आजार मान्य केला तरच उपचार सापडेल


देशात मंदीचे वातावरण आहे. एकीकडे लाखो रोजगार जाण्याच्या बातम्या आहेत आणि शेकडो उद्योग बंद झाले आहेत. दुसरीकडे मंदीच्या बाबत केंद्र सरकारकडून दावे-प्रतिदावे करत आहेत. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलेले वक्तव्य हे त्या सर्वांवर कडी करणारे आहे. नुकतेच प्रदर्शित झालेल्या तीन-तीन चित्रपटांनी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय केला आहे, मग मंदी कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.

शनिवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलताना रविशंकर प्रसाद यांनी हे वक्तव्य केले होते. गांधी जयंतीच्या दिवशी गेल्या आठवड्यात तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि त्यांनी एका दिवसात 120 कोटी रुपयांची कमाई केली. याचा संदर्भ प्रसाद यांनी दिला होता. देशात मंदी असती तर या तिन्ही चित्रपटांनी 120 कोटी रुपयांची कमाई केली नसती, असे प्रसाद म्हणाले. अर्थव्यवस्था ठणठणीत आहे म्हणून या चित्रपटांची एवढी कमाई झाली, असे त्यांनी सांगितले.

नुकत्याच प्रसृत झालेल्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या (एनएसएसओ) एका अहवालाबाबत त्यांना प्रश्न केला असता हा अहवाल चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य लोकांची दिशाभूल करणे हे काही जणांसाठी फॅशनच बनली आहे, असे ते म्हणाले. देशात बेरोजगारीचा दर आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 6.1 टक्के झाला होता आणि गेल्या 45 वर्षांतील हा सर्वाधिक दर आहे, असे एनएसएसओच्या अहवालात म्हटले आहे असे वृत्त गेल्या महिन्यात एका इंग्रजी वृत्तपत्राने छापले होते.

गंमत म्हणजे संपूर्ण जगच मंदीच्या जात आहे, हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या (आयएमएफ) संस्थेनेही हे मान्य केले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदपणा दिसून येत आहे आणि त्यामुळे जगातील 90 टक्के देशांचा विकासदर पुढील वर्षी मंद राहील, असे आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी म्हटले आहे. चिंतेची बाब ही, की या मंदीचा परिणाम भारत व ब्राझील यांसारख्या विकासशील देशांवर सर्वात जास्त दिसून येईल, असा इशारा त्यांनी दिला होता.

सर्व विकसित देशांमध्ये आर्थिक घडामोडींमध्ये सुस्ती दिसत आहे. अमेरिका आणि जर्मनीसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये बेरोजगारीचा दर ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर आहेत. दुसरीकडे जपान, अमेरिका आणि युरोपीय महासंघाच्या अर्थव्यवस्थाही उतरत्या पातळीवर आहेत. चीनची अर्थव्यवस्थाही पूर्वीसारखी वेगाने धावताना दिसत नाही.

आधीच अडचणीत असलेल्या देशांसाठी ही परिस्थिती मोठ्या अडचणी निर्माण करणारी आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये चालू असलेल्या आयएमएफच्या योजनाही अडचणीत येऊ शकतात. येत्या आठवड्यात आयएमएफ आणि जागतिक बँकेची वार्षिक बैठक होणार आहे. त्यात या दोन्ही संस्था आपले आर्थिक अंदाज जाहीर करतील.

तसे पाहू जाता मंदीची जाणीव सगळ्यांनाच होती, त्यावरून चर्चाही होती. मात्र एखाद्या जागतिक आर्थिक संघटनेने पहिल्यांदावर त्यावर अधिकृत मोहोर उमटवली होती. एकदा आजार आहे, हे मान्य झाला की त्यावर उपाय योजण्याला वेग येऊ शकतो त्यामुळे आयएमएफच्या त्या स्वीकृतीचे स्वागतच झाले होते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रसाद यांच्या वक्तव्याकडे पाहावे लागेल. प्रसाद काय किंवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन या काय, देशाच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसल्याचे ते मान्यच करत नाहीत. गेले काही महिने सतत वाहनांच्या विक्रीत घट होत आहे. वस्तू आणि सेवा करातून मिळणारा (जीएसटी) महसूल कमी होऊन तो 19 महिन्यांमधील सर्वात खालच्या पातळीवर पोचला आहे. ऑगस्ट महिन्याच्या पाठोपाठ सप्टेंबरमध्ये बड्या वाहन उत्पादक कंपन्यांच्या वाहनांची विक्री कमी झाली. मारुती सुझुकीच्या वाहनांची विक्री मागील वर्षाच्या तुलनेच 27.1 टक्क्यांनी घसरली आणि एकूण 110454 वाहने विकली गेली. टाटा मोटरच्या वाहनांची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत 45.4 टक्क्यांनी घसरली आणि त्यांची 28079 ही इतकी वाहने विकली गेली. ऑगस्टमध्ये 98202 कोटी रुपये इतका जीएसटी महसूल जमा झाला होता तर सप्टेंबरमध्ये 91116 कोटी रुपये इतका महसूल जमा झाला.

या संदर्भात पुण्यात सीतारामन यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आता तुम्ही जीएसटीच्या नावाने खडे फोडू शकणार नाही. तो कायदा झाला आहे, असे उत्तर त्यांनी दिले. प्रसाद यांनी त्याच दिशेने पुढचे पाऊल टाकून मंदीची स्थिती नाकारण्यासाठी चित्रपटांचा आधार घेतला आहे. तुम्ही जर वास्तव नाकारत राहिलात तर उपचार कसा होणार?

Leave a Comment