तमसो मा ज्योतिर्गमय

diwali1
दिवाळीचा सण अंधारावर प्रकाशाने मात करावयाचा सण आहे. माणूस नेहमीच अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करत असतो. मात्र समाजामध्ये सगळेच लोक काही अंधारात राहत नाहीत. त्यामुळे प्रकाशात राहणार्‍या लोकांनी तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाऊ असे म्हणण्याच्या ऐवजी प्रकाशाकडून अधिक प्रखर प्रकाशाकडे जाऊ अशी सदिच्छा एकमेकांना दिली पाहिजे. समाजामध्ये अजूनही अंधारात राहणार्‍यांची संख्या मोठी आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण प्रकाशाकडून अधिक प्रकाशाकडे जात असलो तरी अजून अंधारात चाचपडत असलेल्या लोकांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. दिवाळीचा सण जसा सामाजिक आहे, धार्मिक आहे तसाच तो मानवी जातीला संदेश देणारासुध्दा आहे. भारतात दिवाळीचा सण पुरातन काळापासून साजरा होत आलेला आहे. तो कोणी सुरू केला, कसा सुरू केला याचा काही निश्‍चित अंदाज येत नाही. परंतु भारतीय लोक निसर्गाच्या चक्रानुसार वागत आलेले आहेत आणि निसर्गातल्या एका वर्षातल्या चक्रात सर्वाधिक चांगला कालावधी भारतीय लोक आनंदाचे पर्व म्हणून साजरा करत आले आहेत.

सृष्टीच्या हिरवाईसाठी पावसाची गरज आहे. पाऊस पडला नाही तर धान्य पिकणार नाही, म्हणून भारतीय लोक पावसासाठी आराधना करतात. परंतु भारतात सलग महिने पाऊस पडत असतो. शेवटी सर्वांना पावसाचा कंटाळा येऊन जातो. पाऊस आवश्यक असला तरी तो नकोसा वाटावा अशी एक वेळ येऊन जाते आणि तो थांबला की मनाला आनंद वाटतो. थंडीची चाहूल लागलेली असते आणि पावसाच्या वरदानामुळे उगवलेली पिके घरात येऊन पडलेली असतात. अशावेळी आपण आनंद साजरा केला पाहिजे असे वाटू लागते आणि आपापत:च आनंद साजरा करण्यासाठी दिवाळी सुरू व्हायला लागते. दिवाळीचा सण भारताच्या प्रत्येक प्रांतात साजरा केला जातो. भारताच्या सांस्कृतिक परंपरा फार मोठ्या आहेत. त्यामुळे भारतात सण खूप आहेत. काही वेळा या सणांची चेष्टाही केली जाते. कारण सण म्हटले की सुट्टी आलीच. पर्यायाने भारत हा सणांचा देश आहे, तसाच सुट्ट्यांचाही देश आहे आणि या सुट्टीच्या दिवशी देशातले उद्योगधंदे बंद असतात आणि उत्पादन खंडित झालेले असते. म्हणून या सुट्ट्या कमी केल्या पाहिजेत, सणातला उत्साह कमी केला पाहिजे असे मानणारेही लोक आहेत. परंतु भारतीयांच्या सणांमुळे त्यांच्या जीवनात आनंदाचा आणि मायेचा ओलावा निर्माण झालेला असतो.

जीवनात रस असतो आणि या सांस्कृतिक संचितामुळे त्याचे जगणे हे सुसह्य झालेले असते. बर्‍याचदा भारतीयांची सहनशीलता आणि सहिष्णुता यांच्या मागे नेमके काय रहस्य आहे हे बर्‍याच लोकांना कळत नाही. पण वास्तवात आपले सांस्कृतिक जीवन यामागे आहे. भौतिक जीवनातल्या अनेक अडचणी भेडसावत असून सुद्धा या सांस्कृतिक संचितामुळेच भारतीय लोक आनंदी जीवन जगत असतात. त्यांना निसर्गच आनंदी रहायला शिकवतो. ही उदात्त परंपरा दिवाळीच्या रुपाने आपल्याला दिसत असते. म्हणून दिवाळी हा भारतीयांच्या आनंदी जीवनामागचे रहस्य आहे. हे प्रकाशपर्व त्यांच्या जीवनात कायमचा समाधानाचा प्रकाश पाडत असते. भारताच्या विविध प्रांतात विविध सण आहेत पण दिवाळी हा एकमेव सण असा आहे ही जो भारताच्या सर्व प्रदेशांमध्ये साजरा केला जात असतो. भारतीय लोक जिथे जिथे म्हणून गेले तिथेही दिवाळी साजरी होते. नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, मॉरिशस, गयाना, त्रिनिनाद, टोबॅगो, सुरिनाम, मलेशिया, सिंगापूर आणि फिजी या देशात दिवाळी चा सण आनंदाने साजरा होत असतो.

सध्या भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर परदेशात गेलेले आहेत आणि ते ज्या देशात जातील त्या देशात संघटित होऊन आपले सण, समारंभ साजरे करायला लागले आहेत. अशा देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, थायलंड, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, नेदरलॅन्डस्, ऑस्ट्रेलिया, केनिया आणि संयुक्त अरब अमिराती याही देशांमध्ये दिवाळीचा सण साजरा होतो. परंतु वर उल्लेख केलेल्या नेपाळ आदी देशांमध्ये परंपरेने कित्येक शतकांपासून दिवाळीचा सण साजरा होत आला आहे. त्यामुळे त्या देशात दिवाळीला सार्वजनिक सरकारी सुट्टी दिली जाते. भारतात या सणात वसुवारशीपासून भाऊबीजेपर्यंत सहा दिवस निरनिराळे धार्मिक विधी केले जातात, पूजा केल्या जातात. पण त्यातला लक्ष्मी पूजनाचा दिवस सर्वाधिक महत्वाचा मानला जातो. महाराष्ट्राबरोबरच केरळ, तमिळनाडू, प. बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश या राज्यात निरनिराळ्या प्रकारांनी दिवाळी साजरी होते. परंतु या सर्वच राज्यांमध्ये चार किंवा पाच दिवसांची दिवाळी नाही. आंध्रामध्ये परंपरेने दोनच दिवसांची दिवाळी साजरी होते. केरळात ती चार दिवस होते, परंतु दिवाळीतला तिसरा आणि चौथा दिवस तिथे वेगळ्या पद्धतीने साजरा होतो.

देशाच्या कोणत्याही भागामध्ये त्या त्या प्रादेशिक संस्कृतीनुसार दिवाळी साजरी होत असली तरी प्रत्येकाच्या दिवाळीत नरकचतुर्दशी आणि आमावस्येचे लक्ष्मीपूजन हे दोन दिवस हमखास आहेत. लक्ष्मीचे पूजन करण्याची पद्धती वेगळी असली तरी पावसाळा संपल्यानंतरच्या शेवटच्या आमावस्येला लक्ष्मीचे पूजन केले पाहिजे ही कल्पना सारखीच आहे. कारण भारत पुरातन काळी खूप श्रीमंत तर होताच, पण धनाच्या संबंधात या संस्कृतीत एक व्यापक आणि उदात्त विचार मांडला गेला आहे. धन कमावताना ते कसोशीने कमावले पाहिजे. उत्तम व्यवहाराने कमावले पाहिजे. परंतु तोच पैसा खर्च करताना मात्र निरपेक्ष भावनेने खर्च केला पाहिजे. आपल्या जीवनात पैशाचा अभाव असता कामा नये आणि पैशाचा प्रभावही असता कामा नये. संपत्तीचा प्रभाव फार वाईट असतो. म्हणून संपत्ती हाती असूनही तिची पूजा करण्याची वृत्ती वाढली पाहिजे ही शिकवण दिवाळीत मिळत असते.

Leave a Comment