव्हे. जवळपास तीन-चार दशकांनंतर आपली कारकीर्द पूर्ण करून सत्तेत पुनरागमन करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवा इतिहास रचला. परंतु भारतीय जनता पक्षाला अपेक्षित होते ते यश मिळाले नाही. वास्तविक पाडव्याच्या मुहूर्तावर भाजपची मंडळी पक्षाची खातेवही मांडतील तेव्हा नुकसानच जास्त दिसेल. गेल्या वेळेसच्या तुलनेत फार दगाफटका झाला नाही मात्र झाले ते नुकसान सहजासहजी विसरण्यासारखेही नव्हते. या फसगतीचा अंदाज भाजपला आला असो वा नसो, पण एक्झिट पोल नावाचा तमाशा करणाऱ्यांना तो आला नाही, हेही खरे. म्हणूनच मतदान यंत्रांबाबत संशय घेणाऱ्यांसोबतच एक्झिट पोलचे (मतदानोत्तर चाचण्या) स्वयंघोषित तज्ञही तोंडावर आपटले.

महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा अंदाज वर्तवण्यात एक्झिट पोल सपशेल अपयशी ठरले. या पोलवर ज्यांनी विश्वास ठेवला त्यांची 100 टक्के दिशाभूल झाली असणार, यात शंका नाही. सोमवारी विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर वृत्त वाहिन्यांनी ‘झट के पट’ एक्झिलट पोल जाहीर करायला सुरूवात केली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच एक्झिझट पोल जाहीर करण्याची स्पर्धा वृत्तवाहिन्यांमध्ये लागली होती. अगदी मतदान केंद्रावर मतदार रांगेत उभे असतानाच संध्याकाळी 6 वाजल्यापासून वाहिन्यांनी अंदाजांचा वर्षाव सुरू केला. निवडणूक आयोगाने असे करण्याला बंदी केली असतानाही ते हे करत होते, हे विशेष. सार्वत्रिक निवडणूक हे आपल्या लोकशाहीचे अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पडावी यासाठी मतदानाचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत एक्झ्टि-पोल सर्वेक्षण प्रसिद्ध करू नये. एक्झिट-पोल संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे वृत्तपत्रांनी (माध्यमांनी) पालन करावे, असे प्रेस कौन्सिलनेही आवाहन केले आहे. मात्र ते धाब्यावर बसवण्यात आले.

त्यातील बहुतांश वाहिन्यांनी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता, मात्र भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला बहुमतासाठी एवढ्या धापा टाकाव्या लागतील, हे त्यांच्यापैकी कोणीही सांगितले नव्हते. त्यातील काही जणांनी तर 200-220 जागा मिळतील, असा छातीठोक दावा केला होता.

या एक्झिट पोलच्या पूर्वीही मतचाचण्या सादर करण्यात आल्या होत्या आणि त्यांच्या बाबतीतही अशीच फसगत झाली. निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच मतचाचण्या घेणाऱ्यांनी आपल्या चाचण्यांचे अहवाल बाहेर आणले होते. हल्लीच्या काळात निवडणुकांचे वारे वाहायला लागण्याच्या आधीपासूनच ही चाचणी घेणारी मंडळी सक्रिय होतात. मात्र त्यात प्रत्यक्ष अभ्यास कमी आणि राजकीय अंदाज घेऊन केलेली भाकितेच जास्त! परिस्थितीचे नीट आकलन सहसा कोणी करत नाही आणि त्यातूनच सध्याच्या परिस्थितीसारखी फजिती होते.

महाराष्ट्र विधानसभेच्या बाबत सध्या जे झाले ते काहीसे असेच झाले. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये चाचण्या घेणारी मंडळी अशा प्रकारे अपयशी ठरली आहे. तोच कित्ता आताही गिरवण्यात आला आहे. वास्तविक निवडणुकीचे सर्वेक्षण करण्याच्या सदोष पद्धतींमुळे मतचाचण्या आणि मतदानोत्तर चाचण्या या दोघांनीही आपली विश्वसार्हता पार गमावली आहे. बहुतांश वेळेस ते सत्ताधारी पक्षासाठी आपली सेवा रूजू करत असल्याचे आरोप होतात. चाचण्या म्हणजे आपल्याला अनुकूल अशी भाकितं करून आपल्या बाजूने वातावरण तयार करण्यासाठी या साधने बनली आहेत. निवडणूक आणि निकालाच्या दरम्यान मनोरंजनापलीकडे त्याला फारशी किंमत उरलेली नाही.किंबहुना मीडिया गिमिक किंवा माध्यमाचा खेळ असे स्वरूप त्याला आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे कवित्व सरल्यानंतर लोकांना याचा विचार करावा लागेल. या निवडणुकीत जिंकले कोणीही असो, पण पराभूत झाले ते एक्झिट पोलच!

Leave a Comment