प्रकाशपर्वाच्या शुभेच्छा

diwali
माझा पेपर हा मराठी पत्रसृष्टीतला एक यशस्वी प्रयोग ठरला आहे. या कामात आम्हाला सहकार्य करणारे सर्व लोक आणि वाचक यांना ही दिवाळी आनंदाची जावी ही शुभेच्छा. दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचे पर्व. सारी सृष्टी अशा एका अवस्थेत आलेली असते की माणसाला आतून आनंद झालेला असतो त्याला आपल्या मनातला आनंद प्रकट करावासा वाटत असतो. आपल्या पूर्वजांनी याच पर्वाचा विचार करून या निमित्ताने सर्वांनी दिवे लावून आसमंत उजळून टाकावे अशी प्रथा सुरू केली. किती शतके लोटली माहीत नाही पण दिव्यांचा हा सण अव्याहतपणे पाळला जात आहे. गरीब आणि श्रीमंत लोक आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता आपापल्या परीने आणि आपल्या ऐपतीप्रमाणे दिवाळीचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करतात. श्रीमंतासारखी गरिबाची दिवाळी वैभवशाली नसते. परंतु तिच्यात भौतिक वैभव प्रकट होत नसले तरी गरीब माणूससुध्दा आनंद लुटतच असतो आणि त्यातून आत्मिक वैभव प्रकट करत असतो. दिवाळीचा सण हा शेती, अर्थव्यवस्था आणि जीवनपध्दती यांच्याशीही मेळ बसणारा आहे.

खरिपाची पीके हातात आलेली असतात आणि लोकसंख्येत बहुसंख्येने असलेल्या शेतकर्‍यांकडे आनंद लुटायला पैसा असतो. त्यामुळेच दिवाळी हा शेतकर्‍यांचा प्रामुख्याने सण झालेला आहे आणि दिवाळीची सुरूवात गायीच्या पूजनाने होत असते यात तो अर्थ ध्वनित झाला आहे. दिवाळीला काही प्रथा पाळल्या जातात आणि त्या प्रथा वर्षानुवर्षे तशाच पाळल्या जातात. असे असले तरी प्रथा तीच पण तिच्यामध्ये कालानुसार काही बदल झाले आहेत. दिवाळीला फटाके उडवावेत हा तर संकेत आहे. कारण माणूस आनंद प्रकट करण्यासाठी शोभेची दारू उडवत असतो. त्याला आनंद झाला की दारू उडवावीशी वाटते. हे नैसर्गिक आहे. पण तसे असले तरी सध्याच्या काळात नवी पिढी शोभेच्या दारूचा काहिसा वेगळा विचार करायला लागली आहे. कारण आता हवेत बरेच प्रदूषण झालेले आहे. आनंद झाला तर दारू उडवावीशी वाटते हे खरे आहे पण ही दारू उडवणे वाढत्या प्रदूषणाला हातभार लावणार असेल तर दारू उडवण्याचा आपण पुनर्विचार केला पाहिजे असे नव्या पिढीला वाटायला लागले आहे. म्हणूनच महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये हजारो विद्यार्थी जाहीरपणे शपथ घेत आहेत आणि दारू उडवून हवेच्या तसेच आवाजाच्या प्रदूषणात वाढ करण्यास आपण हातभार लावणार नाहीत, असा निश्‍चय जाहीर करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून फटाक्यांचे आवाज अपेक्षेपेक्षा कमी झालेले दिसत आहेत. त्यामागे या भावी पिढीच्या फटाके न उडवण्याच्या निर्धाराचेच कारण आहे. ही गोष्ट नाकारता येत नाही.

कधी कधी प्रसिध्दी माध्यमांच्या प्रभावावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाते. आजकालची प्रसिध्दी माध्यमे म्हणाव्या तेवढ्या जबाबदारीने वागत नाहीत असे म्हटले जाते. परंतु फटाक्यांचे प्रमाण कमी होण्यास प्रसिध्दी माध्यमातून झालेला प्रचार उपयुक्त ठरला आहे हे नाकारता येत नाही. दिवाळीतला आनंद ही मानवी भावना आहे आणि कोणतीही मानवी भावना ही चिरंतन असते. तिला काळाच्या सीमा नसतात. काळ बदलला तरी भावना तीच असते. कारण भावना शाश्‍वत असते. भावना व्यक्त करण्याचे साधन आणि मार्ग हे मात्र शाश्‍वत नसतात. त्याचा प्रत्यय या दिवाळीत येत आहे. सध्या फराळाचे कौतुक राहिलेले नाही. कारण जीवनमान असे काही बदलून गेले आहे केवळ दिवाळीतच खाल्ल्या जाणार्‍या लाडू, करंज्या, चकली, शंकरपाळी या पदार्थांचे अप्रुप कमी झाले आहे आणि हे पदार्थ आता नित्याचे झाले आहेत. त्यामुळे दिवाळीतला खाण्याचा आनंद पूर्वीसारखा राहिलेला नाही. म्हणूनच खाण्याच्या ऐवजी गाण्याच्या माध्यमातून आनंद लुटण्याचा प्रकार रूढ होत आहे. काल साजर्‍या झालेल्या गावोगावच्या पहाट गाण्यांनी हे सिध्द करून दिले आहे.

दिवाळी हा तसा धार्मिक सण आहे. परंतु हळूहळू लक्ष्मीपूजन आणि अभ्यंगस्नान अशा काही धार्मिक विधींशिवाय अन्य विधींनी धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक महत्त्व प्राप्त करायला सुरूवात केली आहे. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींना एक सामाजिक आशयसुध्दा प्राप्त होत आहे. कित्येक सुस्थितीतील लोकांनी दिवाळीचा आनंद आपल्या समाजातल्या गरिबांच्या सोबत लुटण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. काही संस्थांनी गरीब, अनाथ आणि रिमांड होममधील मुलांना मिठाई आणि दिवाळीचा फराळ वाटून याही वंचित घटकांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेतले आहे. दिवाळी अनेक प्रकारे साजरी करता येईल. परंतु गरिबांना आपल्या आनंदात सहभागी करून घेण्याचा हा उपक्रम हीच सर्वात सार्थकी दिवाळी आहे, असे म्हणावेसे वाटते. कारण मानवी जीवनाचे सार्थक केवळ स्वतः सुख लुटण्याने होत नाही. मानवी जीवनाचे स्वागत दुसर्‍याला सुखी करण्याने होत असते. भारतीय संस्कृतीमध्ये या गोष्टीवर फार भर दिलेला आहे. तेव्हा या अर्थाने सार्थकी जीवन जगण्यासाठी दिवाळी ही एक सर्वात छान संधी आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे. नवे कपडे, मिष्टान्न आणि एकत्रीकरण यामुळे दिवाळीचे समाधान लुटल्यासारखे वाटत नसेल त्यांनी समाधान मिळवण्यासाठी गरीबांच्या झोपडीत दिवाळीच्या पणतीचा उजेड पाडता येईल का, याचा विचार करावा आणि तसा प्रयत्न करावा.

Leave a Comment