राजघराण्याचे भवितव्य 13 वर्षांच्या पोराच्या हाती


एखाद्या राजघराण्याचे भवितव्य केवळ 13 वर्षांच्या पोराच्या हाती असू शकते का? तेही सध्याच्या 21व्या शतकात? याचे उत्तर होय असे आहे. ही परिस्थिती आहे जपानमधील.

जपानी लोक आपल्या राजघराण्याबद्दल अत्यंत भावूक असतात. सध्या जपानच्या सिंहासनावर 59 वर्षांचे नारुहितो हे विराजमान आहेत. मात्र लोकांच्या नजरा 13 वर्षांच्या राजकुमार हिसाहितो यांच्यावर खिळल्या आहेत. नारुहितो यांचे धाकटे बंधू 53 वर्षीय फुमिहितो यांचे चिंरजीव आहेत. हिसाहितो हे ऑगस्ट महिन्यात भूतानला गेले होते तेव्हा जपानच्या भावी राजाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर हे पहिले पाऊल असे त्याचे वर्णन करण्यात आले. जपानच्या भावी राजांनी परदेश दौरे करून जगाची माहिती करून घेणे ही एक मोठी परंपरा आहे. नारुहितो यांनी सिंहासनावर येताच काही महिन्यांत हा दौरा झाला होता.

जपानचे वयोवृद्ध सम्राट अकिहितो यांनी मे महिन्यात राजपदाचा त्याग केला होता. ते मागील 30 वर्षे जपानचे सम्राट होते. त्यानंतर नारुहितो हे पदावर आले. जपानच्या प्राचीन राजपरिवारातील नियमानुसार केवळ पुरुषच राजगादीवर बसू शकतात. मात्र हिसाहितो हे त्यांच्या पिढीतील एकमेव पुरुष असून त्यांच्या वडिलांनंतर गादीचे दुसरे वारस आहेत. “वारसाच्या सध्याच्या नियमांनुसार राजकुमार हिसाहितो हेच संपूर्ण शाही घराण्याला सांभाळण्याची जबाबदारी घेतील. या राजकुमारावर अखेर इतका दबाव असेल, की त्यावर विचारसुद्धा करता येणार नाही,” असे अलीकडेच जपानमधील सर्वात मोठ्या असाही शिंबून या वृत्तपत्राने म्हटले होते.

जपानमधील परंपरावादी केवळ पुरुषांना वारस बनवण्याची परंपरा कायम ठेवू इच्छितात. हिसाहितो यांचा जन्म 2006 मध्ये झाला तेव्हा या परंपरावाद्यांनी तो एक चमत्कारच मानला होता कारण राजघराण्यात 1965 नंतर एकाही पुरुषाचा जन्म झालेला नाही. राजाची पत्नी मासाको हिला लग्नाच्या 8 वर्षांनंतर मुलगी झाली ती राजकुमारी आईको. त्यामुळे वारसाच्या नियमांमध्ये बदल करून महिलांना वारस बनवण्याची चर्चा सुरू झाली. हिसाहितो यांचा जन्म झाल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

दुसऱ्या महायुद्धानंतर जपानच्या राज्यघटनेत राजाची राजकीय शक्ती नष्ट करण्यात आली. परंतु त्यांना देश आणि लोकांच्या एकतेचे प्रतीक बनवण्यात आले. हिसाहितो हे सध्या ओशानोमिजु यूनिवर्सिटीशी संबंधित एका जूनियर हायस्कूलमध्ये शिकत आहेत. मात्र भविष्यातील राजा म्हणून त्यांना तयार करू शकेल, असा एकही सल्लागार हिसाहितो यांच्याकडे नाही.

हिसाहितो यांना गेल्या महिन्यातच 13वे वर्ष लागले होते. त्यांच्या जीवाला धोकाही तेवढाच आहे. या वर्षी एप्रिलमध्ये हिसाहितो यांच्या वर्गातील बाकावर सुरा आढळून आला होता. त्यानंतर काही महिन्यांनी या संदर्भात एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. जपानच्या वारसा कायद्याचा राग मनात धरून आणि केवळ पुरुषांना वारस नेमण्याच्या प्रथेविरुद्ध आपण हे कृत्य केल्याचे त्या व्यक्तीने सांगितले होते.

अर्थात वारस म्हणून हिसाहितो यांच्या दावेदारीला राजघराणे किती गांभीर्याने घेते हे अद्याप स्पष्ट नाही. राजघराण्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असेल, हेही स्पष्ट नाही.

जपानच्या साम्राटांचे राजघराणे हे जगातील सर्वात जुने राजघराणे मानले जाते. प्राचीन काळापासून जपानवर एकाच वंशाचे राजे राज्य करीत आहेत. जपानचा पहिला सम्राट जिम्मू हा सूर्यदेवतेपासून उत्पन्न झाल्याचे मानले जाते. ख्रिस्तपूर्व 600 पासून आजतागायत कायम असलेले हे एकमेव राजघराणे आहे. इसवीसन 500 पासून आतापर्यंत अखंड परंपरा असल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. त्यामुळे जपानचे राजघराणे हे त्या राष्ट्राचे जणू प्रतीक बनले आहे. जपानच्या संसदेने 2017 मध्ये एक विशेष कायदा करून अकिहितो यांनी राजत्याग करण्याचा मार्ग मोकळा केला होता. तसेच सरकारने वारशाच्या समस्येवर शाश्वत उपाय शोधावा, असा ठरावही मंजूर केला होता.

यात एक पर्याय महिलांना गादीचा वारसा देण्याचाही होता. त्यामुळे राजकुमारींचे लग्न झाल्यावरही त्यांची शाही पदवी कायम राहू शकेल व त्या गादीच्या वारस बनू शकतील किंवा त्यांच्या मुलांनाही हा अधिकार मिळू शकेल. जपानमधील बहुतेक लोक या पर्यायाच्या बाजूने आहेत, असे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. मात्र सरकार यात प्रत्यक्ष पाऊल उचलायला उत्सुक नाही आणि म्हणून सध्या तरी परंपरावाद्यांचीच चलती आहे. त्यांच्या दृष्टीने हिसाहितो हेच आशास्थान आहे.

Leave a Comment