चोरच जर न्यायाधीश म्हणून बसला तर न्याय कसला होणार – शरद पवार


पुणे – आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सांगतात माझे सरकार पारदर्शक आणि निष्कलंक होते. कोणीही माझ्या सरकारवर आरोप केले नाही. मग 20 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे धनंजय मुंडे यांनी दिले, त्यांच्यापैकी काहीना उमेदवारीची तिकीटे का नाकारली. अहो चोरच जर न्यायाधीश म्हणून बसला तर न्याय कसला कपाळाचा होणार, असा जबरदस्त टोला लगावतानाच दौंड येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार घणाघाती टीका केली.

20 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले मी तपासले यात काही नाही. म्हणून आम्ही तिसऱ्या माणसाकडे तपासायला दया म्हणून सांगितले तर नाही तपासू दिले. जर चुकीचे काही यांनी केले नसेल तर मग मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांना पुन्हा का तिकीट नाही दिले. भाजपने त्यांच्या खासमखास पाच मंत्र्यांना तिकीट पुन्हा दिले नाही. त्यांना का गाळले? कुठेतरी पाणी मुरत असल्यामुळे त्यांना तिकीट दिले नाही ना. तुम्ही ज्यांना तिकीटे देवू शकत नाही. त्यांच्यावर कारवाई करत नाही आणि आम्हाला सांगतात आमचे सरकार पारदर्शक अहो यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा ? असा सवालही शरद पवार यांनी केला. महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचा असल्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. ही सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांच्या हातातून सत्ता काढून घ्यायची असल्याचे आवाहन शरद पवार यांनी केले.

कर्तृत्वाचा मक्ता घेवून फक्त पुरुषच आला आहे, हा समज आहे पण यात काही तथ्य नाही. जिचे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाला महत्व दिलेच पाहिजे. अमेरिकेच्या सैन्यदलात मुली आहेत, पण आपल्याकडे का नाही. यावेळी शरद पवार यांनी आपण संरक्षणमंत्री असतानाचा किस्सा सांगताना भारताच्या हवाई दलात, सैन्य दलात संधी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आज आपल्या मुली लढाऊ विमाने घेवून जात आहेत. संधी दिली की, तिथेही कर्तृत्व दाखवता येते असे सांगतानाच मी मुख्यमंत्री असताना देशात पहिल्यांदा असा निर्णय घेतला होता की, सोसायटी असो की ग्रामपंचायत असो, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असो, स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 33 टक्के आरक्षण दिले. आता 50 टक्के जागा महिलांना दिल्या आहेत. त्या महिला आज पंचायत समिती, जिल्हा परिषदा चांगल्याप्रकारे सांभाळत आहेत अशा शब्दात महिलांचे कौतुक शरद पवार यांनी केले.

समाज पुढे न्यायचा असेल तर स्त्री-पुरुष, तरुण असो, दलित,ओबीसी,आदिवासी या सगळयांना घेवून पुढे जाता आले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे काम करत आहे. पण भाजप हे काम करताना दिसत नाही. ज्यांच्याकडे समाज सुधारण्याची वृत्ती नाही त्यांना आम्ही मताचा पाठिंबा देणार नसल्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचा असल्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. म्हणून ही सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांच्या हातातून सत्ता काढून घ्यायची असल्याचे आवाहनही शरद पवार यांनी केले.

पाच वर्षापूर्वी राज्यात आलेल्या सरकारला राज्यातील लहान घटकांची चिंता नाही. राज्यातील 16 हजार शेतकऱ्यांनी यांच्या नाकर्तेपणामुळे आत्महत्या केल्या. याउलट केंद्र सरकारने देशाच्या धनिष्टांचे कर्जाचे ओझे माफ करून 82 हजार कोटींचे कर्ज फेडले. संपूर्ण देशात आज शेतीची अवस्था बिकट आहे. या राज्यकर्त्यांच्या नजरेत हे कसे येत नाही. असा संतप्त सवालही शरद पवार यांनी सरकारला केला. आपण दौंड विभागात कारखानदारी उभी केली. येथील लोकांना याचा फायदा झाला. पण आजच्या राज्यकर्त्यांनी केलेल्या चुकीच्या धोरणामुळे येथील मगारांना महिनोमहिने पगार मिळत नसल्यामुळे येथील अर्थव्यवस्था बिघडली आहे. तरीदेखील तुम्ही मतांचा जोगवा मागायला कसे येतात असा सवाल शरद पवार यांनी सरकारला केला.

Leave a Comment