बँगकॉकमध्ये राहुल गांधीं – वारी नव्हे विश्वासघात!


काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि अजूनही भावी आशास्थान असलेल्या राहुल गांधी यांच्या बँगकॉकवारीने देशातील राजकारण पुन्हा तापले आहे. महाराष्ट्र व हरियाणातील निवडणुकीच्या ऐन आधी त्यांनी हा दौरा हाती घेतल्यामुळे भाजपने त्यांना स्वाभाविकच लक्ष्य केले आहे. दुसरीकडे राहुल यांची बाजू सावरता-सावरता काँग्रेस नेत्यांच्या नाकी नऊ आले आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाने काँग्रेस नेतृत्वाला काहीही शिकवले नाही, हेच त्यातून पुन्हा स्पष्ट झाले आहे.

शनिवारी रात्री राहुल गांधी हे बँगकॉककडे रवाना झाल्याची बातमी आली होती. तेव्हापासून ट्विटर बँगकॉक ट्रेंड होऊ लागले. रविवारीही सकाळी राहुल गांधी यांना ट्विटरच्या टॉप ट्रेंडमध्ये होते. यावरून भारतीय जनता पक्षाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्यावर निशाणी साधला होता. त्यानंतर कर्नाटक भाजपनेही त्यांची थट्टा उडवली. ‘महाराष्ट्र व हरियाणात निवडणूक जवळ आहे. मतदार आपल्या स्टार प्रचारकाचा अत्यंत अधीर होऊन प्रतीक्षा करत आहे. ते अगोदरच बँगकॉकला रवाना झाले आहे, हे खरे आहे का? आता अंबालात ‘सोने से आलू’ आणि ‘औरंगाबाद मेड मोबाइल’ या गोष्टी कोण करेल,” असे ट्वीट कर्नाटक भाजपने केले. सोशल मीडियावर अन्य वापरकर्त्यांनीही त्यांच्या सूरात सूर मिसळला.

राहुल हे शनिवारी रात्री बँगकॉकला रवाना झाले. ते कंबोडियाला गेले असून 11 तारखेला परत येतील, असे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र त्यांनी या दौऱ्याची जी वेळ साधली आहे, त्यावरून वाद निर्माण होणे स्वाभाविक आहे.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी हे राहुल गांधींचा बचाव करण्यासाठी पुढे आले. खासगी आणि सार्वजनिक जीवनाची सरमिसळ करता कामा नये, असे त्यांनी म्हटले आहे. “एखाद्या व्यक्तीच्या खासगी जीवनाला सार्वजनिक जीवनाशी जोडता कामा नये. आपण प्रत्येकाच्या खासगीपणाचा आदर करावा, हे आवश्यक आहे. कोणत्याही प्रगतिशील व उदार लोकशाहीसाठी हे आवश्यक आहे, ” असे ट्वीट सिंघवी यांनी केले.

एक नेते म्हणून राहुल गांधी यांना बँगकॉकच नव्हे तर अन्य कुठेही जाण्याचा अधिकार आहे. मात्र ते एका राजकीय पक्षाचे नेते आहेत आणि या पक्षाची दारोमदार त्यांच्यावरच आहे. अशा स्थितीत त्यांनी प्रत्यक्ष रणमैदानात उतरून आपल्या पक्ष कार्यकर्त्यांचे नेतृत्व करावे, ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मात्र महाराष्ट्र आणि हरियाणा यांसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम उभा राहिला असताना पक्षाला वाऱ्यावर सोडून ते चालते झाले आहेत. यापूर्वी 2015 मध्येही ते 60 दिवसांसाठी बँगकॉक आणि आग्नेय आशियाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळीही राजकीय विरोधक आणि सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी त्यांची हुर्यो उडवली होती. त्यावेळी तब्बल 56 दिवस ते दिल्लीत नव्हते आणि ते कुठे गेले, याबद्दल काँग्रेसकडून काही वाच्यताही करण्यात आली होती. त्यावेळी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. त्यावरून प्रचंड राजकीय गदारोळ झाला होता. आता पुन्हा त्यांनी तोच प्रयोग केला आहे.

लोकसभेत झालेल्या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र काँग्रेसच्या कार्यकारी समितीने तो एकमताने नाकारला. राहुल गांधींनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आग्रह केला. अनेकांनी राजीनामा दिला तर अनेकांनी उपोषण केले. मात्र त्या सर्वांवर पाणी फेरत आणि काँग्रेसच्या मोठमोठया नेत्यांची आणि कार्यकर्त्यांच्या विनंतीला बाजूला सारून राहुल यांनी अध्यक्षपदापासून दूर राहण्याचा निग्रह कायम ठेवला.

पद सांभाळले नसले तर पक्षासाठी काम करण्यापासून त्यांना कोणी रोखले नव्हेत. मात्र ‘ मी आता काँग्रेसचा अध्यक्ष नसून पक्षाने नव्या अध्यक्षाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा’ असे सांगून त्यांनी आपले हात झटकले. काँग्रेस पक्ष हा गांधी घराण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे अन्य कोणी नेतृत्व कऱण्यासाठी येईल हे शक्य नव्हते. आज नाही उद्या राहुल आपले नेतृत्व करतील, या आशेवर काही जण पक्षात राहिले. ज्यांना या पक्षात भवितव्य नाही त्यांनी इतर पक्षांचा घरोबा केला. आता आपल्या उरलेल्या सैनिकांना दिलासा देऊन त्यांचे मनोधैर्य उंचावणे हे राहुल यांचे कर्तव्य होते. मात्र ऐन लढाईच्या वेळेस शस्त्रे टाकून ते पळाले आहेत. त्यामुळे त्यांचा हा दौरा बँगकॉकवारी ठरणार नसून पक्षाचा विश्वासघात ठरणार आहे.

Leave a Comment