नॅनो नावाच्या स्वप्नाचा अंत!


तुम्हाला नॅनो कार आठवते आहे का? साधारण 10 वर्षांपूर्वी, 2009 मध्ये, ही कार झोकात सादर करण्यात आली होती. टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांच्या कल्पनेतून या गाडीचा जन्म झाला. केवळ एक लाखात मिळणारी गाडी ही तिची प्रमुख ओळख होती आणि त्यामुळेच जगातील ती सर्वात स्वस्त कार ठरली. भारतातील मध्यमवर्गाला एक नवी वाट दाखवणारी ही गाडी स्वप्नासारखी ठरली होती. परंतु आज ही कार शेवटचे आचके देत असून या स्वप्नाचा अंत जवळ आल्याची चिन्हे आहेत.

नॅनोचे उत्पादन करणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीने यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत एकाही नॅनो कारचे उत्पादन केलेले आहे. इतकेच नाही तर गेल्या सहा महिन्यात केवळ एका नॅनो कारची विक्री झाली आहे. सुदैवाने कंपनीने नॅनोचे उत्पादन कायमस्वरूपी बंद करण्याची घोषणा केलेली नाही, मात्र हीच परिस्थिती कायम राहिली तर तो दिवसही दूर नाही. कारण एप्रिल 2020 पासून नॅनो कारचे उत्पादन कायमस्वरूपी बंद होऊ शकते, असे संकेत टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या वायूंसाठी केंद्र सरकारने बीएस-6 उत्सर्जन मानकांची निश्चिती केली आहे. तसेच नवीन सुरक्षा नियम लागू केले आहेत. त्यांची पूर्तता करण्यासाठी आणखी गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना नाही, असे टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.

असे झाले तर केवळ रतन टाटाच नव्हे तर देशवासियांचेही एक स्वप्न धुळीला मिळेल. एका सुंदर प्रकल्पाचा हा दु:खदायक अंत ठरेल. असे म्हणतात, की एकदा त्यांनी एका कुटुंबाला पावसात चिंब भिजत दुचाकीवरून जाताना पाहिले होते. तेव्हा त्यांनी स्वत:शी निर्धार केला, की मोटारसायकलपेक्षा थोडीशी जास्त किंमत असलेली एखादी मोटार ते बनवतील. मात्र माणूस जे ठरवते तसेच होईल, याची काही खात्री नाही.

टाटा मोटर्सने जानेवारी 2008 मध्ये दिल्लीत झालेल्या ऑटो एक्स्पोत नॅनो कार सादर केली होती. सर्वसामान्य माणसाची स्वस्त आणि मस्त कार
अशी तिची ओळख बनली. यथावकाश या गाडीचीही किंमत वाढली तरीही अन्य गाड्यांच्या तुलनेच नॅनो कार सगळ्यात स्वस्त राहिली. सुरूवातीला या कारचे उत्पादन पश्चिम बंगालमध्ये होणार होते. मात्र तेथे सिंगूर जमीन प्रकरणावरून झालेल्या विलंबानंतर गुजरातमधील साणंद येथे या कारचे उत्पादन होऊ लागले.

नॅनोची चार मॉडेल्स आहेत. नॅनो नॉर्मल, नॉन मेटॅलिक, मेटॅलिक आणि चौथे टॉप मॉडेल. मार्च 2009 मध्ये बाजारात दाखल झालेल्या या कारची सुरूवातीची किंमत एक लाख रुपये (बेसिक मॉडल) होती. नॅनोचे वितरण 17 जुलै 2009 रोजी चालू झाले आणि लकी ड्रॉ पद्धतीने मुंबईचे अशोक विचारे ‘नॅनो’चे पहिले मानकरी ठरले. परंतु बाजारात यश मिळवण्यात ती फारशी यशस्वी ठरली नाही. गेल्या काही वर्षांपासून या कारच्या विक्रीत सातत्याने घट दिसून येत आहे. नॅनोला वर काढण्याचे कंपनीचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात टाटा मोटर्सने 297 नॅनो कारचे उत्पादन केले आणि देशांतर्गत बाजारात 299 कार विकल्या होत्या.

बंगालमधील कारखान्याच्या समस्येसोबतच अन्य अनेक प्रश्नांनी नॅनोला सुरूवातीपासूनच घेरले होते. कारचे वितरण सुरू झाल्यानंतर काही काळातच मोटारीत अचानक आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे या कारच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. इतकेच नाही तर सर्वात स्वस्त कार म्हणून तिचा प्रचार करणे ही चूक ठरल्याचे कंपनीने सांगितले होते.

नॅनो हे टाटा मोटर्सच्या दृष्टीने नुकसानीचे मॉडेल ठरले आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून अचानक काढून टाकण्यात आलेले केकी मिस्त्री यांनी केलेल्या दाव्यानुसार, नॅनोने सतत मूल्य गमावले होते आणि एकवेळ हा आकडा १००० कोटी डॉलरवर पोचला होता. नॅनो हा “वारसा हॉटस्पॉट्स” असल्याचेही मिस्त्री यांनी म्हटले होते. “नॅनोला नफा मिळवणे हे कधीही दृष्टिपथात नव्हते आणि परिस्थितीत बदल करण्याची कोणतीही योजना नव्हती”, असेही त्यांनी म्हटले होते.

आता तो नफा तर दूरच, पण विक्रीही दृष्टिपथातून दूर गेली आहे. त्यामुळे नॅनोची अखेर अटळ आहे. एका नवीन स्वप्नाची निर्मिती भारतीयांना करावी लागेल.

Leave a Comment