शिवसेनेच्या भूमिकेचे शरद पवारांकडून समर्थन


मुंबई – शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या निकालानंतर सत्ता वाटपाच्या ५०-५० सुत्रानुसार मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षांसाठी दावा सांगण्यात काहीच चुकीचे नसल्याचे म्हणत त्यांच्या वक्तव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थन केले आहे. सरकार चालवण्याचा शिवसेनेला अनुभव असल्यामुळे त्यांची ही मागणी रास्त वाटत असल्याचे पवार म्हणाले आहेत.

२२० जागा राज्यामध्ये युतीला मिळण्याची शक्यता वारंवार युतीमधील नेत्यांनी बोलून दाखवली होती. पण भाजपला पवारांच्या प्रचारबळामुळे केवळ १०५ जागांवर विजय मिळवता आला. भाजपने २०१४ साली १२२ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेने ५६ जागांवर विजय मिळला असल्यामुळेच भाजपला सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची मदत घ्यावीच लागणार आहे. उद्धव ठाकरेंनी निकालाच्या दिवशी घेतलेल्या पत्रकारपरिषदेमध्ये भाजपच्या सर्व अडचणी मी ऐकून घेणार नसल्याचे मत व्यक्त करत आपण ५०-५० सूत्रावर कायम राहण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. आपण उद्धव यांच्या या मागणीशी सहमत असल्याचे पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. शिवसेना-भाजपने १९९० च्या दशकातही ५०-५० चे सूत्र वापरले होते. सरकार चालवण्याचा त्यांना अनुभव असल्याने अशा मागणीवर त्यांनी अडून राहण्यात काहीच चुकीचे नसल्याचे पवार म्हणाले. पवारांनी दिलेला हा संदर्भ १९९५-१९९९ काळात शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते तेव्हाचा आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीने विधानसभेच्या निकालामध्ये १०२ जागांवर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये काँग्रेसने प्रचाराकडे दूर्लक्ष करुनही अपेक्षेहून चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. हे निकाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर एकत्र काम केल्याने समोर आल्याचे पवारांनी म्हटले आहे. आमच्या सोबतीने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी काम केले. आमच्या योग्य संवाद होता. सोनिया गांधी यांनी सभा घेतल्या नसल्या तरी राहुल गांधींनी सभा घेतल्या होत्या. मी येथील स्थानिक नेता या नात्याने पुढाकार घेत आघाडीसाठी अनेक सभा घेतल्या असल्याचे पवारांनी सांगितली.

राष्ट्रवादीमधून नेत्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्यावरुन प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली टीका योग्य नसल्याचे पवारांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली टीकाही चुकीची असल्याचे पवार म्हणाले. मुख्यमंत्री हे प्रगल्भ नसल्यामुळे मी त्यांनी केलेल्या टीकेकडे फारसे लक्ष देत नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केलेली वक्तव्य चुकीची होती. पद्मविभूषण पुरस्काराने मला नुकतेच सन्मानित करण्यात आले. माझ्यामध्ये जर एवढ्या कमतरता असतील तर मला पुरस्कार का देण्यात आला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

भाजप आणि शिवसेना २०१४ साली संयुक्तरित्या निवडणूक लढल्यानंतर भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेकडून भाजपसोबत जायचे की नाही याचा विचार सुरु असताना सरकारला पवारांनी बाहेरुन पाठिंबा दिला होता. पुन्हा निवडणूक महाराष्ट्राला परवडणारी नसल्याचे सांगत भाजपला त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता. आम्ही सध्या शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचेही पवारांनी स्पष्ट केले. शिवसेना आणि भाजपमध्ये युती असल्याने आमच्याकडे प्रस्ताव घेऊन शिवसेना येणार नसल्याचेही पवारांनी म्हटले आहे.

Leave a Comment