काँग्रेसमध्ये एकाकी युवराज राहुल गांधी


लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पानिपत झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून काँग्रेसमध्ये तरुण आणि बुजुर्ग नेत्यांमधील अंतर वाढत आहे. राहुल यांच्या जाण्यामुळे दोन्ही बाजू आमने-सामने आल्या असून त्यातही तरुण नेतृत्वाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. राहुल यांनी या नेतृत्वाला खतपाणी घालण्याचे प्रयत्न केले होते. परंतु पक्षाच्या पराभवानंतर त्यांनी काँग्रेसमधून आपले अंग पूर्णपणे काढून घेतले आणि त्यामुळे हे तरुण नेते आधांतरी झाले आहेत.

गेल्या चार महिन्यात पक्षाच्या महत्त्वाचे नियुक्त्यांंमध्ये जुन्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. दुसरीकडे राहुल यांनी नियुक्त केलेल्या बहुतेक नेत्यांनी एक तर पक्षाला रामराम केला आहे किंवा पक्ष सोडण्यासाठी त्यांना मजबूर करण्यात आलेले आहे. आज परिस्थिती अशी आहे की, राहुल गांधी यांनी पक्षाच्या दैनंदिन कामकाजातून पूर्णपणे अंग काढून घेतले आहे. ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधणे एवढ्यापुरती त्यांनी स्वतःची भूमिका ठरवून घेतली आहे.

असे सांगितले जाते, कि लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली तेव्हा राहुल गांधी यांनी अशोक गेहलोत, कमलनाथ आणि पी. चिदंबरम अशा ज्येष्ठ नेत्यांना स्वतःच्या मुलांना उमेदवारी दिल्याबद्दल होणाऱ्या टिकेची कल्पना दिली होती. त्यावेळी राहुल यांनी अध्यक्षपद सोडलेले नव्हते. राहुल यांच्या दृष्टीने हे नेते म्हणजे पक्षात जे काही चुकीचे घडत होते त्या सगळ्याचे प्रतीक होते. यामुळे पक्ष सामान्य जनतेपासून दूर जात असल्याचे मत राहुल यांनी मांडले होते आणि या विरोधातच त्यांनी राजीनामा दिला होता.

आपल्या पाठोपाठ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनीही राजीनामा द्यावा, अशी राहुल यांची इच्छा होती. मात्र तसे घडले नाही. उलट त्यांच्या सहकारी आणि युवा नेत्यांनी आपापले राजीनामे देऊ केले. त्यावेळी काँग्रेसच्या सुमारे 150 चिटणीस आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते, परंतु राहुल यांच्याप्रमाणे राजीनामा देण्यासाठी एकही ज्येष्ठ नेता पुढे आला नाही. स्वतः राहुल यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

राहुल यांच्या या राजीनाम्याच्या निर्णयाला त्यांची आई सोनिया आणि बहीण प्रियंकांचे समर्थन होते. काँग्रेस अध्यक्ष म्हणून सुमारे दोन वर्षांच्या आपल्या कार्यकाळात राहुल गांधी यांनी पक्षसंघटनेत तरुण नेत्यांना प्राधान्य दिले. त्यामुळे राहुल गांधी यांच्या काळापासून पक्षात वर्चस्व गाजवणारे वयोवृद्ध नेते मागे पडले. राहुल यांच्या जाण्यानंतर मात्र ही मंडळी पुन्हा प्रभाव गाजवू लागली. सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर अहमद पटेल, आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद आणि मुकुल वासनिक यांच्यासारख्या नेत्यांना पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे.

राहुल यांच्या जाण्यानंतर सर्वाधिक प्रभाव विविध राज्यांमध्ये दिसून येत आहे. ज्या राज्यांमध्ये नवे नेतृत्व घडविण्याचे प्रयत्न राहुल यांनी केले होते तेथे राहुल यांच्या जवळच्या व्यक्तींना बाजूला ठेवण्यात आले आहे. त्यातील अनेकांनी तर पक्षाला निरोप दिला आहे.

उदाहरणार्थ मुंबई काँग्रेसमध्ये राहुल यांनी मिलिंद देवरा यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले होते. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर देवरा यांच्या जागी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई काँग्रेसचे नेते असलेल्या संजय निरुपम यांनी तर आपल्याला पक्ष अडगळीत टाकून टाकण्यात येत असून पक्ष सोडणे हा एकमेव पर्याय राहिला आहे, अशी जाहीर कैफियत मांडली आहे. विधानसभेची निवडणूक होत असलेल्या हरियाणात प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांना मागे सारण्यात आले आणि भूपेंद्रह हुडा यांना शांत करण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या तंवर यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. राहुल यांचे आणखी एक निकटवर्तीय आणि झारखंडचे माजी प्रदेशाध्यक्ष अजय कुमार यांनी काँग्रेस सोडून आम आदमी पक्षाशी जवळीक साधली आहे. त्रिपुराचे प्रदेश प्रमुख प्रद्योत डेबरमॅन यांनी काँग्रेसच्या प्रभारींशी मतभेद झाल्यामुळे पक्ष सोडला. पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याशी मतभेद झाल्यामुळे नवज्योतसिंग सिद्धू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मध्य प्रदेशात दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापुढे सुरू आहे, तर राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात तणावाची स्थिती आहे.

या सर्व कारणांमुळे आपण फक्त वायनाड मतदारसंघाचे खासदार म्हणून करत राहू, असे राहुल यांनी स्पष्ट केले. तरीही पक्षाच्या महत्वाच्या बैठकीत ते हजर राहतील अशी आशा काँग्रेसचे नेते बाळगून होते. परंतु राहुल आपल्या निश्चयावर कायम असून त्यांनी अशा बैठकांना जाणे टाळले आहे. आता सुद्धा निवडणुकीच्या धामधुमीत बँगकॉकला जाण्यातून त्यांनी हाच संदेश दिला आहे. काँग्रेसचे युवराज म्हणून हिणवले गेलेल्या राहुल यांना असे एकटे पडावे लागणे हे शोचनीयच म्हणायला हवे.

Leave a Comment