
टीम इंडियाचा माजी कप्तान आणि बीसीसीआयचा नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुली २३ ऑक्टोबरच्या पहिल्यावहिल्या सभेला आला आणि उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. सौरव या सभेला येताना चक्क १९ वर्षापूर्वीचा त्याचा टीम इंडियाच्या ब्लेझर घालून उपस्थित होता. अर्थात उपस्थित पत्रकारांच्या नजरेतून ही बाब सुटणे शक्य नव्हते. त्यांनी दादाला त्या संदर्भातत लगोलग प्रश्न विचारला तेव्हा सौरवने हा ब्लेझर घालून येण्यामागचे रहस्य उलगडले.
बीसीसीआयच्या पहिल्या बैठकीला १९ वर्षे जुन्या ब्लेझरमध्ये आला सौरव
सौरव म्हणाला, २००० साली मी जेव्हा प्रथम टीम इंडियाच्या कप्तानपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा हाच ब्लेझर मी घातला होता. आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतो आहे तेव्हा हाच ब्लेझर घालून येण्याचा निर्णय घेतला. प्रथम टीम इंडियाचा कप्तान होणे ही तेव्हा माझ्यासाठी मोठी जबाबदारी होती आता बीसीसीआयचा अध्यक्ष ही तशीच मोठी जबाबदारी आहे अशी भावना आहे. अर्थात हा ब्लेझर मला इतका ढगळ होईल अशी मात्र कल्पना नव्हती.
सौरव टीम इंडियाचा आक्रमक कप्तान म्हणून ओळखला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मोठ्या स्थानावर झेप घेतली तसेच अनेक संस्मरणीय विजय नोंदविले. सौरव कडे बीसीसीआयचे अध्यक्षपद ९ महिन्यांसाठी आहे. सौरव २०१४ मध्ये बंगाल क्रिकेट संघाचा संयुक्त सचिव बनला होता. जुलै २०२० मध्ये बंगाल क्रिकेट पदाधिकारी म्हणून त्याला ६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतर त्याचा कुलिंग ऑफ पिरियड सुरु होत आहे. हा अवधी ३ वर्षाचा आहे. या काळात तो कोणत्याच पदावर काम करू शकणार नाही.
