अबब! वायू प्रदूषणाचे 400,000 अकाली मृत्यू!


प्रदूषण ही जगातील एक प्रमुख समस्या बनली आहे. त्यातही वायू प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच, शिवाय सर्व वयोगटांतील लोकांमध्ये श्वसन व फुफ्फुसाचे रोग होतात. आतापर्यंतची अशी आकडेवारी अनेकदा समोर आली. मात्र एका ताज्या अहवालातून आलेली माहिती या सर्वांवर कडी करणारी आहे.

युरोपमधील शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना जीवघेण्या वायू प्रदूषणाचा धोका असून युरोपमध्ये 412,000 अकाली मृत्यू झाले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी युरोपीय महासंघातील (ईयू) देशांनी आपल्या शहरांमधील गाड्यांची संख्या कमी करण्यासारखी वेगवान पावले उचलावीत, अशी शिफारसही अहवालात करण्यात आली आहे.

युरोपच्या पर्यावरण निरीक्षकांनी हा अहवाल तयार केला असून हवामानाच्या खराब दर्जामुळे 2016 मध्ये युरोपमध्ये चार लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाल्याचे वास्तव त्यात अधोरेखित करण्यात आले आहे. युरोपीय महासंघातील हा सर्वात अलीकडचा डेटा उपलब्ध आहे, असे बुधवारी जाहीर झालेल्या ईयूच्या अहवालात म्हटले आहे.

युरोपीय महासंघाचे 28 सदस्य असून या सदस्यांपैकी 16 देशांमध्ये नायट्रोजन डायऑक्साइडच्या उत्सर्जनाबाबत ईयूची कायदेशीर मर्यादा ओलांडून अस्वीकार्य उत्सर्जन केल्याचे किमान एक प्रकरण नोंदवले आहे, अशी माहिती त्यात देण्यात आली आहे. त्यातही बेल्जियम, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स आणि स्पेन या देशांमध्ये वाहनाच्या उत्सर्जनातील वायूची पातळी मोठ्या प्रमाणावर असुरक्षित आढळून आली.

युरोपीय देशांनी नायट्रोजन डायऑक्साईडची पातळी कमी करण्यासाठी कारची संख्या कमी करावी जेणेकरून वायू प्रदूषण कमी होईल, असे या अहवालात म्हटले आहे. तसेच लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला आणि रस्ते आणि औद्योगिक क्षेत्राच्या जवळपास राहणारे लोक यांना या प्रदूषणाचा अधिक धोका असल्याचे त्यात अधोरेखित करण्यात आले आहे.

वायू प्रदूषण हा सध्या मानवी आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा पर्यावरणीय धोका आहे, असे युरोपियन पर्यावरण एजन्सीचे हवा गुणवत्ता तज्ञ आणि हा अहवाल लिहिणारे अल्बर्टो गोन्झालेस ऑर्टिज यांनी म्हटले आहे.

या अहवालात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (डब्ल्यूएचओ) आकडेवारीचा हवाला देण्यात आला आहे. यानुसार हवेच्या प्रदूषणामुळे हृदयविकार आणि स्ट्रोक ही अकाली मृत्यूची सर्वात सामान्य कारणे होती. त्यानंतर फुफ्फुसांचा आजार आणि फुफ्फुसांचा कर्करोग हे मृत्यूला सर्वाधिक कारण ठरले.

युरोपीय शहरांमधील आरोग्याला धोकादायक ठरणाऱ्या सूक्ष्मकणांची पातळी खाली येत आहे, मात्र ती पुरेशा वेगाने खाली येत नाही. आम्ही अद्याप युरोपियन युनियनच्या मानकांपर्यंत पोहोचलो नाही आणि अर्थातच आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांपासून खूप दूर आहोत,” असे ऑर्टिज पुढे म्हणाले.

युरोपीय देश अर्थातच या समस्येविरुद्ध जागे झाले आहेत. देशातील प्रदूषणाच्या समस्येवर उपाय म्हणून ब्रिटिश सरकारने मंगळवारीच एक विधेयक मंजूर केले. या विधेयकानुसार, हवेतील प्रदूषणकारक कण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सूक्ष्मकण उत्सर्जनाच्या मानकांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांना कार उत्पादकांनी परत पाठवावे, अशीही या विधेयकात तरतूद आहे. मात्र स्पेन आणि बल्गेरिया हे दोन देश प्रदूषणाच्या धोक्यांपासून नागरिकांना वाचविण्यात अपयशी ठरले आहेत, असा ठपका युरोपीय आयोगाने जुलै महिन्यात ठेवला होता.

ही तर झाली प्रगत देशांतील स्थिती. आपल्याकडे तर सगळाच आनंदीआनंद आहे. डिसेंबर 1984 मध्ये भोपाळ येथील युनियन कार्बाईडच्या कारखान्यातून मिथिल आयसोसायनाइड या विषारी वायूची गळती झाली. त्याच्या प्रादुर्भावामुळे तेथील हजारो लोक मृत्युमुखी पडले, अनेकांना कायमचे अंधत्व किवा अपंगत्व आले. त्या पीडितांना आजही पुरेशी नुकसान भरपाई मिळालेली नाही. याशिवायही वायू प्रदूषकांमुळे ऑक्सिजन चक्र, कार्बन चक्र, जलचक्र व पर्यावरण यांच्यात असंतुलन निर्माण झाले आहे.

भारतात औद्योगिक प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरही अनेक कायदे व नियम केले आहेत. उदा., जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायदा, पर्यावरण संरक्षण व संधारण कायदा. मात्र अन्य कायद्यांप्रमाणेच या कायद्यांची अंमलबजावणीही कागदावरच आहे. या संदर्भातील कायद्यांचे उल्लंघन करणार्या कारखान्याच्या व्यवस्थापनास जबाबदार व शिक्षेस पात्र ठरविणेजाणे अपेक्षित आहे, मात्र ते क्वचितच होताना दिसते. अपघात किंवा आपत्ती यांमध्ये मृत्यूमुखी पडणारे लोक दिसतात त्यामुळे त्यांची तीव्रता कळते, पण प्रदूषणाचे बळी एकदम दिसत नसल्यामुळे त्यांची दखलही घेतली जात नाही. हे खरे दुर्दैव आहे.

Leave a Comment