काँग्रेसला पराभवातून आलेली उपरती


पराभव माणसाला काय शिकवत नाही? स्वातंत्र्यवीर सावरकरांना अनेक वर्षे दूषणे दिल्यानंतर आता काँग्रेसचे नेते त्याच सावरकरांचे गोडवे गात आहेत. एकामागोमाग एक जण सावरकर किती महान होते हे सांगत आहेत. याला कारण सातत्याने निवडणुकांमध्ये झालेला पराभव असावा का? कारण देशासाठी खस्ता खालेल्ल्या सावरकरांना काँग्रेसमधील काल-परवाच्या नेत्यांनीही गद्दार आणि भेकड ठरवावे, हे लोकांना रूचणारे नव्हतेच. लोकांनी अशा उथळ कृत्याला सपशेल नाकारले आणि काँग्रेसला निवडणुकांमध्ये धूळ चारली. म्हणूनच काँग्रेस नेते उपरतीची भाषा बोलू लागले आहेत.

स्वा. सावरकरांची तारीफ करून चर्चेला खाद्य पुरवणारे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी हे काँग्रेसचे सर्वात अलीकडचे नेते ठरले आहेत. सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यात मोठी भूमिका पार पाडली आहे आणि देशासाठी ते तुरुंगात गेले, असे सिंघवी यांनी ट्विटरवर म्हटले आहे. “वैयक्तिकरीत्या मी सावरकरांच्या विचारसरणीशी सहमत नाही. मात्र ते निपुण व्यक्ती होते आणि स्वातंत्र्यसमरात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांनी दलितांसाठी संघर्ष केला आणि देशासाठी ते तुरुंगात गेले. हे कधीही विसरता कामा नये,” असे ते म्हणाले आहेत. अर्थात वैयक्तिकरीत्या आपण सावरकरांच्या विचारसरणीशी सहमत नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली आहे. अर्थात हेही नसे थोडके.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने जारी केलेल्या जाहीरनाम्यात (संकल्पपत्र) स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे राजकारणात सावरकर हा विषय पुन्हा आला आहे. सावरकरांबद्दल काँग्रेसच्या सध्याच्या पिढीच्या नेत्यांनी अनेकदा दुःस्वास व्यक्त केला आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी सावरकरांना गुन्हेगार ठरवले आहे. स्वा. सावरकर यांचा ‘देशद्रोही’ असा मानहानीकारक उल्लेख केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर आरोप निश्चित झाला असून न्यायालयाने अधिक चौकशीचे आदेश दिले आहेत. स्वा. सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून 5, 22 आणि 23 मार्च २०१६ साली करण्यात आलेल्या ट्विट्समध्ये स्वा. सावरकर यांचा ‘देशद्रोही’ असा उल्लेख करण्यात आला होता. अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये असताना सावरकर यांनी ब्रिटिशांकडे क्षमायाचना केल्याचाही उल्लेख या ट्विटमध्ये करण्यात आला होता.

राजस्थानमधील काँग्रेस सरकारने तर कमालच केली. तेथे दहावीच्या पुस्तकामधील धड्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘देशभक्त’ आणि ‘क्रांतिकारी’ असा उल्लेख काढून त्याऐवजी त्यांचा ‘कारागृहातून बाहेर येण्यासाठी इंग्रजांची क्षमा मागणारी व्यक्ती’ असा उल्लेख करण्यात आला. काँग्रेसचे सरकार राजस्थानमध्ये आल्यावर लगेचच या समितीची स्थापना करण्यात आली होती. या निर्णयावर वाद झाला तेव्हा राज्याचे शिक्षण राज्यमंत्री गोविंदसिंह डोटासरा म्हणाले, की वीर सावरकर यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील आंदोलनात कोणतेच योगदान नाही. हे वाक्य अज्ञानातून आलेले नव्हते, तर ते सावरकरद्वेषातून आलेले होते. त्याच्याही पुढे जाऊन काँग्रेसप्रणीत ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’ या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 21 ऑगस्टला दिल्ली विद्यापीठात बसवण्यात आलेल्या स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासून पुतळ्याची विटंबना केली होती.

या पार्श्वभूमीवर सिंघवी यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे ठरते. सिंघवी यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही स्तुती केली होती. त्यामुळे पक्षाच्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका ते घेत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र काँग्रेस नेतृत्वाचे अत्यंत विश्वासपात्र असलेल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही अलीकडेच सावरकरांची स्तुती केली होती. आम्ही सावरकरांच्या विरोधात नाही तर त्यांच्या विचारांच्या विरोधात आहोत, असे ते म्हणाले होते. इतकेच नाही तर सावरकर यांच्यावर दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी टपाल तिकिट काढले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. यावरून काँग्रेसमध्ये काही प्रमाणात का होईना बदलाचे वारे वाहत आहेत, हे स्पष्ट होते.

काँग्रेसच्या नेत्यांमधील हा बदल स्वागतार्ह आहे. सावरकरांसारख्या आदरणीय व्यक्तिमत्त्वाची बदनामी करून काँग्रेसच्या हाती काहीही लागणार नाही. सावरकरांचे हिंदुत्व कुणाला मान्य नसेलही, पण त्यांच्या देशभक्तीची तुलनाच होऊ शकत नाही. त्यांचा अनादर करून काँग्रेसच्या पदरी जनतेचा रोष आणि तिटकारा यांशिवाय काहीही पडणार नाही. म्हणूनच काँग्रेस नेत्यांना अशी उपरती होणार असेल तर चांगलेच आहे.

Leave a Comment