एफएटीएफचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा, दहशतवाद संपवा


नवी दिल्ली – पाकिस्तानला दहशतवाद संपवण्यासाठी अ‍ॅक्शन प्लानची तात्काळ अंमलबजावणी आर्थिक कारवाई कृती दलाने (एफएटीएफ) करण्यास सांगितले आहे. एफएटीएफने यासाठी पाकिस्तानला फेब्रुवारी २०२० पर्यंतची मुदत दिली आहे. पाकिस्तानने निर्धारित वेळेत कारवाई पूर्ण न केल्यास त्यांना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल. त्याचबरोबर पाकिस्तानसोबत होणाऱ्या कोणत्याही आर्थिक देवाण-घेवाण आणि व्यवसायांवर नजर ठेवली जावी, असेही एफएटीएफने म्हटले आहे.

२०१८ मध्ये पाकिस्तानला एफएटीएफने करड्या यादीत टाकले होते. पाकिस्तान अ‍ॅक्शन प्लानमध्ये सुचवण्यात आलेल्या २७ पैकी २२ शिफारशींची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरले असल्याचे सांगण्यात आले आहे. अ‍ॅक्शन प्लानची अंमलबजावणी करण्यासाठी पाकिस्तानला एका वर्षाची वेळ दिली होती. यामध्ये मनी लॉण्ड्रिंग आणि दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत रोखण्यासाठी पर्याय सुचवण्यात आले होते.

फेब्रुवारी २०२० पर्यंत अ‍ॅक्शन प्लॅन पूर्ण करावा असे पाकिस्तानला बजावत आहोत. अ‍ॅक्शन प्लॅन फेब्रुवारी २०२० पर्यंत पूर्ण न झाल्यास एफएटीएफकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा नव्याने जारी करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. एफएटीएफने इशारा देताना यामध्ये इतर सदस्य देशांना पाकिस्तानसोबत करण्यात येणाऱ्या आर्थिक व्यवहार, तसेच व्यावसायिक संबंध आणि देवाण-घेवाण यावर विशेष लक्ष देण्यास सांगण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment