प्रदीप शर्मांनी प्रचारसाठी बनवले चक्क रॅप साँग


मुंबई – आता अवघ्या काही दिवसांवर राज्याच्या विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली असून सर्वच पक्ष सध्या आपल्या प्रचारासाठी सोशल मीडिया आणि नव्या मार्गांचा अवलंब करत आहेत. काही पक्षांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही गाण्याच्या माध्यमातून आपला प्रचार केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसनेही युवकांना डोळ्यासमोर ठेवून काही दिवसांपूर्वी रॅप साँगचा वापर करून विरोधकांवर हल्लाबोल केला होता. पण आता रॅप साँगच्या माध्यमातून शिवसेनेचे नालासोपारा विधानसभेचे अधिकृत उमेदवार प्रदीप शर्मा यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना नालासोपारा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांचे त्यांना आव्हान असणार आहे. हा मतदारसंघही आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच प्रदीप शर्मा यांनी आता रॅप साँगच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. हे गाणे नालासोपाऱ्यात राहणाऱ्याच रॅप गाणाऱ्या मुलांनी गायले आहे. यातील काही मुले गली बॉय या चित्रपटातही चमकली होती.

Leave a Comment