राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रिकरण की विलिनीकरण?


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आणखी एका वादाला तोंड फोडले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आज जरी वेगळी असली तरी पूर्वी एकाच झाडाखाडी वाढलेली आहे. भविष्यात आम्ही जवळ येणार आहोत. काँग्रेस एकत्रित होणार आहे, असे सांगून शिंदे यांनी धमाल उडवली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे विरोधकांना आयते कोलित मिळणार आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष थकले आहेत. आम्ही दोघे कधीकाळी एका आईच्या मांडीवर वाढलेलो आहोत. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व घेऊन पुढे आलो आहोत. त्यामुळे आमच्याही मनात खंत आहे, त्यांच्याही मनात खंत असेल, पण ते बोलून दाखवत नाहीत. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस ते करतील, असे शिंदे म्हणाले.

या एकत्रीकरणाची सुरूवात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सोलापुरातून करत असल्याबद्धल शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. “शरद पवार आणि माझ्या मैत्रीत अनेकांनी घोळ घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये कोणाला यश आले नाही. कसे वागावे आणि कसे डावपेच करावेत याची शिकवण शरद पवारांनीच आपणास दिली आहे. मीसुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालत आहे,” असे शिंदे म्हणाले. यामुळे शरद पवार यांच्या राजकारणाला जबर धक्का पोचला आहे.

सोनिया गांधी यांच्या विदेशी मूळाचा बागुलबुवा उभारून पवार यांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. यंदाच या पक्षाला 20 वर्षे पूर्ण झाली. मात्र 2014 च्या निवडणुकांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला सतत अपयशाचा सामना करावा लागत आहे. पक्षाला भवितव्य नसल्याची भावना प्रबळ झाल्यामुळे अनेक नेत्यांनी भाजपशी घरोबा केला आहे. त्यातच पवार घराण्यातील अंतर्गत वादामुळेही पवार त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आपल्या जुन्या पक्षात ते परत जातील, अशी अटकळ गेली काही महिने बांधण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार नसल्याचे खुद्द पवार यांनी स्पष्ट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व असून विलिनीकरणाचा प्रश्नच येत नसल्याची भूमिका पक्षाच्या नेत्यांची आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

‘कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस इतर कोणत्याही पक्षात विलीन होणार नसून पक्षाचं स्वतःचे एक अस्तित्व आहे. हे अस्तित्व पक्ष कायम ठेवणार आहे. कार्यकर्त्यांनी अफवांन बळी पडता कामा नये,’ असे आवाहनच तेव्हा पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते असलेल्या अजित पवार यांनी केले होते. आता तर स्वतः अजित पवार यांनीच राजीनामानाट्य करून पक्षात संभ्रम निर्माण केला आहे.

वास्तविक शरद पवार यांची मूळ विचारधारा काँग्रेसचीच. काँग्रेस पक्षाचे तरुण तडफदार आमदार म्हणून त्यांनी 1967 साली विधानसभेत प्रवेश केला त्यावेळी त्यांचे वय होते केवळ 27 वर्षे. त्यानंतर पाच वर्षांनी ते राज्यमंत्री झाले आणि 1974 मध्ये अखेर ते कॅबिनेट मंत्री बनले. इथपर्यंतचा त्यांचा प्रवास काँग्रेसच्याच नावेतून झाला. मात्र 1978 मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडण्यासाठी त्यांनी मित्रपक्षांना सोबत घेऊन ‘पुलोद’ आघाडी स्थापन केली. वयाच्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे ते मुख्यमंत्री बनले. .

पंतप्रधान इंदिरा गांधींनी 1980 मध्ये पुलोद सरकार बरखास्त केले. त्यावेळी अंगाला राख फासून हिमालयात जाईन परंतु काँग्रेसमध्ये जाणार नाही, अशी गर्जना त्यांनी केली होती. मात्र 1980 व 1985 अशा दोन विधानसभा निवडणुकांत अपयश आल्यावर डिसेंबर 1986 मध्ये त्यांनी अचानक काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला. त्यासाठी राजीव गांधींचे नेतृत्व मान्य केले. मग काँग्रेसच्याच गोटात राहून त्यांनी 1988 ते 90, 1990 ते 91 आणि 1993 ते 95 अशा तीन वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. राजीव गांधींच्या हत्येनंतर पवारांनी दिल्लीच्या राजकारणात जम बसवला. पंतप्रधान नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षणमंत्रीपद सांभाळले. त्यानंतर 1998 मध्ये ते संसदेत काँग्रेस पक्षाचे नेते बनले.

परंतु सोनिया गांधींना राजकारणात प्रवेश केला आणि पवारांचे बिनसले. तारिक अन्वर व पी. ए. संगमा यांना सोबत घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. आता सुशीलकुमार शिंदे म्हणतात तसे काँग्रेसही जर्जर झाली आहे आणि राष्ट्रवादीही. काँग्रेसला पवारांसारखा धूर्त नेता हवा आहे, तर पवारांना काँग्रेसची कार्यकर्त्यांची फळी व संघटना! त्यामुळे त्यांचे एकत्रीकरण होणारच नाही असे नाही. फक्त ते एकत्रीकरण होते का विलिनीकरण एवढाच प्रश्न आहे!

Leave a Comment