कार्तिकमुळे झाला माझ्या करिअरचा बट्याबोळ – श्रीसंत


नवी दिल्ली : आयपीएल 2013मध्ये सामना फिक्स केल्याचा आरोप भारताचा जलद गोलंदाज एस श्रीसंतवर करण्यात आला होता. या प्रकरणात अडकल्यामुळे श्रीसंतवर क्रिकेट खेळण्यापासून बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर फिक्सिंगच्या आरोपामुळे 26 दिवसांचा कारावास श्रीसंतला भोगावा लागला होता. पण बीसीसीआयच्या वतीने ही बंदी काही महिन्यांपूर्वीच हटवण्यात आली आहे. दरम्यान आता भारताचा विकेटकिपर दिनेश कार्तिकवर श्रीसंतने गंभीर आरोप केले आहेत. कार्तिकमुळे आपले करिअर संपल्याचे श्रीसंतने म्हटले आहे. आता कार्तिकने देखील श्रीसंतच्या या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत श्रीसंतने, 2013मध्ये दिनेश कार्तिकने माझी तक्रार त्यावेळी बीसीसीआयचे प्रमुख एन श्रीनिवासन यांच्याकडे केली होती. श्रीनिवासन यांना मी त्यांच्या प्रती अपशब्द वापरले असे कार्तिकने सांगितल्यामुळे माझे करिअर संपल्याचे सांगितले. श्रीसंतच्या मते ही त्या वेळची गोष्ट आहे जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा होणार होती. श्रीसंतला कार्तिकच्या या तक्रारीमुळे संघात स्थान देण्यात आले नाही.

2005 मध्ये लंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून श्रीसंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध 2006 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. 27 कसोटीत त्याने 87 विकेट घेतल्या आहेत. तर 53 एकदिवसीय सामन्यात 75 विकेट घेतल्या आहेत. श्रीसंतवरील आजीवन बंदी सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2019 मध्ये हटवली होती. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, कारवाई करण्याचा बीसीसीआयकडे अधिकार आहे. आपले म्हणणे मांडण्यासाठी आणि त्याची शिक्षा निश्चित करण्यासाठी श्रीसंतला 3 महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, बीसीसीआयने श्रीसंतच्या बंदीवर विचार करावा. आजीवने बंदीची शिक्षा जास्त असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत श्रीसंतने, 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान माझे करिअर कार्तिकने संपवले. तु जर हे वाचत असशील तर, समजून घे की माझे करिअर तुझ्यामुळे संपले. तुला मी किंवा माझे कुटुंबिय कधीच माफ करणार नाहीत. पुढच्या वर्षी केरळ विरुद्ध तमिळनाडू असा सामना होणार आहे. त्यामुळे त्यावेळी काय होईत ते तुच बघ, असे सांगत कार्तिकवर गंभीर आरोप केले.

दरम्यान दिनेश कार्तिकने या सगळ्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. श्रीसंतने माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत मी ऐकले आहे. यावर भाष्य करनेही बावळटपणा असल्याचे म्हणत सांगत या आरोपांचे कार्तिकने खंडन केले. सध्या विजय हजारे करंडक स्पर्धेत दिनेश कार्तिक तमिळनाडू संघाचे नेतृत्व करत आहे. सध्या सेमीफायनलमध्ये त्याचा संघ पोहचला आहे. तर, श्रीसंत आणि कार्तिक दोन्ही खेळाडूंना टीम इंडियात सध्या जागा मिळालेली नाही. दरम्यान कार्तिक वर्ल्ड कप 2019मध्ये भारताकडून खेळला होता.

Leave a Comment