ऑस्ट्रेलियात टी २० स्पर्धेची महिला पुरुष संघाना समान बक्षिसे


ऑस्ट्रेलियन महिला तसेच पुरुष क्रिकेट टीमना टी २० वर्ल्ड कपसाठी दिली जाणारी रक्कम समान असेल असा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला असून असा निर्णय घेणारा ऑस्ट्रेलिया क्रिकेट जगतातील पहिला देश बनला आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी २० वर्ल्ड कप होत असून या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन महिला टीम चँपियन ठरली तर त्यानाही पुरुष टीमच्या बरोबरीने ११.४ कोटी मिळणार आहेत.

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल आयसीसीने सोमवारी महिला टी २० वर्ल्ड कप साठीच्या प्राईज मनी मध्ये ३२० टक्के वाढ करून टी ७.६ कोटींवर नेली होती. तरीही ही रक्कम पुरुष क्रिकेट टीमच्या तुलनेत कमी आहे. पुरुष टीम साठी बक्षीस रक्कम ११.४ कोटी आहे. ऑस्ट्रेलियाने महिला टीमला त्यांच्याबरोबरीने बक्षीस रक्कम मिळावी यासाठी वरचे ४.२ कोटी स्वतः भर घालून देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात पुढील वर्षात ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी २० वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलिया शिवाय अन्य देशाची पुरुष टीम जिंकल्यास त्यांना ११.४ कोटी तर अन्य देशांची महिला टीम जिंकली तर त्यांना ७.२ कोटी बक्षीस रक्कम दिली जाईल असे स्पष्ट केले गेले आहे. फक्त ऑस्ट्रेलियन महिला टीम विजेती ठरली तर त्यांना ११.४ कोटी दिले जाणार आहेत.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाकडून या संदर्भात असे सांगितले गेले आहे, महिला क्रिकेट जगभर लोकप्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे महिला खेळाडूंना सतत प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियन महिला टीम सध्या टी २० रँकिंग मध्ये जगात पहिल्या स्थानावर आहे त्यामुळे आगामी वर्ल्ड कप मध्ये ही टीम विजेतेपदाची मजबूत दावेदार मानली जात आहे.

Leave a Comment