चौथीच्या पुस्तकातील शिवरायांचा इतिहास राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने वगळला


मुंबई : प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्यात येतो. शिवरायांचे धडे चौथीच्या अभ्यासक्रमातून जवळपास अर्ध्या शतकाहून अधिक वर्षांपासून शिकवले जात आहेत. याआधी केंद्रीय शिक्षण मंडळाकडून शिवाजी महाराजांच्या इतिहासाला पुरेसे स्थान देत नसल्याबद्दल राज्यभरातून नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळानेही आता केंद्रीय शिक्षण मंडळाच्या पावलावर पाऊल टाकले आहे. सध्या राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यात शिवाजी महाराजांचे नाव प्रत्येक व्यासपीठावर मतांच्या राजकारणासाठी घेतले जात आहे. पण चौथीच्या पुस्तकातून महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने शिवाजी महाराजांचा इतिहासच वगळला आहे.

स्थानिक संस्कृतीसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थांना मिळावे यासाठी स्थानिक भाषेत शिक्षण देणाऱ्या शाळांना आंतरराष्ट्रीय असे बिरुद लावले आहे. महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ त्यासाठी स्थापन करण्यात आले. स्थापनेनंतर या शाळा वर्षभर पुस्तकांशिवाय चालवण्यात आल्या. ऑगस्टमध्ये या शाळेची पहिली ते चौथीची पुस्तके छापल्यानंतर चौथीच्या पुस्तकात शिवरायांचा इतिहासच वगळल्याचे समोर आले आहे.


1991 मध्ये चौथीच्या अभ्यासक्रमात असलेल्या इतिहासाच्या पुस्तकात बदल करण्यात आला होता. त्यावेळी मोठा वाद झाल्यानंतर चौथीच्या पुस्तकातील शिवाजी महाराजांचा इतिहास न बदलण्याचा ठराव विधिमंडळात झाला होता. त्यानंतर 2010 मध्ये अभ्यासक्रमाची पुनर्रचनाही झाली, पण चौथीचे इतिहासाचे पुस्तक तसेच ठेवण्यात आले. इतिहासाचा अभ्यासक्रम 1970 मध्ये निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर काही ठराविक बदल वगळले तर पुस्तक तसेच ठेवण्यात आले आहे. पण आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने यात बदल केले आहेत.

काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमातून शिवरायांचा इतिहास हद्दपार करणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारला हद्दपार करण्याची हीच वेळ असल्याचे म्हटले आहे. तर यावर खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनीही संताप व्यक्त केला असून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा घाट घातला असेल तर हे खपवून घेतले जाणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच ही आगळीक ज्यांनी कुणी केली असेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

Leave a Comment