पाकिस्तानी दूतावास नव्हे, भारतविरोधाचे अड्डे


भारताविरुद्धचे पाकिस्तानचे धोरण जगजाहीर आहे, किंबहुना भारतविरोध हाच पाकिस्तानच्या अस्तित्वाचा आधार आहे, असे म्हटले तरी चालेल. मात्र आपल्या भूमीवरून भारतविरोधी कारवाया चालू ठेवण्यासोबतच परदेशातूनही भारताविरोधात मोहीम चालवण्याचे प्रयत्न पाकिस्तानने चालवले आहेत. या प्रयत्नांना खतपाणी घालत आहेत ते पाकिस्तानी दूतावास.

बांगलादेशाची राजधानी ढाका आणि नेपाळची राजधानी काठमांडू येथे तैनात असलेल्या पाकिस्तानी सेनेच्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांविरुद्ध भारताच्या गुप्तचर संस्थांनी पुरावे गोळा केले आहेत. हे अधिकारी कलम 370 रद्द केल्यानंतर राजनयिक माध्यमांचा वापर करून बनावट भारतीय नोटांची तस्करी आणि भारतविरोधी कारवायांना प्रोत्साहन देत होते, असा आरोप आहे.

नेपाळमधील पाकिस्तानचे राजदूत मझहर जावे हे काठमांडूतील प्रतिष्ठित व वजनदार नेपाळी समूहांमध्ये भारतविरोधी भावना भडकवण्यात सामील आहेत, असे गुप्तचर संस्थांचे म्हणणे आहे. मझहर जावेद यांनी गेल्या 27 सप्टेंबर रोजी महाराजगंज, काठमांडू येथे पाकिस्तानी दूतावासात एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत 30 मानवाधिकार कार्यकर्ते, बुद्धिजीवी आणि राजनयिक अधिकारी आमंत्रित होते, असे इंटेलिजन्स ब्यूरोच्या (आयबी) अहवालात म्हटल्याचे आयएएनएस या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. काश्मिर खोऱ्यातील लोकांवर अत्याचार करून भारत मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे, असे जावेद यांनी या बैठकीत सांगून या नेपाळी लोकांना भडकवले.

इतकेच नव्हे तर 3 ऑक्टोबर रोजी मझहर यांनी नागरिक या नेपाळी वृत्तपत्रात लेख लिहिला होता. यात काश्मिरमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र रंगवण्यात आले आहे. मझहर हे पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळचे समजले जातात आणि त्यांनी आयएसआयच्या लोकांना दूतावासात आश्रय देऊन दूतावासाला आयएसआयच्या कार्यालयाचे स्वरूप आणले आहे, असेही आयबीच्या अहवालात म्हटले आहे.

काठमांडूतील दूतावासात पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’शी (आयएसआय) संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. इतकेच नाही तर या दूतावासातील डिफेन्स अटॅ्शी कर्नल शफकत नवाज हे वास्तवात आयएसआयचे स्थानिक प्रतिनिधी आहेत. दाऊद इब्राहीम टोळीतील स्थानिक तस्करांसोबत मिळून ते भारतात बनावट नोटांच्या तस्करीची जबाबदारी सांभाळत आहेत. जम्मू-काश्मिरमध्ये कार्यरत असलेल्या अनेक दहशतवादी टोळ्यांना निधी पुरवठा करण्याच्या प्रकरणांत त्यांचे नाव समोर आले आहे. मे महिन्यात काठमांडूतील त्रिभुवन विमानतळावर ७.६७ कोटी रुपयांच्या बनावट भारतीय नोटांचा साठा पकडला गेला होता, त्यावेळी शफकत नवाज यांचे नाव पहिल्यांदा पुढे आले होते. दाऊद टोळीतील एक गुंड युसुफ अन्सारी याला त्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

जी गोष्ट पाकिस्तानची तीच बांगलादेशची. ढाक्यातील पाकिस्तानी उच्चायुक्तांच्या भूमिकेविषयीही भारतीय गुप्तचर संस्थांनी पुरेशी माहिती गोळा केली आहे. या माहितीनुसार, पाकिस्तानी उच्चायोगाचे संरक्षण सल्लागार ब्रिगेडिअर कामरान नजीर मलिक यांनी ढाका येथील पॉश गुलशन भागात असलेल्या हॉटेलमध्ये जिहादी नेत्यांसह गुप्त बैठक घेतली. कामरान नाझिर मलिक हे दहशतवादी कारवायांसोबतच बनावट भारतीय नोटांच्या तस्करीतही गुंतले आहेत. ढाका पोलिसांनी25 सप्टेंबरला सुमारे 50 लाख रुपयांच्या नोटा वाहून नेणारी पार्सल हस्तगत केली होती. दुबईतील एक आयएसआय एजंट, सलमान शेरा बांगलादेशातील विविध ठिकाणी अशी पार्सल पाठवत असल्याचे तपासादरम्यान आढळले होते. इतकेच नव्हे तर पाकिस्तानी उच्चायोग कार्यालयातील अटॅशी मजहर खान यांना बनावट नोटांच्या तस्करीच्या टोळीला आश्रय देण्याच्या आरोपाखाली 2015 मध्ये ढाका पोलिसांनी हद्दपार केले होते. आयबीच्या या अहवालाच्या आधारे गृह मंत्रालयाने भारत-नेपाळ व भारत – बांगलादेश सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) सतर्क केले आहे.

याशिवाय यावर्षी 12 ऑगस्ट रोजी लंडनच्या ट्रॅफल्गार चौकात ‘खलिस्तान’वादी शिखांचा मेळावा झाला. अमेरिकेतील ‘सिख्स फॉर जस्टिस’ या संघटनेने ब्रिटनमधील शिखांच्या काही संघटनांची मदत घेत 2020 मध्ये पंजाबात शिखांचे सार्वभौम राष्ट्र निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून सार्वमताची मोहीम सुरू करण्याचे ठरविले आहे. त्यामागेही आयएसआयचा हात असल्याचा अंदाज आहे.

अशा प्रकारे राजनयिक संबंधांचा आधार असलेल्या कार्यालयांचा वापर पाकिस्तान हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांसाठी करत आहे. एकीकडे दहशतवादी देश म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की होत असतानाही त्याचे हे उद्योग चालू आहेत, हे विशेष!

Leave a Comment