राजकारणात स्थिरावलेली घराणेशाही…!


आपली संतती पुढे जावी, हे कोणाला आवडणार नाही? सर्वांनाच आवडते परंतु नाही म्हणतात त्यांना दांभिकांच्या यादीत टाकायला हवे. संतती आपल्यापेक्षा वरचढ ठरावी, हा अभिमानाचा विषय आहे. त्यांच्या प्रगतीत इतरांना रस असो की नसो, पण त्यांच्या आई-वडिलांना नक्कीच रस असतो.

महाराष्ट्र विधानसभेच्या रणांगणात आदित्य ठाकरे यांनी प्रवेश केला त्यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब ज्या प्रकारे त्यांच्या मागे उभे राहिले, त्यावरून हेच अधोरेखित झाले. आदित्य यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी त्यांचे वडील उद्धव ठाकरे आणि आई रश्मी ठाकरे खास उपस्थित होते. राजकारणात हुकूमत गाजवायची मात्र सत्ता प्रत्यक्ष हाती घ्यायची नाही, ही ठाकरे कुटुंबाची ओळख आहे. ठाकरे परिवाराला केवळ सेवेत रस आहे, म्हणून निवडणुकीच्या राजकारणात आम्ही उतरत नाही असे ठाकरे कुटुंबियांकडून नेहमीच सांगण्यात येते. परंतु आदित्य ठाकरेंनी ही परंपरा मोडली आहे. आदित्य यांच्या या भूमिकला ठाकरे कुटुंबियांनी मनःपूर्वक पाठिंबा दिलेला दिसतो. आपल्या पुत्राला पुढे आणण्यासाठी पिता उद्धव ठाकरे निकराने प्रयत्न करताना दिसत आहेत.

आपल्या देशात घराणेशाहीच्या नावाने ओरड होते. इंदिरा गांधींच्या काळापासून आपल्या मुला-मुलीला राजकीय वारसा सोपवण्याची परंपरा सुरू झालीय. गंमत म्हणजे गांधी कुटुंबाच्या घराणेशाहीच्या विरोधात बोलणाऱ्या पहिल्या काही नेत्यांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचा समावेश होता. आज त्यांच्याच घराण्यात राजकीय वारसा पुढे नेण्याची घटना घडत आहे.

आदित्य ठाकरेंचा उमेदवारी अर्ज भरताना शिवसेनेने जसे शक्तिप्रदर्शन केले तसेच शक्तिप्रदर्शन समाजवादी पक्षाने अखिलेश यादव यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा केले होते. अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या आझम खान यांनीही आपल्या मुलाला राजकारणात आणण्यासाठी समाजवादी पक्षाचे नाक दाबले होते. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत आझम खान यांच्या पत्नीला तिकिट देण्यात आले होते. राहुल गांधी संसदेत बोलण्यासाठी पहिल्यांदा उभे राहिले तेव्हा सोनिया गांधी पळत-पळत संसदेत गेल्या होत्या. रामविलास पासवान यांचे चिंरजीव चिराग यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा त्यांनी शिवसेनेपेक्षाही मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा आई सोनिया गांधी आणि बहिण प्रियंका गांधी हजर होत्या.

अगदी भारतीय जनता पक्षानेही घराणेशाहीला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालाही त्यात यश आले नाही. पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या कार्यकाळाची शपथ घेतल्यानंतर संसदेत खासदारांना नेतृत्वाचे गुण समजावून सांगितले होते. त्यात त्यांनी मुलामुलींना राजकारणात वारसदार करण्यापासून दूर राहण्यास सांगितले होते. परंतु असे शहाणपणाचे बोल ऐकतो कोण? राजकारणात संधी मिळेल तेव्हा पुढारी मंडळी आपल्या मुला-मुलींना किंवा पत्नीला तिकिट देण्याचाच विचार करतात.

एखादा पिता जेव्हा आपल्या पुत्राला पुढे आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यावर टीकाही होते. अमिताभ बच्चन यांना एकदा कोणी तरी विचारले होते, की अभिषेक बच्चन यांना पुढे आणण्यासाठी तुमच्या स्थानाचा वापर का करता? त्याच्यासाठी लॉबिंग का करता? तेव्हा अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते, की अभिषेक माझा मुलगा आहे. चित्रपट क्षेत्रातील माझी प्रतिष्ठा व ओळखींचा वापर माझ्या मुलासाठी न करू तर कोणासाठी करू? मी त्याच्यासाठी लॉबिंग केली नाही तर कोण करेल? अमिताभने दिलेले ते उत्तर प्रत्येक पित्याच्या मनातील उत्तर होते.

म्हणूनच टीकाकारांसाठी पुढाऱ्यांकडे युक्तिवाद तयार असतो. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, अभिनेत्याचा मुलगा अभिनेता होता तर राजकारण्याच्या मुलाने राजकारणी का बनू नये, असा प्रश्न राजकारणी करतात. व्यवसायात घराणेशाही चालते मग राजकारणात का नाही? या साथीपासून कोणताही पक्ष मुक्त नाही.लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचे नातू व अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार हे उमेदवार होते. त्यावेळी भाजपने त्यांच्यावर घराणेशाहीचीच टीका केली होती. मात्र “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक सभेत भाषण करताना घराणेशाहीवर जोर देतात. मग मला सांगा, मुख्यमंत्र्यांना विखे घराणे, मोहिते घराणे कस काय चालते,” असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार यांचे दुसरे नातू व पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी केला होता. त्याला भाजपकडे उत्तर नव्हते.

वास्तव हे आहे, की राजकारणात आता घराणेशाही चांगलीच स्थिरावलेली आहे. तिच्या विविध आविष्कारांचे दर्शन करणे एवढेच आपल्या हाती आहे.

Leave a Comment