बांगलादेशी घुसखोर – बंदोबस्ताची हीच वेळ!


कर्नाटकची राजधानी बंगळुरूत बेकायदा राहणाऱ्या अडीच डझन बांगलादेशींना नुकतीच पोलिसांनी अटक केली. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांची समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे. बंगळुरूत काही विशिष्ट भागांमध्ये बांगलादेशी लोक राहतात अशी माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी शनिवारी सकाळी तेथे छापा टाकला आणि या 30 जणांना अटक केली. बंगळुरू आणि म्हैसूरमध्ये काही अतिरेकी संघटनांचे स्लीपर सेल्स कार्यरत असून कर्नाटकचा किनारी प्रदेश व बंगालच्या उपसागरात त्यांच्या करवाया वाढल्या आहेत, अशी माहिती कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी गेल्या आठवड्यातच दिली होती. जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेचे दहशतवादी किनारपट्टी आणि कर्नाटकच्या काही अंतर्गत भागात कार्यरत असल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) संशय आहे.

अशीच कारवाई काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत पोलिसांनी केली होती आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या बेकायदा बांगलादेशींना जेरबंद केले होते. इतकेच नाही तर गेल्या बुधवारपासून सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) भारतात प्रवेश करू पाहणाऱ्या 13 अवैध बांगलादेशींना अटक केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने इंदापूर, दौंड आणि बारामती तालुक्यात कारवाई करून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 36 बांगलादेशींना पकडले होते. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्र आणि इतर कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. त्याच्या काही दिवस आधीच पुणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एबीटी या दहशतवादी संघटनेच्या संपर्कातील तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. कर्नाटक पोलिसांनी केलेल्या कारवाईतून एक गोष्ट स्पष्ट झाली, की बांगलादेशी घुसखोर ही आता केवळ आसाम किंवा पश्चिम बंगालची समस्या राहिली नाही तर ती राष्ट्रव्यापी समस्या बनली आहे. ही दोन राज्येच नाही तर बांगलादेशी घुसखोर मुंबईसह संपूर्ण देशभरात शिरले आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये दक्षिण भारतामध्ये दक्षिण भारतात मोठ्या संख्येने बेकायदा बांगलादेशी लोक स्थायिक झाले आहेत. विकी नानजप्पा या लेखकाच्या म्हणण्यानुसार, गुप्तचर खात्याचे माजी सहसंचालक दिवंगत मलोयकृष्ण धार यांनी 2006 साली इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) येथे झालेल्या चर्चेदरम्यान याबाबत विस्ताराने माहिती दिली होती. कर्नाटक आणि केरळ ही राज्ये अशा बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी अड्डे बनले असून या राज्यात अनेक मॉड्यूल्स तयार केली गेली आहेत, असे त्यांनी म्हटल्याचे नानजप्पा यांनी म्हटले आहे.

आज हा धोका कित्येक पटींनी वाढला आहे. त्यात रोहिंग्यांचीही भर पडली आहे. हत्या, दरोडे आदी गंभीर गुन्ह्य़ात बांगलादेशी घुसखोरांची संख्या लक्षणीय प्रमाणात असते. सोनसाखळी चोरीमध्येही बांगलादेशी तरुण आढळले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली त्यापूर्वी बनावट चलनी नोटा ही एक प्रचंड मोठी समस्या ठरली होती. या नोटा भारतीय बाजारपेठेत आणून अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे कारस्थान पाकिस्तानने आखले होते. मात्र त्या कारस्थानाला अमलात आणण्यासाठी या बांगलादेशी नागरिकांना हाताशी धरण्यात येत होते. हे बांगलादेशी पत्नी, मुलांसह राहतात, पण सीमेवरून नोटा आणून त्या खपवण्याचे काम ते करत असत.

मुंबईत नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईत बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा धोका समोर आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी अनेकदा बांगलादेशी नागरिक शोधून त्यांच्यावर कारवाई केली. या बांगलादेशींना बांधकाम मजूर म्हणून भारतात आणले जाते आणि नंतर गुन्हेगारी कृत्यांत ते सहभागी होतात. या घुसखोरांपैकी अनेक जण दहशतवादी कारवायांमध्येही गुंतले असल्याचे अनेकदा उघड झाले आहे.

बंगळुरू आणि परिसरातून जेएमबीच्या अनेक दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून वर्षभरात स्फोटके आणि इतर अनेक साहित्य जप्त करण्यात आले होते. एनआयएच्या माहितीनुसार, पश्‍चिम बंगालमधील बर्दवान येथे 2 ऑक्‍टोबर 2014 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जण मरण पावले होते. त्यातील आरोपींना बंगळुरु परिसरातून अटक करण्यात आली होती. त्यांनी तमिळनाडूतील कृष्णगिरी डोंगरावर घातपाताचे प्रशिक्षण घेतले होते आणि देशभरात जिहादी कारवाया करण्यासाठी येथे तळ उभारण्याच्या तयारीत होते

या सगळ्या पार्श्वभूमीवर बंगळुरुतील कारवाईकडे पाहावे लागेल. बंगळुरुसारख्या महत्त्वाच्या शहरात एवढ्या मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर राहत असतील तर अन्य छोट्या-मोठ्या शहरांत काय अवस्था असेल? ही कारवाई अशीच पुढे न्यावी आणि या समस्येवर तोडगा निघायला हवा. बांगलादेशी घुसखोरांच्या बंदोबस्ताची हीच वेळ आहे.

Leave a Comment