विधानसभा निवडणूक – हरियाणातील गमतीजमती


महाराष्ट्रासोबत सध्या हरियाणा आणि झारखंड या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. आपल्याकडच्या प्रचाराच्या रणधुमाळीत या राज्यांमधील गमतीजमती काहीशा दुर्लक्षित राहिल्या आहेत. मात्र तेथे राजकारण्यांनी आपल्यापेक्षा काही कमी रंग उधळले नाहीत. उलट हरियाणासारखे राज्य तर दांडगाई आणि अव्यवस्था यांच्यासाठीच ओळखले जाते. म्हणूनच तेथील निवडणुकीत आपल्यापेक्षा कित्येक पट अधिक रंगतदार गोष्टी घडताना दिसत आहेत. महाराष्ट्रप्रमाणे हरियाणातही निवडणुकीची घोषणा 21 सप्टेंबर रोजी झाली. राज्य निवडणूक आयोगाने तेव्हापासून 15 ऑक्टोषबरपर्यंत मतदारांना वाटण्यासाठी आणलेली 12.9 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि मादक पदार्थ जप्त केले आहेत, यावरूनच तेथील निवडणुकीचा एकूण रागरंग समजता येईल.

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह हे प्रचार मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. ते स्वाभाविकही आहे. मात्र महाराष्ट्राच्या तुलनेत येथे भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची गर्दी कमी आहे. याचे कारण म्हणजे भाजपला येथे विरोधी पक्षांकडून महाराष्ट्राएवढे आव्हान नाही. तसेच महाराष्ट्रात भाजपला आपला मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेकडूनही दगाफटका होण्याची भीती आहे. ती भीती हरियाणात नाही. तेथे भाजपचा मुकाबला मुख्यतः काँग्रेसशी आहे आणि काँग्रेसही फारशी बळकट नाही. परंतु भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना बंडखोरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार झाली आहे.

हरियाणाची लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या मानाने केवळ दोन टक्के आहे, परंतु देशाच्या सशस्त्र दलांमध्ये हरियाणाच्या लोकांची संख्या दहा टक्के आहे. असे असले तरी राज्याच्या राजकारणात लष्कराशी संबंधित लोकांचे योगदान खूप कमी आहे. राज्यातील एकूण 90 विधानसभा जागांमधून सर्व पक्षांनी मिळून फक्त सहा माजी सैनिकांना उमेदवारी दिली आहे.

भाजपने उकलानाया या मतदारसंघातून खेदड गावाची रहिवासी असलेल्या आशा यांना उमेदवारी दिली आहे. एखाद्या पारंपरिक हरियाणवी सूनेप्रमाणे हातभर घुंगट घेऊन त्या सासरी आल्या, परंतु येथे येताच 2000 लोकांनी त्यांना घुंगट काढायला भाग पाडले. त्यासाठी कारण असे दिले, की त्यामुळे त्यांच्यात आणि मतदारांत एक भिंत उभी राहिल. निवडणूक लढविण्यासोबतच आशा या पी.एचडी. सुद्धा करत आहेत, हे आणखी विशेष!

राज्यातील आदमपुर हा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघातून आजपर्यंत भजनलाल यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती निवडणूक हरलेली नाही. त्यांचे चिरंजीव कुलदीप बिश्नोई हे सध्या या मतदारसंघातून निवडणूक लढवीत असून यापूर्वी ते येथून निवडणूक जिंकले आहे. त्यांच्या विरोधात भाजपने ग्लॅमरचे अस्त्र वापरायचे ठरविले आहे. मात्र त्यासाठी एखाद्या सिनेतारकेला उतरवण्याऐवजी चक्क टिकटॉक स्टार सोनाली फोगाट हिला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आता राज्यातील सर्वाधिक लक्षवेधक मतदारसंघ बनला आहे.
होडल या राखीव मतदारसंघात भाजपचे उमेदवार जगदीश नायर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पक्ष चांगलाच अडचणीत आला होता. ‘‘शंभर शंभर रुपयांचे घालून बूट घालून जाट लोक व्यासपीठावर चढतात आणि राजकारण करतात,’’ असे नायर या व्हिडीओत म्हणताना दिसतात. मात्र खरी गंमत पुढेच आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मितरौल नावाच्या जाट मतदारांची बहुसंख्या असलेल्या गावात नायर हे गेले असताना भाषण करता करता त्यांनी पायातील बूट काढला आणि आणि आपल्या वक्तव्यासाठी माफी मागत डोक्यावर मारून घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या याही कृत्याला सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली.

हरियाणा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशोक तंवर यांनी तावातावाने पक्ष सोडला आणि बंडखोरी केली. मात्र त्यांच्या पत्नीने त्यांना साथ देण्यास नकार दिला. ‘‘माझा जन्म काँग्रेसमध्ये झाला आणि मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसमध्येच राहीन. पत्नी म्हणून मी त्यांच्यासोबत आहे मात्र राजकीय पातळीवर त्यांच्या निर्णयाशी माझा काहीही संबंध नाही,’’ असे त्यांची पत्नी अवंतिका माकन तंवर यांनी म्हटले आहे. अवंतिका यांच्या आईवडिलांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. तेव्हापासून त्या सोनिया गांधी यांच्या जवळ असल्याचे सांगण्यात येते.

भाजपने 2014 मध्ये काँग्रेसकडून हरियाणाची सत्ता हिसकावली होती. ती पुन्हा मिळविण्यासाठी काँग्रेसने अशोक तंवर यांना हटवून मोठ्या अपेक्षेने कुमारी शैलजा यांना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष केले होते. परंतु त्या अध्यक्ष बनल्यानंतर 34 दिवसांमध्ये पक्षाच्या 40 मोठ्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला.

हरियाणा हे पुरुष पुरुषप्रधान राज्य मानले जाते, आणि त्याचे प्रतिबिंब निवडणुकीच्या उमेदवारीतही पडले आहे. सत्ताधारी भाजपने केवळ बारा महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे तर काँग्रेसने त्यापेक्षाही कमी म्हणजे दहा महिलांना उमेदवारी दिली आहे. एकेकाळी सत्ताधारी असलेल्या मात्र आता काहीशा मागे पडलेल्या भारतीय लोकदल या पक्षाने मात्र 15 महिलांना उमेदवारी दिली आहे.

Leave a Comment