जर्मनीत यहुदींवर पुन्हा अत्याचार


पूर्व जर्मनीतील हाले नावाच्या शहरातील ही घटना. तेथील यहुदींचे (ज्यू) प्रार्थनास्थळ असलेल्या एका सिनेगॉगमध्ये सुमारे 70 लोक पूजा करण्यासाठी आणि यहुदी लोकांचा योम किपुर हा सण साजरा करण्यासाठी आले होते. त्याच वेळेस एक जर्मन व्यक्ती हातात हातबॉम्ब आणि रायफल घेऊन तिथे आला. मात्र सिनेगॉगच्या भक्कम दरवाजामुळे ते लोक वाचले आणि एक मोठा अनर्थ टळला. ही घटना घडली बुधवार म्हणजे 9 ऑक्टोबर 2019 रोजी घडली.

हा हल्लेखोर 27 वर्षांचा होता आणि तो हेल्मेट घालून त्या सिनेगॉगमध्ये गेला होता. त्याने त्याच्या हेल्मेटवर कॅमेरा लावला होता आणि आपल्या या क्रूर कृत्याचे चित्रण करण्याची त्याची योजना होती. इतकेच नाही तर त्याने जे केले ते त्याने एका व्हिडिओ गेमच्या संकेतस्थळावर अपलोडही केले. सिनेगॉगमध्ये गोळीबार करण्यापूर्वी त्याने इंग्रजीतून एक वाक्य उच्चारले, “सगळ्या समस्यांच्या मुळाशी यहुदीच आहेत.” या गोळीबारात दोघे जण ठार झाले आणि त्या हल्लेखोराला अटक करण्यात आली.

या घटनेमुळे जर्मनीच्या काळ्या कालखंडातील काळ्याकुट्ट आठवणी पुन्हा यहुदी लोकांच्या मनात दाटून आल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनी आणि जर्मनीच्या नाझी सत्ताधाऱ्यांनी काबीज केलेल्या प्रदेशातील 60 लाख यहुदी लोकांची हत्या करण्यात आली, ज्यूंचा नरसंहार करण्यात आला. दुसरे महायुद्ध सुरू झाले 1939 मध्ये आणि संपले 1945 मध्ये. या युद्धाच्या आरंभाचे 80वे वर्ष यंदा होत असतानाच जर्मनीत पुन्हा यहुदी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांना मोकळेपणाने वागण्यात, सिनेगॉगमध्ये जाण्यात अडथळे येत आहेत.

जर्मनीच्या दृष्टीने यहुदी आणि यहुदी लोकांचा द्वेष या दोन्ही गोष्टी अत्यंत संवेदनशील आहेत. याचे कारण जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याने केलेली यहुदी लोकांची कत्तल. हिटलरच्या नाझी विचारप्रणालीत ज्यू-द्वेष हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता. नाझी विचारसरणी वंशश्रेष्ठत्वावर, असमानतेवर आणि अन्य वंशीयांना दुय्यम दर्जाचे मानव समजण्यावर अवलंबून होती. त्यासाठी यहुदी लोकांना खलनायक ठरवण्यात आले.

पहिल्या महायुद्धानंतर 1918च्या सुमारास जर्मनीमध्ये ज्यूद्वेषाने कळस गाठला होता. युद्धात हरल्यामुळे व तहाच्या अपमानास्पद अटींमुळे जर्मन लोकांची मने खचली होती. या पराभूत मनोवृत्तीतून त्यांना वर काढण्याकरिता कोणाचा तरी बळी देणे आवश्यक होते. त्यासाठी हिटलरने यहुदी लोकांना लक्ष्य केले. समाजाच्या सर्व क्षेत्रांत यशस्वी ठरलेल्या ज्यू लोकांवर गद्दार असल्याचा आरोप करण्यात आला. जर्मन लोक हे आर्य वंशाचे आहेत, आर्य हे उच्च संस्कृतीचे प्रवर्तक आहेत आणि ज्यू हे संस्कृतीचे विध्वंसक आहेत, असा नवा सिद्धांत त्यांनी मांडला.

ज्यू लोक हे सैतान आहेत.श्रेष्ठवंशीय जर्मन लोकांचा पुरुषार्थ खच्ची करण्यासाठी त्यांनी निरनिराळी कारस्थाने रचली. खुद्द ख्रिस्ती धर्म हेही असेच एक कारस्थान होते आणि मार्क्सवादी बोल्शेव्हिझम हेही ज्यूंचे कारस्थान होते, असे नाझींचे मत होते. कम्युनिझमपासून वेश्याव्यवसायापर्यंत सर्व भ्रष्ट व अधःपाताचे मूळ ज्यू लोकच आहेत, असे नाझी जर्मनीत मानले जात होते. याचा परिणाम यहुदी लोकांच्या नरसंहारात झाला. यहुदी लोकांची ही कत्तल करण्यासाठी छळछावण्या आणि कत्तलखाने उघडण्यात आले. अर्थात तेथे केवळ माणसांना मारण्यात येत नव्हते. माणसांना नुसते मारायचे असते, तर या छावण्यांची गरजच नव्हती पण नाझींना यहुदी लोकांना अमानुष शारीरिक छळ व विटंबना करायची होती.

तो सगळा इतिहास या घटनेने पुन्ही जीवंत झाला. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी जेव्हा जर्मन संसदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले तेव्हा यहुदींमध्ये अशीच भीतीच लाट उसळली होती. याचे कारण म्हणजे आल्टरनेटीव्ह फ्यूर डॉईट्शलांड (एएफडी) या पक्षाने त्या निवडणुकीत मोठे यश मिळविले होते. युरोप आणि अमेरिकेतील यहूदी संघटनांनी या निकालांवर चिंता व्यक्त केली होती. तसेच अत्यंत उजव्या विचारसरणीचा म्हणून मानल्या गेलेल्या एएफडीला थांबविण्यासाठी जर्मन नेत्यांना आवाहन केले होते. “जगभरात यहुदीविरोधाची भावना वाढत आहे. अशा वेळेस जर्मनीच्या काळ्या कालखंडाची आठवण काढणाऱ्या पक्षाला बाहेर काढले पाहिजे. असा पक्ष आता जर्मन संसदेत आपल्या नीचतेचा प्रसार करेल,” असे जागतिक यहुदी काँग्रेसचे अध्यक्ष रोनाल्ड लाउडर यांनी तेव्हा म्हटले होते.

दुसरे महायुद्ध संपल्यापासून म्हणजे 1945 पासून जर्मनीत उजव्या विचारसरणीचा एकही पक्ष संसदेत पोचू शकला नव्हता. जर्मनीत सुमारे दोन लाख यहुदी राहतात आणि अधिकृत आकडेवारीनुसार, जर्मनीमध्ये दर वर्षी यहुदी लोकांच्या विरोधात 500च्या वर गुन्ह्यांची नोंद होते. अशा अवस्थेत जर्मनीत ज्यूद्वेष पुन्हा डोके वर काढत असेल तर ती जगाच्या दृष्टीने चिंतेची गोष्ट म्हणावी लागेल.

Leave a Comment