चीन – शत्रू का प्रतिस्पर्धी?


चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग अलीकडेच भारताच्या दौऱ्यावर येऊन गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची महाबलीपुरम येथील भेट माध्यमांमध्ये चांगलीच गाजली. महाबलीपुरममधील विविध प्रेक्षणीय स्थळांना या दोन नेत्यांनी दिलेली भेटही चर्चेचा विषय ठरली. भारत व चीन या दोन देशांची सध्याची लोकसंख्या क्रमश: 136 कोटी व 144 कोटी आहे. म्हणजेच जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 36.3 टक्के लोकसंख्या या दोन देशांत राहते. तसेच सध्या चिनी अमेरिकेच्या खालोखाल महाशक्ती आहे आणि भारत महाशक्ती बनण्याच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे. त्यामुळे या भेटीकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते.

या भेटीमुळे भारत आणि चीनमध्ये मैत्रीचा नवीन अध्याय सुरू होईल अशी आशा अनेकांना वाटू लागली. दोन देशांमध्ये असलेला सीमा तंटा आणि व्यापारविषयक तणाव आता मावळू लागेल, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मात्र शी जिनपिंग यांनी या दौऱ्यानंतर नेपाळचाही दौरा केला आणि तिथे त्यांनी केलेले वक्तव्य शी जिनपिंग यांच्या दीर्घकालीन धोरणावर जास्त प्रकार टाकणारे ठरले. ‘जो कोणी चीनच्या कोणत्याही भागाला खंडित करण्याचा प्रयत्न करेन तो मारला जाईल. त्याची शरीर तोडण्यात येईल आणि त्याच्या हाडांची भुकटी करण्यात येईल,’ असे ते म्हणाले.

हे काही सर्वसामान्य वक्तव्य नव्हते, तर डाव्या हुकूमशाही विचारसरणीचे् ते खरेखुरे प्रतिबिंब होते. त्याचे प्रकट रूप जगाने चीनमध्ये अनेकदा पाहिले आहे. बीजिंगमधील तिआनमिन चौकात 1989 मध्ये विद्यार्थ्यांच्या हत्याकांडाला यंदाच 30 वर्षे पूर्ण झाली. यावेळी लोकशाहीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर चीनच्या साम्यवादी सरकारने बंदुकीच्या गोळ्या घातल्या आणि त्यांच्या मृत शरीरावर रणगाडे चालवले होते. आज काहीशी अशीच परिस्थिती चीनचे प्रशासन असलेल्या हाँगकाँमध्ये आहे. तेथेही लोकशाहीची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर साम्यवादी सरकार अत्याचार करत आहे.

इतकेच नव्हे तर चीनच्या शिनजियांग प्रांतातील उईगुर मुस्लिम समुदायावर होत असलेल्या अत्याचाराचीही जगाला जाणीव आहे. तिथे मुस्लिमांना कुराण वाचायला आणि नमाज करायलाही बंदी आहे. मुस्लिमांनी इस्लामी नाव ठेवणे किंवा दाढी मिशा ठेवणे यावरही बंदी आहे. तसेच या मुस्लिमांसाठी विशेष शिबिर आयोजित करून तेथे त्यांना इस्लामची निंदा करण्यास तसेच डावी विचारसरणीबद्दल निष्ठा दाखविण्यात भाग पाडण्यात येत आहे. गंमत म्हणजे हाच चीन भारताला काश्मीरमध्ये मानवाधिकाराबद्दल उपदेश करत असतो.

त्यामुळेच चीन हा भारताचा सामान्य शेजारी देश आहे का प्रतिस्पर्धी आहे का मानभावीपणा करणारा हितशत्रू आहे, याचा विचार भारताला करावा लागणार आहे. पं. जवाहरलाल नेहरू यांच्या काळात ‘‘हिंदी-चीनी भाई-भाई’’च्या घोषणा देण्यात आल्या. मात्र 1962 मध्ये भारतावर युद्ध लादून चीनने भारताला फसवले. तेव्हापासून भारत-चीन संबंधात अनेक चढ-उतार आहेत. आता चीनने भारताशी थेट संघर्ष टाळून पाकिस्तान आणि इस्लामी दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताला सतावण्याचे धोरण आखले आहे.

भारत-चीनचे व्यापारी संबंध अनेक शतकांपासूनचे आहेत. एवढेच कशाला, पण भारताच्या प्राचीन संस्कृती व परंपरांची जी माहिती आपल्याला आहे त्यातील मोठा भाग चीनमुळेच उपलब्ध झालेला आहे. चीनमधून आलेल्या प्रवाशांनी भारताची वर्णने लिहिलेले आहेत त्यातूनच ही माहिती आपल्याला मिळते. फा ह्यान, शुंहयुन, इत्सिंग आणि हुआन सांग ही त्यातील काही प्रमुख नावे आहेत. मात्र मैत्री आणि सौहार्दाचा या भावनेला चीनने अलीकडच्या काळात तिलांजली दिली आहे. कारण आपण एक प्राचीन संस्कृती आणि जगाचे नेतृत्व करणारी शक्ती आहोत, यावर त्याचा विश्वास आहे. त्याच्या या महत्त्वाकांक्षेला आव्हान ठरणारी एकमेव शक्ती भारत असल्याचेही चीनला वाटते. त्यामुळेच भारताची मैत्रीचा देखावा करायचे परंतु भारताला बळकटही होऊ द्यायचे नाही असे धोरण चीनने अंगीकारले आहे. पाकिस्तान ज्याप्रमाणे भारताला दुश्मन मानतो तसेच चीन करत नाही, परंतु मनमोकळेपणाने भारताशी वागण्याचेही त्याचे धोरण नाही.

झुंजार समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस हे संरक्षणमंत्री असताना त्यांचे एक वक्तव्य बरेच गाजले होते. “पाकिस्तान नव्हे तर चीन हा भारचाचा सर्वात मोठा शत्रू आहे,” असे ते म्हणाले होते. त्याला कारण हेच होते. म्हणूनच चीनशी मैत्रीसाठी प्रयत्न तर चालूच ठेवले पाहिजे परंतु फर्नांडिस यांच्या वक्तव्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.

Leave a Comment