सर्वाच्च न्यायालयाचे पुढील सरन्यायाधीश नियुक्त करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्याचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात 17 तारखेला निवृत्त होणार आहेत, त्यामुळे त्यांनी आता केंद्र सरकारला पुढील सरन्यायाधीश पदासाठी नाव सुचवले आहे. गोगोई यांनी न्यायमुर्ती एस. ए. बोबडे यांचे नाव सुचवले आहे. त्यामुळे पुढील सरन्यायाधीश म्हणून बोबडे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
मराठमोळ्या व्यक्तीची होऊ शकते सरन्यायाधीशपदी नियुक्ती
न्यायाधीश बोबडे सध्या रामजन्मभूमी-बाबरी मस्जिद प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाचा भाग आहेत.
एस. ए. बोबडे यांच्याविषयी माहिती –
न्यायाधिश अरविंद शर बोबडे यांची जन्म 24 एप्रिल 1956 ला नागपूर येथे झाला आहे. नागपूर युनिवर्सिटीमधून त्यांनी बी.ए. आणि एल.एल.बी डिग्री घेतली आहे.
1978 मध्ये ते बार काउंसिल ऑफ महाराष्ट्राचे सदस्य झाले होते. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बँचमध्ये वकिली करण्यास सुरूवात केली. 1998 मध्ये ते वरिष्ठ वकील झाले. वर्ष 2000 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पद स्विकारले. त्यानंतर ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे देखील मुख्य न्यायाधीश राहिले आहेत.
2013 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यभार स्विकारला. एस.ए. बोबडे हे 23 एप्रिल 2021 ला निवृत्त होतील. सरन्यायाधीशांनी केलेल्या शिफारसीला केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर बोबडे सरन्यायाधीशपदाची शपथ घेऊ शकतात.
या मोठ्या निर्णयांमध्ये एस. ए. बोबडे यांचा सहभाग –
सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड संबंधी दिलेल्या निकालात न्यायाधीश बोबडे हे सहभागी होते. याशिवाय रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप झाला होता. त्याचा तपास करण्यासाठी तीन न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली होती. त्यात देखील बोबडे यांचा समावेश होता. रामजन्मभूमी-बाबरी मस्जिद प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाचा देखील न्यायाधीश एस. ए. बोबडे भाग होते.