‘केबीसी’च्या स्पर्धक सुनीता कृष्णन यांनी सांगितली सुन्न करणारी आपबीती


सामान्य ज्ञानासोबतच समाजातील काही धक्कादायक घटनांचाही उलगडा छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोमध्ये होत असतो. या रिअ‌ॅलिटी शोच्या दर आठवड्याच्या विशेष भागात समाजकार्य करणाऱ्या काही व्यक्ती सहभागी होत असतात. हा भाग ‘कर्मवीर’ म्हणून प्रसारित होत असतो. समाजकार्य करणाऱ्या सुनीता कृष्णन यांचा यावेळी सहभाग असणार आहे. सध्या सोशल मीडियावर या भागाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. सुनीता कृष्णन या यामध्ये त्यांच्या जीवनात घडलेल्या कठिण प्रसंगांबद्दल सांगताना दिसतात.


लैगिंक शोषणाला बळी पडणाऱ्या महिला आणि मुलींच्या पुनर्वसनासाठी सुनीता कृष्णन या कार्य करतात. पण त्यांच्यावर त्या अवघ्या १५ वर्षांच्या असताना ८ जणांनी बलात्कार केला होता. हा धक्कादायक खुलासा त्यांनी केल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनाही धक्का बसला.

सुनीता यांनी आपल्या एनजीओच्या माध्यमातून आजवर २२ हजारापेक्षा जास्त मुलींच्या पुनर्वसनाचे कार्य केले आहे. भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवलेही आहे. समाजातील महिलांसाठी झटणाऱ्या सुनीता यांच्या कार्यात बरेच अडथळेही आले. जीवघेणे हल्लेदेखील त्यांच्यावर झाले. त्यांच्यावर आत्तापर्यंत १७ हल्ले झाल्याचा खुलासाही त्यांनी केला. पण, या हल्ल्यांना न घाबरता शेवटच्या श्वासापर्यंत आपण महिलांसाठी कार्य करत राहु, असे त्या या प्रोमोमध्ये बोलताना दिसतात. लवकरच या शोमध्ये सुनीता कृष्णन यांचा हा भाग पाहायला मिळणार आहे. समाजामध्ये बदल घडवण्यासाठी आपल्याला आपला विचारही बदलावा लागेल, असे या प्रोमोमध्ये बिग बी देखील म्हणताना दिसतात.

Leave a Comment