चंद्रकांतदादांची लढत नक्की कोणाशी?


भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. वरपांगी पाहिले, तर त्यांचा मुकाबला सर्व पक्षीयांनी उभ्या केलेल्या सामाईक उमेदवाराच्या विरोधात म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या विरोधात आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांना स्वपक्षीय आणि ब्राह्मण समाजाच्या प्रचाराविरुद्धच लढावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

पाटील हे पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उभे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून ते ओळखले जातात. मूळचे कोल्हापूरचे असल्यामुळे उपरा असल्याचा ठपका त्यांना सहन करावा लागत आहे. त्यातच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात आपला उमेदवार न देता शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

कोथरूड हा भाजपचा गड समजला जातो. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातील सर्वाधिक विकसित रहिवासी व व्यापारी क्षेत्र अशी त्याची ओळख आहे. तसेच सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय मतदारांची सर्वाधिक संख्या या मतदारसंघात असल्याचेही चित्र आहे. त्यामुळेच विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना तिकीट नाकारून ते पाटील यांना देणे हे भाजपला जड जाणार असल्याची चर्चा पहिल्या दिवसापासून सुरू आहे. भाजपच्या कुलकर्णी यांनी गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांना 64,००० मतांनी पराभूत केले होते, तर किशोर शिंदे चौथ्या क्रमांकावर होते.

ही चर्चा कदाचित पाटील यांनीही गांभीर्याने मनावर घेतली आहे. म्हणूनच ब्राह्मण समाज आणि कुलकर्णी यांची मनधरणी त्यांनी सुरू केली आहे. “मी पुण्याचाच आहे आणि कोथरूडसाठी बाहेरचा नाही. पालकमंत्री म्हणून मी पुण्याशी माझा संबंध आहे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत असल्यापासून काळापासून मी शहरात सक्रिय आहे. म्हणून मतदार मला उपरा मानणार नाहीत,” असे पाटील यांना सांगावे लागले.

इतकेच नाही तर निवडणुकीत मला न्याय मिळाला, पण मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाला. ताईंवर अन्याय झाला असला तरी त्यांना जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही, असे त्यांनी सोमवारी पुन्हा सांगितले. असेच वक्तव्य त्यांनी दोन दिवसांपूर्वीही केले होते. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात ब्राह्मण संघटनेची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मेधा कुलकर्णी आणि ब्राह्मण संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

पाटील हे असे सांगत असले तरी यात सत्य किती आणि अभिनिवेश किती, हा प्रश्नच आहे. याचे कारण म्हणजे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु असतानाच कोथरुडमधून विरोध सुरु झाला होता. तरीही त्यांना तेथूनच उमेदवारी देण्यात आली. मात्र पाटील यांना होत असलेला विरोध अजूनही कायम असल्याचे दिसत आहे.मतदारसंघात काही ठिकाणी फलक लावून, सोशल मीडियावर वेगेवेगळ्या मेसेजद्वारे नाराजी व्यक्त होतांना दिसत आहे.

पाटील यांच्या सुदैवाने ब्राह्मण समाजातून त्यांना असलेला विरोध मावळताना दिसत आहे. सोमवारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने त्यांना पाठिंबा जाहीर केला. महासंघाच्या वतीने कोथरूड मतदारसंघातून मयुरेश अरगडे व राहुल जोशी या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी या दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली.

अर्थात हे पत्रक निघाले म्हणजे शेवट गोड झाला असे नाही. कोथरुडमध्ये बहुसंख्य असलेल्या ब्राह्मणांमध्ये पाटलांच्या उमेदवारीवरून संभ्रम आहे. ब्राह्मण महासंघातच या मुद्द्यावरून फूट फडली आहे. आधीच अडचणीचा असलेला मराठा-ब्राह्मण वाद या निमित्ताने चिघळतो का, ही शंका उपस्थित झाली आहे. त्यात पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्याचे पडसाद राज्यभर उमटू शकतात.

हा मुद्दा निकालात काढला तरी मेधा कुलकर्णींची समजूत काढण्यात अद्याप भाजपला यश आलेले नाही. वरकरणी मेधाताईंनी आपला पाठिंबा चंद्रकांतदादांना जाहीर केला असला, तरी त्या मनापासून त्यांना साथ देतील हे सहज शक्य नाही. त्यांचे कार्यकर्तेही मनापासून प्रचारात उतरतील, ही शक्यता दूरच वाटते. त्यामुळेच विरोधकांना लक्ष्य करण्याऐवजी चंद्रकांतदादांचा वेळ मेधाताईंची मनधरणी करण्यात जात आहे.

Leave a Comment