नेपाळ आणि चीन पुन्हा मोजणार एव्हरेस्टची उंची


नेपाळ आणि चीन या दोन्ही देशांनी पुन्हा एकदा जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टची उंची मोजण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी व पंतप्रधान ओपी शर्मा सॉली याच्यात गेल्या आठवड्यात नेपाळ भेटीदरम्यान या संदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या चर्चेत पुन्हा एकदा एव्हरेस्टची उंची मोजण्यावर सहमती झाली.

नेपाळमध्ये २०१५ मध्ये झालेल्या ७.६ रिश्टर स्केलच्या भीषण भूकंपामुळे एव्हरेस्ट शिखराची उंची ३ सेंटीमीटरने कमी झाली होती असे सांगितले जाते. भारताने २०१७ मध्ये एव्हरेस्टची उंची मोजण्याच्या कामी सहकार्याचा प्रस्ताव नेपाळ पुढे मांडला होता पण तो प्रत्यक्षात उतरला नाही. सध्याची एव्हरेस्टची सर्वमान्य उंची ८८४८ मीटर्स आहे.

नेपाळी भाषेत माउंट एव्हरेस्टला माउंट सागरमाथा म्हटले जाते तर चीनी भाषेत माउंट झुमूलंगमा असे म्हटले जाते. एव्हरेस्ट हे नेपाळ आणि चीनच्या दोस्तीचे प्रतिक आहे. सर्वप्रथम एव्हरेस्टची उंची १८५५ मध्ये जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या नेतृत्वाखाली भारताने मोजली होती. त्यानंतर पुन्हा एकदा एव्हरेस्टच्या उंचीची घोषणा भारताने १९५६ मध्ये केली होती आणि जगातील हे सर्वोच्च उंचीचे शिखर म्हणून मान्य केले गेले होते.

Leave a Comment