ट्विटरची मुस्कटदाबी – नेते करतील का मान्य?


आधुनिक युगात संगणक आणि इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत आहे. जवळपास प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आहे आणि या फोनवर सोशल नेटवर्किंग साईट्स दिसतात. यातही फेसबुक, व्हॉटसअॅप आणि ट्विटर यांसारख्या संकेतस्थळांनी अफाट लोकप्रियता मिळवली आहे. ट्विटरने या सर्वांमध्ये बाजी मारली असून अत्यंत कमी शब्दांमध्ये प्रतिपक्षाची खिल्ली उडवण्याची संधी मिळाल्यामुळे ट्विटरचे कोट्यवधी चाहते आहे. जगातील अनेक नेत्यांनीही हा मार्ग चोखाळला आहे. मात्र ट्विटरसारख्या साईट्सचा गैरवापर करणारेही काही कमी नाहीत. विशेष म्हणजे यात केवळ समाजातील गुन्हेगार प्रवृत्तीचेच लोक नाहीत तर अनेक नेत्यांचाही समावेश आहे. अशा नेत्यांना अंकुश लावण्याचे पाऊल आता ट्विटरने उचलले आहे. ही नेते मंडळी हा अंकुश सहन करतील का, हा आता प्रश्न आहे.

तसे पाहू जाता ट्विटरवरील आक्षेपार्ह ट्वीट्सची माहिती देण्यासाठी खुद्द ट्विटरनेच सोय केली आहे. या संकेतस्थळाच्या नियम किंवा सेवा अटींचे उल्लंघन करणाऱ्या ट्विट्स आणि थेट संदेशांविषयी वापरकर्ते माहिती देऊ शकतात. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ट्विट्स आणि थेट संदेशांमध्ये स्पॅम, अपमानास्पद किंवा प्रक्षोभक सामग्री, तोतयागिरी, कॉपीराईट किंवा ट्रेडमार्कविषयक नियमांचे उल्लंघन इत्यादींचा समावेश आहे. मात्र फार कमी वापरकर्ते या सोईचा वापर करतात. म्हणून ट्विटरनेच या संदर्भात पाऊल उचलले आहे.

नेत्यांनी ट्विटरच्या नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यासाठी ट्विटरने नवीन नियम बनवला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरचा गैरवापर केल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या. त्यानंतर हा नवीन नियम बनवण्यात आला आहे. एखाद्या नेत्याचे ट्वीट ट्विटरच्या मानकांनुसार नसेल तर त्या ट्वीटला रिट्वीट किंवा लाईक करता येणार नाही. म्हणजे हे ट्वीट आणखी शेअर होऊ नाही शकणार. परंतु असे ट्वीट डिलीटही करता येणार नाही किंवा हे खातेही करता येणार नाही. यापूर्वी अशा प्रकारच्या ट्वीट्सवर ट्विटर एक इशारा दाखवत असे. मात्र त्या इशाऱ्याचा ट्वीट शेअर होण्यावर कोणताही परिणाम होत नसे.

अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्या ट्वीटबाबत तक्रार केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. ट्रम्प यांनी ट्विटरचा गैरफायदा घेतला आणि यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे, अशी तक्रार हॅरिस यांनी केली होती. ट्रम्प यांचे ट्विटर खाते बंद करण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र ट्विटरने संबंधित ट्वीट डिलीट करण्याची किंवा ट्रम्प यांचे खाते बंद करण्याची मागणी मान्य केली नाही.

राजकारण्यांकडून ट्विटरच्या गैरवापराबाबत ट्विटरने एक ब्लॉग पोस्ट लिहिली आहे. राजकारणी व सरकारी पदांवर आसनस्थ असलेल्या लोकांकडून ट्विटरच्या गैरवापराबाबत बातम्या मिळत असतात. ट्विटर वापरणाऱ्या प्रत्येक राजकारण्याला ट्विटरच्या मानकांचे व नियमांचे पालन करावे लागेल. या मानक किंवा नियमांचे ज्याने उल्लंघन केले त्याच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे ट्विटरच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हे आक्षेपार्ह ट्वीट कसे असेल, याबाबतही ट्विटरने मार्गदर्शन केले आहे. जे ट्वीट दहशतवादाला प्रोत्साहन देते, हिंसेला चिथावणी देते किंवा हिंसा भडकावते (यात दोन देशांमधील नेत्यांमध्ये ट्विटरवर होणारे आरोप-प्रत्यारोप किंवा धमक्या यांचा समावेश नसेल), एखादी खासगी माहिती जाहीर करणे, अश्लील छायाचित्रे किंवा व्हिडिओ असे ट्वीट आक्षेपार्ह समजण्यात येतील.

जगातील बहुतेक मोठे नेते सध्या ट्विटरवर उपस्थित आहेत. मात्र या व्यासपीठाचा गैरवापर करण्याचे आरोप अनेक नेत्यांवर लागले आहेत. ट्रम्प यांच्यावर असे आरोप सर्वाधिक आहेत. ट्रम्प हे आपल्या ट्वीटद्वारे खोट्या बातम्या देतात. ट्रम्प हे दोन ट्विटर खाती वापरतात. एक अमेरिकी अध्यक्षांचे अधिकृत हँडल आणि दुसरे स्वतःचे खासगी हँडल. त्यांच्या खासगी खात्याचे साडे सहा लाखांपेक्षा जास्त अनुयायी आहे, तर अधिकृत खात्यावर पावणे तीन कोटी जण फॉलो करतात.

ट्विटरचा गैरवापर करणारे आणखी एक नाव पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आहे. त्यांना ट्विटरवर एक कोटीपेक्षा जास्त जण फॉलो करतात. इम्रान खान ट्विटरवर नियमितपणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारच्या विरोधात ट्वीट करतात. एका ट्वीटमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी हे नाझी विचारसरणीचे समर्थक असल्याचा आरोप केला होता. भी लगाए थे. पाकिस्तानचे अनेक मंत्री व नेतेही ट्विटरवर खोट्या बातम्या पसरवताना पकडले गेले आहेत. यात दुसऱ्या देशांतील हिंसेची छायाचित्रे काश्मिरमधील छायाचित्रे म्हणून खपवणे सामील आहे.

त्यामुळेच ट्विटरने उचललेले पाऊल स्वागतार्हच म्हणायला पाहिजे. मात्र हे नेते त्याला मान्य ट्विटरची मुस्कटदाबी म्हणतील. त्यामुळे ते मान्य करतील का, हा प्रश्नच आहे.

Leave a Comment