दुधाची गुणवत्ता सुधारली?


दूध हा जनतेच्या आहारातील महत्त्वाचा अन्नघटक आहे. भारतात एकही असे कुटुंब नसेल ज्यात दुधाचा वापर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात केला जात नाही. मात्र अशा या दुधाच्या गुणवत्तेबाबत नेहमीच संशय, प्रश्न आणि गोंधळाचे वातावरण असते. अनेकदा सरकारी कारवाईत भेसळयुक्त दूध सापडते आणि या कारवायांवरही अनेकदा प्रश्नचिन्ह उभे राहते. मात्र देशात विकले जाणारे बहुतांश दूध उत्तम आहे, असा निर्वाळा या संदर्भातील केंद्रीय संस्थेने दिला आहे. अर्थात या ग्वाहीवरही संशयाचे धुके कायम राहणार आहे.

फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस् ॲथोरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) ही संस्था देशातील अन्नपदार्थ आणि पेय पदार्थांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून असते. ही संस्था अधूनमधून सर्वेक्षण करून अन्नपदार्थांचे नमुने गोळा करते आणि त्यावरून पदार्थांच्या गुणवत्तेचे प्रमाण देते. याच एफएसएसएआयने काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय दूग्ध सुरक्षा व गुणवत्ता सर्वेक्षण 2018 हा अहवाल प्रसिद्ध केला. यात म्हटले आहे, की दुधाचे 90 टक्क्यांपेक्षा अधिक नमुने वापरण्यायोग्य आढळले आहे. मात्र जे नमुने निकृष्ट आढळले त्यांमध्य 41 टक्के नमुने मानकांनुसार नव्हते. त्यांच्यात दर्जाच्या बाबतीत त्रुटी आढळल्या. त्यांच्यात एफ्लाटोक्सिन-एम1, कीटनाशक आणि अँटीबायोटिक आढळले. पूर्वीच्या तुलनेत या सर्वेक्षणात अधिक नमुने गोळा करण्यात आले, सर्व चार क्वॉलिटी मानक तपासण्यात आले आणि भेसळीच्या व संक्रमणकारक पदार्थांची तपासणी करण्यात आली, असे एफएसएसएआयने स्पष्ट केले आहे.

देशात भेसळयुक्त तसेच कृत्रिम दुधाबाबत मोठ्या प्रमाणावर संशयाचे वातावरण आहे. ते दूर होण्यास या पाहणीमुळे मदत होईल, असे सरकारला वाटते. एफएसएसएआयने संपूर्ण देशाती एकूण 6432 नमुने गोळा केले होते. त्यातील 456 असुरक्षित आढळले आणि त्यातही 12 नमुने असे आढळले ज्यांच्यात यूरिया, हायड्रोडन पॅराओक्साईड आणि डिटर्जेंट मिसळलेले आढळले. एफएसएसएआयच्या या अहवालात दुधाचे केवळ सात टक्के नमुने असुरक्षित आढळले, मात्र याच पाहणीच्या गेल्या वर्षीच्या अहवालात हे प्रमाण तीन टक्के जास्त (10 टक्के) होते.

तमिळनाडू, दिल्ली आणि केरळ या तीन राज्यांतील दुधाच्या नमुन्यात सर्वाधिक ॲफ्लाटोक्सिन एम1 नावाचे घातक रसायन आढळले. हे रसायन कॅन्सरला कारणीभूत ठरते. दूध देणाऱ्या जनावरांना दिल्या जाणाऱ्या चाऱ्यात हे दूध मिसळलेले आढळले. विशेष म्हणजे कच्च्या दुधापेक्षा प्रक्रिया केलेल्या दुधात ॲफ्लाटोक्सिनचे प्रमाण अधिक आढळले. एका विशिष्ट प्रकारच्या बुरशीतून हा विषारी पदार्थ तयार होतो आणि तो मका, भुईमूग व कापसासारख्या पिकांमध्ये आढळतो. एक किलोग्रॅम अन्नपदार्थात एक मिलीग्रॅमपेकषा जास्त ॲफ्लाटोक्सिन असल्यास त्यामुळे प्राणघातक आजार होऊ शकतात. यात यकृताला नुकसान होणे किंवा कावीळ यांसारख्या समस्या होऊ शकतात. या पदार्थाच्या अतिवापरामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या वर्षी केलेल्या एका पाहणीत आढळले होते. एफएसएसएआयच्या स्वतःच्या निकषानुसार, दुधात ॲफ्लाटोक्सिनचे प्रमाण एका किलोत 0.5 मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त असता कामा नये.

दुधाच्या या नमुन्यांमध्ये अँटिबायोटिकही आढळले होते, मात्र ते योग्य प्रमाणात असल्याचे सांगण्यात आले आहे. काही नमुन्यांमध्ये एक आणखी घटक आढळला तो म्हणजे मॅल्टोडेक्सट्रिन. हे रसायन घातक नाही मात्र त्यामुळे दुधातील चरबीचे प्रमाण वाढते.

डेअरी उद्योगाला या दिशेने सावधान राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच दुग्धोद्योगासाठी परीक्षण व नमुन्यांशी संबंधित एक योजनाही पुढील वर्षी सुरू होणे अपेक्षित आहे. एफएसएसएआयने भेसळीची तपासणी करण्यासाठी किटही तयार केले आहेत. मात्र वस्तुस्थिती ही आहे, की भारतात संघटीत डेअरी उद्योगाला समांतर असा असंघटीत उद्योग कितीतरी मोठ्या प्रमाणात आहे. मोठमोठ्या शहरांच्या गल्लीबोळातून व प्रशासनाच्या नाकाखाली अशा अनेक डेअऱ्या चालू असतात. तेथे एफएसएसएआयचे मानक तर एकीकडे, पण अगदी साध्या स्वच्छतेकडेही लक्ष देण्यात येत नाही. दुधासोबतच तूप, लोणी आणि पनीर अशा दुग्धजन्य पदार्थांबाबतही अशीच संशयाची स्थिती आहे.

गेल्या वर्षी विधिमंडळात बोलताना तत्कालीन अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट बापट यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 1 एप्रिल 2018 ते 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत दुधाचे एकूण 604 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यापैकी 302 प्राप्त अहवालामध्ये 219 नमुने प्रमाणित घोषित झाले, तर 83 नमुने कमी दर्जाचे घोषित झाले. मात्र एकही नमुना असुरक्षित आढळून आला नाही. असे असेल तर वारंवार कृत्रिम दुधाच्या बातम्या का येतात आणि दूध भेसळीचे गुन्हे का नोंदवले जातात, हा प्रश्न तसाच राहतो. त्यामुळे दुधाची गुणवत्ता सुधारली, हे सरकारने कितीही सांगितले तरी त्यावर विश्वास बसणे कठीण आहे.

Leave a Comment