या चित्रपटाचा ट्रेलर फक्त 7 तास 20 मिनिटांचा; तर चित्रपट किती दिवसांचा असेल


आपण जर एखादा चित्रपट पाहायला थिएटरमध्ये गेलो तर कसे तरी तीन तास आपण बसून काढतो. पण तुम्हाला जर कोणी सांगितले की बाबा रे तुला तब्बल तीस दिवस हा एकच चित्रपट पाहायला लागेल, तर तुमचा चेहरा बघण्यासारखा असेल. पण आता लवकरच एक चित्रपट येत आहे ज्याचा ट्रेलर तब्बल 7 तास 20 मिनिटांचा आहे. तर पूर्ण चित्रपट 720 तासांचा आहे. आता तुमच्या समोर एवढा मोठा चित्रपट कोण पाहणार असा प्रश्न निर्माण झाला असेल. पण विशेष म्हणजे हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर याचा चक्क एकच शो दाखविला जाणार आहे आणि त्यानंतर चित्रपटाची असलेली एकमेव कॉपी नष्ट केली जाणार आहे.

स्वीडनमधील एरिका मॅग्नसन आणि डॅनियल अँडरसन यांच्या नावावर जगातील सर्वात जास्त लांबीच्या चित्रपटाचा विक्रम आहे. 857 तासांचा त्यांचा लॉजिस्टिक्स नावाचा चित्रपट होता. सलग पहायचा म्हटला तर 35 दिवस 17 तास एवढा वेळ लागेल. अद्याप याच चित्रपटाच्या नावावर जगातील सर्वात जास्त लांबीचा चित्रपटाचा विक्रम आहे.

दरम्यान, 720 तासांचा चित्रपट तयार केल्यानंतरही एक वेगळा विक्रम होणार आहे. स्वीडिश दिग्दर्शक अँडर्स वेबर्ग यांचा अॅम्बियंन्स नावाचा हा चित्रपट शेवटचा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रायोगिक चित्रपट म्हणून करण्यात आली आहे. त्याचबरोबर हा चित्रपट जुन्या, बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या चित्रपटांचे रिमेक करण्याच्या ट्रेंडचा निषेध म्हणून तयार केला आहे.

आतापर्यंत अॅम्बियन्सचे 2 ट्रेलर आले आहेत. याचीही लांबी 72 मिनिट आणि 7 तास 20 मिनिटे एवढी आहे. याचे चित्रीकरण गेल्या 4 ते 5 वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे चित्रपट सलग चित्रित करण्यात आला आहे. यात कॅमेऱा तसुभर सुद्धा हलवण्यात आलेला नाही. चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याची एकमेव कॉपी नष्ट करण्यात येणार आहे. अँडर्स वेबर्ग यांनी याचे कारण सांगताना म्हटले आहे की, या चित्रपटाला सध्या अस्तित्वात नसलेला सर्वात जास्त लांबीचा चित्रपट अशी ओळख मिळावी. एवढ्या मोठ्या लांबीचा चित्रपट 31 डिसेंबर 2020 ला रिलीज होणार आहे.

Leave a Comment