महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथीचे संकेत?


भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दसऱ्याच्या दिवशी बीडमधील सभेला संबोधित केले. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला त्यांनी तिथून सुरुवात केली. शहा यांनी महाराष्ट्राच्या रणसंग्रामाची तुतारी फुंकण्यासाठी निवडलेल्या या स्थानामुळे राजकीय चर्चेला वाव मिळाला आहे. आजच्या घडीला अमित शहा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खालोखाल शक्तिशाली म्हणून ओळखले जातात. भाजपवर संपूर्ण प्रभुत्व असलेल्या दोन नेत्यांपैकी ते एक आहेत. या परिस्थितीत शहा यांनी उपस्थित राहून पंकजा मुंडे यांना दिलेले बळ राजकीय निरीक्षकांच्या नजरेतून सुटले नाही.

या सभेतील अमित शहा यांची उपस्थिती पंकजाताई मुंडे यांनी प्रतिष्ठेची केली होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही त्यांनी निवडणुकीच्या प्रचार सुरू केला नव्हता. याचे कारण म्हणजे बुद्ध शहा यांनी प्रचाराचा शुभारंभ करावा, ही त्यांची प्रबळ इच्छा होती. भाजपमध्ये पूर्वी गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांचे दोन गट होते. मुंडे यांच्या निधनानंतर त्या गटाचे नेतृत्व पंकजा मुंडे यांच्याकडे आले. परंतु सध्याच्या घडीला मुंडे आणि गडकरी या दोन्ही गटापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्वाधिक प्रभाव आहे. या पार्श्वभूमीवर शहा यांनी फडणवीस यांच्या मतदारसंघाऐवजी पंकजा मुंडे यांना प्राधान्य द्यावे, ही काही ही सहज सोपी गोष्ट नाही.

महाराष्ट्रात 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले त्यामुळे गोपीनाथ मुंडे हे राज्य भाजपचे सर्वोच्च नेते बनले. मात्र त्यानंतर अल्पावधीतच त्यांचे दुर्देवी निधन झाले आणि त्यानंतर पक्षाचे नेतृत्व फडणवीस यांच्याकडे चालून आले. तरीही आपल्या वडिलांचा राजकीय वारसा चालवीत असलेल्या पंकजा मुडे यांनी मुख्यमंत्रीपदाचा सोस सोडला नाही. हे पद मिळण्याची इच्छा त्यांनी वारंवार व्यक्त केली तसेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आपणच असल्याचाही दावा त्यांनी केला. राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पक्षातील एका गटाने त्यांच्या पारड्यात वजनही टाकले. त्यामुळे फडणवीस यांच्याशी त्यांचा थेट संघर्ष उभा राहिला. आपली ही महत्त्वाकांक्षा त्यांनी आजही लपवून ठेवलेली नाही.

त्यानंतर त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी बाहेर काढलेल्या चिक्की गैरव्यवहाराचे प्रकरण उद्भवले आणि पंकजा यांना माघार घ्यावी लागली. त्याच वेळेस फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील बेबनावही समोर आला होता. कधी काळी मुंडे गटाचे असणारे फडणवीस हे पंकजा यांच्यावर नाराज असल्याची उघड चर्चा सुरू झाली. दुसरीकडे धनंजय मुंडे हे विरोधी पक्षनेते म्हणून लोकप्रिय झाले. विशेष म्हणजे फडणवीस यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचे बोलले जाते.अशा रीतीने राजकीयदृष्ट्या काहीशा अडचणीत असलेल्या आणि मंत्री म्हणून फारशी चमकदार कामगिरी करू न शकलेल्या पंकजा मुंडे यांच्यासाठी अमित शहा यांनी वेळ काढावा ही साधीसुधी गोष्ट नाही. येत्या काळात राज्यात होणाऱ्या फेरबदलांची ही नांदी आहे का, असाही विषय त्यातून समोर आला आहे.

तसे पाहिले तर अमित शहा यांनी यावेळी केलेल्या भाषणातून स्पष्ट काही संकेत मिळाले नाहीत. “स्व.गोपीनाथ मुंडे यांनी राजकारण करत असतानाच समाजातल्या वंचित घटकांसाठी आणि ऊसतोड कामगारांसाठी आयुष्य वेचले. आता या दोघांच्या वाटेवर पंकजा मुंडे वाटचाल करत आहेत. त्याच पंकजा मुंडेंना तुमचा आशीर्वाद हवा आहे तो द्या आणि भाजपाला बहुमताने विजयी करा,” असे आवाहन त्यांनी केले. हे राजकीय व्यासपीठ नाही मात्र महाराष्ट्रात प्रचाराचा शुभारंभ हा भगवानगडापासून झाला याचा मला आनंद होतो आहे, असेही शाह यांनी सांगितले.

यातून काही राजकीय अर्थ काढावा अशी परिस्थिती नाही. परंतु मोदी आणि शहा यांचे राजकारण धक्कातंत्रावर चालते असे म्हणतात. त्यांना जे करायचे आहे ते हे दोघेही न बोलता करतात. त्यामुळे शहा यांनी स्पष्ट बोलून काही दाखवले नसले तरी त्यांची उपस्थिती संदेश देण्यासाठी पुरेशी आहे.

पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात किती जास्त मते मिळाली यापेक्षा किती लोकांच्या हृदयात स्थान मिळाले, हे महत्त्वाचे असल्याचे बोलून दाखवले. आता पंकजा या कोणाचे मन आणि किती प्रमाणात जिंकतात याच्यावर राज्याच्या राजकारणाचे पुढचे वळण ठरणार आहे. हे वळण अर्थातच निवडणुकीच्या निकालानंतर ते कळू शकेल.

Leave a Comment