इराण आणि सौदी अरेबियात पाकिस्तान ‘दिवाणा’


उर्दू भाषेत एक म्हण आहे, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. आपला काही संबंध नसताना दुसऱ्यांच्या प्रकरणात नाक खुपसणाऱ्यांसाठी ही म्हण वापरली जाते. पश्चिम आशियातील सौदी अरेबिया आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याची वल्गना आता पाकिस्तान करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे यांच्यात समेट घडविण्यासाठी जाणार असल्याचे वृत्त आहे. जाणकारांनी या बातमीची थट्टा उडविली आहे.

काही दिवसांपूर्वी इम्रान यांनी इराणचे अध्यक्ष हसन रूहानी यांची तेहरान येथे भेट घेतली. पश्चिम आशियात शांती आणि सुरक्षेला चालना देणे हा इम्रान यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे, असे पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे. इम्रान खान यांचा हा या वर्षीचा दुसरा इराण दौरा आहे. “आम्ही या भागात शांततेला प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक पावलाचे स्वागत करतो आणि आमच्या देशात त्यांच्या दौऱ्याचे स्वागत करतो,” असे पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत जारी केलेल्या एका संयुक्त निवेदनात इराणच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. या दोन नेत्यांमध्ये अन्य मुद्द्यांसोबतच येमेन युद्ध आणि इराणवर अमेरिकी निर्बंधांबाबतही चर्चा झाल्याचे रूहानी यांनी सांगितले.

इराणनंतर इम्रान खान सौदी अरेबियाचाही दौरा करणार आहेत. सौदी अरेबिया हा पाकिस्तानचा महत्त्वाचा सहकार्य आहे. गेल्या महिन्यात इम्रान यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. त्यावेळी आपण सौदी आणि इराणमध्ये मध्यस्थता करण्याची विनंती ट्रम्पना केली, असा दावा इम्रान यांनी केला. मात्र ट्रम्प यांनी हा दावा नाकारला आहे.

तरीही सौदी अरेबिया आणि इराणमधील तणाव कमी करण्याचे प्रयत्न पाकिस्तानने चालूच ठेवले आहेत. त्याला कारण इराणमधील युद्धामुळे पाकिस्तानवर पडणारा बोजा आहे. अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या इराणसोबतच्या कोणत्याही युद्धामुळे मोठ्या संख्येने लोक इराणमधून पाकिस्तानात येतील, ही भीती पाकिस्तानला सतावत आहे. तसे झाले तर पाकिस्ताना बहुसंख्य असलेले सुन्नी मुस्लिम आणि अल्पसंख्यक शिया मुस्लिमांमध्ये हिंसक संघर्ष होऊ शकतो. तसेच या युद्धामुळे उद्भवणारी तेलाची टंचाई पाकिस्तानाची अगोदरच दुर्बळ झालेल्या अर्थव्यवस्थेला बरबाद करेल.

पाकिस्तान आणि इराण हे शेजारी देश असले आणि दोघेही मुस्लिम देश असले तरी त्यांच्यात विश्वासाचे आणि सलोख्याचे संबंध कधीही नव्हते. गेल्या अनेक दशकांपासून त्यांचे संबंध तणावाचे राहिले आहेत. तसे पाहू जाता पाकिस्तानने सौदी अरेबिया आणि इराण या दोघांशीही चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र अलीकडच्या वर्षांत तो इराणपासून दूर गेला आहे. पाकिस्तान आणि इराणच्या सीमेवर असलेल्या बलूचिस्तान प्रांतांत सक्रिय असलेल्या फुटीरवाद्यांना समर्थन देण्याचा आरोप पाकिस्तान व इराण एकमेकांवर करतात. पाकिस्तानने इराणविरोधी दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मार्च महिन्यात रूहानी यांनी केली होती. इराणच्या पूर्व भागात झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये सुन्नी गटांना पाकिस्तानने मदत केल्याचे इराणचे म्हणणे आहे. पाकिस्तानातील शिया लोकांचा नरसंहार करण्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

पाकिस्तान ज्या प्रकारे सौदी अरेबियाला खुश करण्याची धडपड करत आहे, तेही इराणला पसंत येण्यासारखे नाही. येमेनमध्ये हूती बंडखोरांच्या विरोधात सौदी अरेबिया करत असलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या भूमिकेवरही इराण नाराज आहे. येमेनमधील हे हल्ले करणाऱ्या सौदी नेतृत्व असलेल्या लष्करी आघाडीचे नेतृत्व पाकिस्तानचे माजी सेनाप्रमुख राहील शरीफ करत आहेत.

इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील संघर्षाचे कारण मुस्लिमांमधील दोन पंथांतील फरक आहे. दोन्ही देश एकमेकांना इस्लामच्या वेगवेगळ्या शाखांचे संरक्षक मानतात. सौदी अरेबिया हा सुन्नी देश असून इराण हा शिया देश आहे. जगभरातील शिया व सुन्नी लोकांतील संघर्षाचे हे दोन केंद्रबिंदू असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे पाकिस्तानात धार्मिक हिंसाचार पराकोटीला गेला आहे. अनेक ठिकाणी कट्टरवादी गटांनी शिया लोकांना लक्ष्य केले आहे. तालिबानसह असे अनेक गट कट्टरपंथी सौदी वहाबी विचारसरणाने प्रभावित झालेले आहेत.

या परिस्थितीत इराणच्या हितांकडे पाकिस्तान दुर्लक्ष करणार नाही, याचा भरवसा इम्रान खान इराणला कसा देणार? त्यामुळे एखाद्या त्रयस्थाच्या लग्नात नाचणाऱ्या दारूड्या व्यक्तीसारखी पाकिस्तानची अवस्था झाली आहे. इराण आणि सौदी अरेबियात पाकिस्तान ‘दिवाणा’ नाचत असल्याचे जगाला दिसत आहे.

Leave a Comment