पाकिस्तानाची कराचीहून लॉस अँजेलसला जाणारी ट्रेन व्हायरल


मुंबई : सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानहून थेट अमेरिकेला जाणाऱ्या ट्रेनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपल्या तरी हे पचनी पडणारे नसून तरी नेमका हा प्रकार काय आहे? त्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत. कारण इस्लामाबाद किंवा लाहोर नाही, तर चक्क ‘लॉस अँजेलस’ असे ट्रेनवरील डिजिटल साईनबोर्डवर लिहिले आहे.

हा व्हिडीओ पाकिस्तानात सिंध प्रांतातील सुक्कूर शहरातील रोहरी रेल्वे स्थानकावरचा आहे. इलेक्ट्रिक साईनबोर्ड स्टेशनवर असलेल्या एका ट्रेनवर दिसत आहे. यामध्ये कराची ते लॉस अँजेलस असा रेल्वेमार्ग लिहिला आहे. आता पाकची ही काय नवी भानगड? असा प्रश्न पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लॉस अँजेलसला पाकिस्तानची रेल्वे जात आहे. पाकिस्तान रेल्वेने खूप प्रगती केली आहे. हे प्रवासी व्हिसाशिवाय अमेरिकेला जात आहेत, असे एक माणूस ओरडत असल्याचेही व्हिडीओमध्ये ऐकायला येत असल्यामुळे साहजिकच हा प्रकार काय आहे, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर हजारो जणांनी शेअर केला आहे. लाखोच्या संख्येत व्हिडीओचे व्ह्यूज गेले आहेत. पुन्हा एकदा भारतीय यूझर्सनी पाकिस्तानला येथेच्छ ट्रोल केले आहे. तुम्हाला ट्विटर-फेसबुकवर नेटिझन्सच्या कल्पनाशक्तीला फुटलेले धुमारे पाहता येतील.


आता, अनेकांना हा व्हिडीओ फेक आहे का, असा प्रश्न पडला आहे. व्हिडीओमध्ये एडीटिंग करुन पाकिस्तानातील एखाद्या शहरातील नावाऐवजी लॉस अँजेलसचे नाव टाकले आहे का? असेही कोणी विचारत आहे. तर नाही! हा व्हिडीओ फेक नाही, खरा आहे. लॉस अँजेलसच नाव ट्रेनच्या बोर्डवर लिहिले आहे. पण ही वस्तुस्थिती खोटी आहे.

या प्रकरणावर खुद्द पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनीच भाष्य केले आहे. हा संगणकीय फलक (कॉम्प्युटराईज्ड डिस्प्ले) आहे. लोक नाठाळ असतात. कोणीतरी अशीच खोडी केली आणि डिजिटल बोर्डशी छेडछाड करत मूळ शहराचे नाव बदलले आणि लॉस अँजेलस टाकला असल्याचा दावा अहमद यांनी केला आहे.

अल्लाहची इच्छा असेल, तर लवकरच आमचे मंत्रालय लॉस अँजेलसला एखादी ट्रेन पाठवले अशी पुस्ती जोडायलाही ते विसरले नसल्यामुळे हा व्हिडीओ काय, आणि मंत्रीमहोदयांचे स्पष्टीकरण काय, एक प्रकारे मनोरंजनात्मक काम झालेच.

Leave a Comment